प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
प्रागैतिहासिककालीन मरणविषयक उपपत्ति:- वरील सर्व वर्णनावरून असें सूचित होतें कीं, मनुष्य प्राण्याला रोग होतात ते स्वाभाविक कारणांनीं होतात; आणि त्या रोगांवर उपाय केले नाहीत तर तो मरण पावतो. पण प्राचीन काळांतील लोकांच्या कल्पना अशा नव्हत्या हें येथें लक्षांत घेतलें पाहिजे, ज्याला आपण स्वाभाविक रोग व स्वाभाविक मरण असें म्हणतों, त्याला पूर्वी मानवी प्रगतीच्या आद्य काळांत शत्रूचा हल्ला म्हणून लोक मानीत असत. या प्रश्नाचा विचार करूं लागलें की, फारच चमत्कारिक अनुमानें निघूं लागतात. जितकें या विषयांचें अधिक निरीक्षण करावें तितक्या अधिक जोरानें ही गोष्ट मनाला पटूं लागते कीं, ‘ स्वाभाविक ’ मरणाची कल्पना आद्यकालीन मानवांनां फार काळानंतर नियमसिद्ध म्हणून वाटूं लागली असावी. हल्ली ‘ मनुष्य मर्त्य आहे ’ ही कल्पना आपल्या मनाला इतकी खिळलेली आहे कीं, वरील विधान वाचून कोणीहि आश्चर्यचकित होईल. तथापि हल्लीच्या रानटी लोकांतल्या कल्पना पाहिल्या, आणि त्याबरोबर ऐतिहासिक काळांतील लोकांच्याहि रोगोत्पत्तीसंबंधाच्या कल्पना विचारांत घेतल्या म्हणजे मानवी जीवितासंबंधाच्या आद्यकालीन कल्पनांत निसर्गसिद्ध मरणाच्या कल्पनेचा अन्तर्भाव होत नव्हता असेंच आपणांस दिसून येईल. असे सांगतात कीं, हल्लीं सु आस्ट्रेलियांतील रानटी लोक कोणी झाडावरून पडून पाय मोडून मरण पावल्यास त्याला स्वाभाविक मरण आलें असें न मानतां, ते शेजारच्या टोळींतल्या कोणातरी दुष्ट मनुष्याच्या जादूमंत्रानें आलें असें समजतात. तसेत ऐतिहासिक काळांतले आरंभीचे इजिप्शियन व बाबिलोनियन लोक सुद्धां दुष्ट शत्रुंच्या करणांमुळें रोग होतात असें मानीत असत, असें आपणांस ग्रंथांतरा आढळून येतें. फार कशाला, अलीकडल्या मध्ययुगांतल्या भोळ्या भाविकपणाच्या गोष्टी आणि त्यापेक्षांही अलीकडील काळांतील चेटुकागिरीवर असलेला लोकांचा विश्वास पाहिला म्हणजे त्यावरूनहि, रोग म्हणजे आपल्या शत्रूनें त्रास देण्याकरिंता उत्पन्न केलेले कोणी सजीव प्राणीच किवा भुत्तें होत, ही कल्पना रूढ असल्याचें स्पष्ट दिसून येतें. एवढेंच काय, तर आजच्या आपल्या बोलण्यांतल्या भाषेंत सुद्धां वरील कल्पनेचे अवशेषसूचक शब्द राहिलेले आहेत. उदारणार्थ “ तापाने पछाडलें ” असली कांही वाक्ये आपणहि अद्याप वापरीत असतों. इंग्रजींत तापाच्या झटक्याला “अट्याक” म्हणजे हल्ला असें म्हणतात ही गोष्ट त्यांच परिस्थितीची द्योतक आहे.
या गोष्टीचा आणखी विचार करण्याकरितां, जर आद्यकालीन मानव कोणत्या परिस्थितींत रहात असत तें लक्षांत घेतलें तर असें दिसून येईल कीं, स्वाभाविक रीत्या वयमानपरत्वें मरण आल्याचीं उदाहरणें पाहण्याची त्यांनां फार क्वचितच संधि मिळत असे. त्यांच्या भोवतालच्या सर्व जगांत नेहमीं हाणामारी चालू असे. स्वत: त्यांची उपजीविका शिकारीवर चालावयाची; पशुपक्षीहि एकमेकांस मारीत असल्याचें त्यांनां नेहमी दिसावयाचें; स्वत: चे जातबांधवहि शत्रूच्या हातून मरण पावत असावयाचे. त्यामुळें साहजिकच एखादा कुटुंबांतला मनुष्य आजारी पडून मरण पावला, तरी तो कोणा तरी प्रत्यक्ष माहीत नसलेल्या शत्रूच्या घातक कृत्यामुळेंच मेला अशी समजूत होत असे. शिवाय कालगणनेंसंबंधानेंहि व्यवस्थित पद्धति त्या वेळीं ठरलेली नसल्यामुळें म्हणजे कांहीं विशिष्ट सालीं विशिष्ट गोष्टी घडल्या असें बोलण्याची भाषा ठरलेली नसल्यामुळें स्वत:च्या भोंवतालच्या माणसांपैकी कोण किती वयाचा हें नक्की समजण्यास त्या काळीं मार्ग नसे. शिवाय टोळ्या किंवा संघ करून राहण्याची पद्धत सुद्धां बर्याच अनुभवानंतर पडली असावी; आणि तशी पद्धति चालू होईपर्यंत त्या वेळच्या माणसांना स्वत: चे वृद्ध आजे पणजे सु बहुधा माहीत असणें शक्य नव्हतें: इतकेच नव्हे, तर मनुष्य वयांत येऊन जगांत स्वत:चा संसार स्वत: चालविण्यास समर्थ झाल्यावर खुद्द स्वत:च्या आईबापांबद्दलहि स्मृति ठेवण्याची फिकीर करीत नसावा. त्यामुळें जरी आसपास कोणी इसम वृद्धत्वामुळें अशक्त व रोगी होऊन मरण पावला, तरी ती अशक्तता व ते रोग माणसाच्या वार्ध्दक्यामुळें उत्पन्न झाले अशी कल्पना त्याच्या वयोमानाची नक्की माहिती नसल्यामुळें येणें शक्य नव्हतें. शिवाय कित्येक रानटी जातींत वृद्ध व पंगू माणसांनां ठार मारून टाकण्याची चाल अद्यापहि चालू आहे ही गोष्ट लक्षांत घेतां असें स्पष्ट दिसतें की, ही चाल वार्ध्दक्यामुळें भारतभूत झालेलीं समाजांतील माणसें सृष्टिक्रमानुसारच खास मरण पावतात अशी स्पष्ट कल्पना मानवजातीला होण्यापूर्वीच व त्या अज्ञानामुळें चालत आलेली असावी. कालगणनापद्धति व मानवी जीविताचें मर्यादितत्व या दोन्ही कल्पना ज्या काळांतल्या माणसांना आलेल्या नव्हत्या, त्यांना वार्ध्दक्यामुळें उत्पन्न झालेल्या व्याधी व पुढें येणारा मृत्यु शत्रूच्या वारंवार होणार्या पीडेमुळेंच भोगावा लागतो असेंच स्वाभाविक वाटत असणार. या कल्पनेला जोडून दुसरी कल्पना अशी उद्भवणार कीं, ज्या अर्थीं कित्येक माणसें शत्रूंनीं अनेक संकटें आणलीं तरी त्यांतून निभावून जिवंत राहूं शकतात, त्या अर्थी पुढें त्यांच्यावर येतील त्या संकटांतूनहि सुटून ती नेहमींच जिवंत राहतील. त्या आद्यकालीन मानवांनां मागल्या अनेक वर्षांतल्या गोष्टी कळण्याला लेखादि साधनें नव्हतीं. चालू काळ व स्वत:च्या आठवणींतल्या गोष्टी यापलीकडे भूत काळांतील गत गोष्टींबद्दल ज्ञान होण्यास त्यांना कांहीच साधनें नव्हती. शिवाय माणसांची आठवण चांगली धड फार क्वचित् असते. तेव्हां ज्या गोष्टी इतरांनी पाहिलेल्या असून आठवत नसत, त्या ज्यांनां आठवत तीं माणसें उत्तम स्मरणशक्तीचीं म्हणून गणलीं जात असतील; आणि अशा माणसांनां सु पुढें फार मागच्या गोष्टी धड आठवत नाहींशा झाल्या म्हणजे त्यांच्या बालवयांतल्या गोष्टी त्यांनांहि आठवणें शक्य नसे. उघडच आहे की, स्वत:च्या अनुभवांतल्या बालपणापासूनच्या सर्व गोष्टी आठवतात असा माणूस विरळा पहावयास सांपडतो. आणि मानवांच्या या स्मृतिदौर्बल्यामुळें आद्यकालीन माणसांचा भोंवतालची वयोवृद्ध माणसें अनंत काळापासूनच हयात आहेत असा समज दृढ होण्यास मदत होत असली पाहिजे.
आतां हा मुद्दा सिद्ध करण्याकरितां अधिक कारणें देत न बसलें तरी सुद्धां, आद्यकालीन माणसांनां स्वत:च्या देहाला स्वाभाविक रीत्या सृष्टिक्रमानेंच मरण खास यावयाचें असतें ही कल्पना प्रथम बराच काल झालेली नव्हती असें अनुमान काढण्यास कांही हरकत दिसत नाहीं. अर्थात् मनुष्याचें आयुष्य अमर्याद असतें असेंच त्यांना वाटत असावें. फार काय, पण आपलेच कांही पिढ्यांपूर्वीचे पूर्वज आपण अमर आहोंत असें मानीत असत ही गोष्ट अक्षय तारूण्य प्राप्त करून देणार्या जलाचा ( अमृताचा ) झरा शोधून काढण्याचे जे प्रयत्न त्या वेळीं चालू होते त्यांवरून दिसून येते. इतकेंच नव्हे, तर आपल्या या चालू काळांतला एक सृष्टिशास्त्रज्ञ असें प्रतिपादन करतो कीं, पक्षी अमर असून त्यांना अपघातामुळें काय तें मरण येतें. तात्पर्य, प्रत्येक मनुष्याला विशिष्ट वयोमर्यादेनंतर आपोआप नैसर्गिक रीत्या मरण खास यावयाचें, ही कल्पना मानवजातीच्या मनाला अनेक पिढया मानवबुद्धीची वाढ झाल्यानंतरच हळू हळू पटत गेली असली पाहिजे; आणि तीसुद्धां सर्व शारीरिक रोग, व्याधी, व्यंगें केवळ दुष्ट शत्रूंच्या जादूमंत्रामुळें येतात ही समजूत नाहीशी झाल्यानंतर पटली असली पाहिजे. ऐतिहासिक काळांतल्या पण अगदी आरंभीच्या मानवी समाजाबद्दलची जी माहिती उपलब्ध आहे, तीवरून प्रागैतिहासिक काळाच्या अखेरी अखेरीला तरी ही कल्पना मानवांच्या मनाला पटली होती किंवा नाही याबद्दल शंका येते. पण जर ती पटलेली असली तर मात्र प्रागैतिहासिक मानवांनी एक फारच महत्त्वाचा शास्त्रीय शोध लावला होता असें म्हटले पाहिजे. याबरोबर ही गोष्टहि येथें सांगावीशी वाटते कीं, मनुष्यदेह अमर आहे ही कल्पना जर मनुष्य मर्त्य आहे या कल्पनेच्या अगोदरपासूनची आहे, तर प्राण अमर आहे ही त्यांची कल्पना असणें तर अधिकच स्वाभाविक दिसतें. देह अमर तर प्राण (‘स्पिरिट’) अमर ही कल्पना पहिलीबरोबर सहजच येते; आणि जोपर्यंत देह शाबूत आहे तोंपर्यत त्यांतला आत्माहि कायम राहतो ही इजिप्शियन लोकांमधील कल्पना व मृत शरीर मसाले घालून सुरक्षित ठेवून देण्याची त्यांच्यामधील चाल यांच्या कारणांचा सहजच उलगडा होतों पण हेंहि विवेचन जरा मुद्दयाला सोडूनच आहे. असो, प्रस्तुत मुद्दयासंबंधानें इतकें सांगितलें म्हणजे पुरे आहे कीं, मनुष्याच्या मर्त्यपणाची कल्पना जी कल्पना आजकाल सर्वांना अत्यंत स्वाभाविक व जन्मसिद्ध वाटते ती आपल्या आद्यकालीन पूर्वजांनां फार उशिरां आलेली असली पाहिजे.