प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
प्रस्तुताप्रस्तुतनिरीक्षण:- मूलग्रंथांतर्गत देय सत्य आणि अप्रस्तुत भाग यांचें पृथक्करण करणें ही भाषांतर शास्त्राची दुसरी पायरी होय. जेथें पाश्चात्त्यांचें ज्ञान द्यावयाचें आहे, तेथें पूर्वगत वादविवादापासून निर्णयांचे पृथक्करण करावें. उदाहरणार्थ, स्पेन्सरचें "रिलिजन" आणि "सायन्स" यांच्या संग्रामासंबधाचें विवेचन व निर्णय घ्या. याचें जशाचें तसें भाषांतर करण्यांत कोणताहि फायदा नाही. प्रथमतः, भाषांतरकारानें हे वादविवाद उदधृत करणें अवश्य आहे काय ? हा वादविवाद अजिबात वगळल्यास सर्व जगास लागु पडणारें असें कोणते तत्त्व सांगावयाचें सुटेल ? हा वादविवाद अजींबात वगळला तर जगद्विषयक व्यापक तत्त्व जरी सुटलें नाहीं, तरी पाश्चात्यांच्या विचार पंरपरेच्या व ज्ञानप्रगतीच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आपण वगळला असें होईल काय ? व जर तो भाग ठेवावयाचा असेल तर मुळांतील जीं विधानें आपण महाराष्ट्र वाचकांच्या समोर आणण्याचें साहस करीत आहों, तीं विधानें व वाक्यें, ऐतिहासिक दृष्टीनें पूर्णपणें समजण्यास सोपें जाईल असें वाङ्मय मराठींत आज तयार आहे काय ? नसल्यास ती अंगे समजावून देण्याची जबाबदारी घ्यावयास आपण तयार आहों काय ? हे प्रश्न आपल्या मनास विचारून काम करणें अवश्य आहे. कारण अनेक गोष्टी सांगतांना आणि अनेक सत्यें समजावून देतांना, प्रत्येक लेखकास आपल्या वाचकवर्गास अनुरूप अशा, म्हणजे स्थानिक व तात्कालिक महत्त्वाच्या परंतु त्या सत्याच्या ज्ञानाशीं निकट संबंध नसलेल्या, अनेक गोष्टींची चर्चा करावी लागते. त्या सर्वांचें स्पष्टीकरण करणें कोणाहि भाषांतरकारास शक्य नसतें. कित्येक शब्दांचा अर्थच स्पष्ट करण्यास बरीच ऐतिहासिक परंपरा द्यावी लागते.
ज्ञानकोशकारांस सत्यविषयक निर्णय द्यावयाचे आहेत. ते देतांना जर लेखकांस त्या निर्णयास साधक अशीं कारणें अवगत असतील तर तीं त्यांनी द्यावींत आणि तीं साधक कारणें देतांना अपरिचित उदाहरणांपेक्षां परिचित उदाहरणें असतील तर परिचित उदाहरणेंच दिलीं पाहिजेत. अपरिचित क्षेत्रांतील उदाहरणें देण्यास कारण परिचित क्षेत्रांतील उदाहरणांचा अभाव हेंच आहे काय, हा मनाशीं विचार करावा; अगर आपण परकीय उदाहरणें देऊन आपलें अज्ञान लपविण्याचाच प्रयत्न करीत आहों काय याचा आपल्या मनाशींच प्रामाणिकपणानें विचार करावा. परकीय उदाहरणें घेणें हा अधम पक्ष होय असें समजावें; आणि लेखकानें ही खूण गांठ मनांत बांधावी कीं, जर आपणास एतद्देशीय उदाहरणें देतां येत नसतील तर अनेक प्रंसगी तो विषयच आपणास पूर्ण समजला नाहीं, हेंच कारण मुळाशीं असेल.