प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
ज्ञानप्रगतिघटक.— आपलें ज्ञान शास्त्रस्वरुपांत येत चाललें म्हणजे त्या प्रगतींत दोन कारणें किंवा दोन घटक दृष्टीस पडतात. पहिला घटक म्हटला म्हणजे, कोणत्याहि भावाविषयीं अगर वस्तूविषयी आपल्या ज्ञानांत झालेली प्रगति; आणि दुसरा घटक म्हटला म्हणजे त्या ज्ञानक्षेत्राच्या अधिष्ठानविषयामध्यें अगर वस्तुस्थितीमध्यें झालेली प्रगती. जीं शास्त्रें मनुष्यविषयक किंवा विशेषेंकरून मनुष्यसमाजविषयक आहेत, त्यांमध्येंच दुसरा घटक महत्त्वाचा आहे. प्राणिशास्त्रांत अगर वनस्पतिशास्त्रामध्यें, या शास्त्राचे प्राणि आणि वनस्पति हे जे विषय आहेत त्यांवर मनुष्य आपल्या बुद्धीनें परिणाम घडवूं लागला म्हणजेच कायती अभ्यासक्षेत्राच्या भावांत प्रगति होते. झाडें, घोडे, गुरें यांच्या नवीन मिश्र जाती मनुष्य उत्पन्न करूं शकतो, आणि त्यामुळें भावांचीच वाढ होते. हा अपवाद सोडून दिला तर भावविषयमूलक संवर्धन प्राणिशास्त्रांत व वनस्पतिशास्त्रांत होत नाहीं. जीवि वर्गाच्या (प्राणि आणि वनस्पति या वर्गांच्या) होत असलेल्या विकासपरंपरेंत कांहीं नवीन प्रकारचे जीवी तयार झाले असतील. परंतु ते लक्षांत घेतां येत नाहींत. जीवीमध्ये विकासमूलक प्रगति झाली आहे. परंतु या प्रगतीचें ज्ञान केवळ अनुमानमूलक आहे; प्रत्यक्षमूलक नाहीं. आणि एक हजार वर्षांपूर्वीचें प्रत्यक्षमूलक जें ज्ञान असेल आणि आजचें प्रत्यक्षमूलक जें ज्ञान आहे त्यांतील भेद हा प्रत्यक्ष व अनुमान यांच्या संचयानेंच झाला आहे. प्रत्यक्ष विषयाच्या नवीन उत्पत्तीमुळें झालेला नाहीं, असे विरूद्ध पुरावा येईपर्यंत गृहीत धरून चालावयास हरकत नाहीं.