प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
पाश्चात्त्यांतील शास्त्रज्ञ, आणि त्यांच्या लेखांचें वाङ्मयस्वरूप, आणि वाङ्मयोत्पादकांचें शास्त्र ज्ञान:- शास्त्रीय विद्वानांचे ग्रंथ खुद्द शास्त्र या विषयाइतकेच रूक्ष, नीरस आणि ओबडधोबड भाषेंत केवळ सत्यासत्य गोष्टी लिहिलेले असे असावयाचे असें वाटतें. तथापि एक शतकापूर्वी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेला आणि आजकाल तर भाषा कौशल्यपटु म्हणून गणला जाणारा वूफां हा व्यवसायदृष्ट्या. भौतिकशास्त्रज्ञ होता. त्याच्यापेक्षांहि अधिक प्रंचड आणि त्याशी समकालीन असा फ्रान्सचा लेखकशिरोमणि व्हॉलटेर यालाहि बडा शास्त्रज्ञ म्हणून मिरविणें कमीपणाचें वाटत नसे. तसाच इटालियन भाषेंतील जगद्विख्यात कवि डाँटे हा तत्कालीन शास्त्रीय ज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्यें माहितगार होता. शेक्सपियरच्या तोर्डाच्या थोडक्या इंग्रजी लेखकांपैकी एक कवि जो कीट्स त्यास वैद्यकीच्या धंद्याचें शिक्षण मिळालेलें होतें. गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या लेखनांत सुबोधतेच्या गुणाबद्दल प्रसिद्ध असलेला कवि गोल्डस्मिथ हा धंदेवाला वैद्यच होता. शिलर हा जर्मनीचा दुसर्या नंबरचा म्हणून गणला जाणारा कवीहि त्याच धंद्यांतला होय; आणि जर्मन भाषेंतला अग्रगण्य लेखक, अद्वितीय कवि गोएटे ज्याच्या अलौकिक बुद्धिसामर्थ्यानें “ जर्मन भाषेला वाङ्मय निर्माण करण्यांचे साधन या अर्थानें नवा उच्च दर्जा प्राप्त करून देण्यांत आला ” त्या गोएटेनें ज्याला वाङ्मय म्हणतां येईल अशी एक ओळहि जरी लिहिली नसती तरी त्याचें नांव शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रांतील एक संशोधक या नात्यानें चिरकाल स्मरणांत राहण्यासारखी कामगिरी त्यानें केलेली आहे. अमेरिकेकडे वळलें तरी तेथें आपणांस असें आढळून येतें कीं, युनायटेड स्टेट्सनां ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतीचें स्वरूप होतें त्या वेळच्या सुप्रसिद्ध लेखकांपैकीं एक बडा लेखक फ्रँक्लिन हा शास्त्रज्ञ म्हणूनहि तितक्याच मोठ्या योग्यतेला चढलेला होता; तसेच नंतरच्या काळांतल्या कवीपैकीं अत्यंत मनोहर कविता लिहिणारा जो होल्मस् याचा मूळ द्रव्यार्जनाचा धंदा वैद्यकी हा असून शारीरशास्त्रांत तर तो विशेष प्रवीण होता.
यासंबंधानें आणखी उदाहरणे हुडकीत न बसतां उपर्युक्त सुप्रसिद्ध उदाहरणांवरून इतके दिसून येण्यासारखें आहे कीं, जिला मनाची शास्त्राध्ययनोपयोगी ठेवण असें म्हणतात ती आणि काव्यालंकारमय भाषा लिहिण्याची माणसामधील शक्ति यांच्या मध्यें अवश्य विरोध असला पाहिजे असें नाहीं. तथापि हा कोटिक्रम सररहा लागू करतां कामा नये. शास्त्रीय ज्ञान या शब्दांचा व्यापक अर्थ घेऊन त्याखाली येणारें सर्व अवाढव्य शास्त्रीय लिखाण मर्यादित अर्थाच्या वाङ्मय ह्या शब्दाच्या व्याख्येखाली शब्दांची कितीहि ओढाताण केली तरी आणणें शक्य नाहीं. सर्वसाधारणपणें सर्व शास्त्रलेखक वर सांगितल्याप्रमाणें रूक्ष, नीरस भाषाच लिहितात. लेखनविषयावरून लेखकाची भाषापद्धति ठरत असते, आणि शास्त्रज्ञ मनुष्य म्हटला म्हणजे तो बोलून चालून रूक्ष शास्त्रीय सत्यांच्या पाठीस लागलेला इसम होय. चांगलें उच्च-वाङ्मय-लेखनकौशल्य असलेले इसमहि शास्त्रीय विषयांनां वाहून घेतलेले कोठें कोठें आढळतातं परंतु तेवढ्यानें पुष्कळसे शास्त्रज्ञ पूर्णपणें लेखनकौशल्यशून्य असतात ही वस्तुस्थिति झांकून जाणें शक्य नाही. इतकेंच नव्हे तर शास्त्रीय वाङ्मयामध्यें उच्च दर्जाचे म्हणून मानले जाणारे बहुतेक ग्रंथ त्यांतील भाषापद्धतीपेक्षां त्यांतील विषयामुळेंच महत्पद पावलेले आहेत; त्यांनां भाषासौंदर्याचे नमुने म्हणून कोणींच मानीत नाही.