प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
प्रागैतिहासिक गणित, आणि सामाजिक भावना:- शरीरसंबंधाचा विचार पुरा करून मनासंबंधाचा विचार करूं लागल्यास येथें आपणांस असें कबूल करावें लागतें की, या क्षेत्रांतहि मानसशास्त्र, गणितशास्त्र व अर्थशास्त्र या शास्त्रांनां आधारभूत असलेली प्राथमिक माहिती आद्यकालीन मानवांना होती, क्षुधा व क्षुधाशांति, प्रेम व द्वेष यांच्याशीं संबंध असलेल्या मानसिक संवेदना स्वत:च्या अन्तर्गत व्यापारांचें अवलोकन करण्याची जाणीव माणसाच्या बुद्धींत प्रथम उत्पन्न झाली तेव्हांपासून त्याच्या लक्षांत आलेल्या असल्या पाहिजेत. चार किंवा पांचपर्यत संख्या मोजण्याचें सामर्थ्य तर पशुपक्ष्यांच्या बुद्धींतहि असलें पाहिजे. कित्येक रानटी मानवजातीची प्रगति मात्र याच्या पुढें गेलेली आढळत नाहीं. तथापि सुधारलेल्या मार्गाला आपले जे आद्यकालीन पूर्वज लागलेले होते ते स्वत: च्या हातांपायांचीं बोटें मोजण्यास व त्यावरून भोंवतालच्या वस्तू पंचकडयांनी व दसकडयांनी मोजण्यास शिकलेले होते, यांत शंका नाही ( प्रकरण ३ पहा ). आतां त्यापुढें आणखी प्रगति त्यांची किती झाली होती ह्याबद्दल येथें विवेचन करण्याचा प्रयत्न करण्याचें कारण नाही; परंतु ऐतिहासिक काळांत आरंभीच गणितशास्त्रांत जी बरीच प्रगती झालेली दिसते तीवरून प्रागैतिहासिक काळांत गणितासंबंधाचें ज्ञान अगदीच अल्प नसले पाहिजे असें सहजच ठरतें. गणितांतील बेरीज व वजाबाकी यांच्या मूळ कल्पना खंडीभर पोरें सांभाळण्याचा भार वाहणार्या मातांनां प्रथम आला असावा; आणि गुणाकार व भागाकार यांच्या कल्पना अगदीं आद्यकालीन समाजांत अल्प प्रमाणांत प्रत्यक्ष पदार्थांची देवघेव करतांना प्रथम माणसांना होऊ लागल्या असतील, असें मानण्यास हरकत नाहीं.
राजकीय कल्पनांसंबंधानें विचार करतां असें दिसतें कीं, अगदीं प्रथम टोळ्या करुन राहण्यास सुरुवात झाली तेव्हांपासून मालकीसंबंधाच्या कल्पना निघाल्या असल्या पाहिजेत. तसेच समता आणि विषमता या दोन तत्त्वांचा उदय तेथपासूनच असला पाहिजे. प्रत्येक टोळींत इतर टोळ्यांहून कांहीतरी भिन्नता असणारच. ह्या भेदामुळेंच राजकीय भेद उत्पन्न होणें अपरिहार्य होते. समजा एका टोळीनें शिकारीस योग्य अशा एखादा भूभागाचा ताबा घेतला, व तेथें शेजारीं त्या टोळींतले लोक घरेंदारें करून राहूं लागले. अशा प्रदेशावर दुसर्या एखाद्या टोळीनें येऊन हल्ला केला कीं युद्ध सुरू होत असे, व त्याबरोबर मूळच्या टोळींतील सर्व लोक एकत्र जमून हल्ला करणार्या टोळीशीं लढू लागत. या गोष्टीवरून त्या टोळींतल्या लोकांत एकीची कल्पना व स्वत:च्या टोळीबद्दल हितबुद्धि उत्पन्न झालेली असल्याचें स्पष्ट दिसते; व देशाभिमान या गुणाची हीच पहिली पायरी होय., परंतु एका टोळीत दुसर्या टोळीविरूद्ध लढतांना एकी झालेली असली तरी टोळींतील माणसांत आपसांत स्पर्धा, मत्सर व द्वेष हीं नसत असें नाहीं. उलट टोळ्यातील लोकांची संख्या जसजशी वाढत जाई तसतसे असले मनोविकार अधिकच बळावत जात. दोन किंवा अधिक इसम एकत्र आले कीं, त्यांपैकी एक मुख्य व बाकीचे अंकित असा त्यांच्यामध्यें दर्जा उत्पन्न व्हावयाचाच. शारिरिक व मानसिक गुणांत न्यूनाधिक्य माणसांमाणसांत असतेंच, व त्याबरोबर श्रेष्ठ व कनिष्ठ अशी विभागणी होते; आणि पुढें पुढारी अनेक होऊन त्यामुळें निरनिराळे पक्ष उत्पन्न होतात. नंतर त्या सर्वांमध्ये कोणता तरी एक पुढारी सर्वांवर जय मिळवितो, आणि इतर सर्वांवर अनियंत्रित किंवा इतर पुढार्यांच्या सल्ल्याप्रमाणें अधिकार चालवूं लागतो. राजनीतिशास्त्राचा हाच मूळ उगम होय.