प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

अवरंगजेबाबरोबरच्या दोस्तीचा रंगपालट.- जयसिंगाच्या मार्फत ठरलेल्या तहानुसार विजापुरकरांवरील स्वारींत शिवाजीने जयसिंगास चांगली मदत केली. अवरंगजेबानें खूष होऊन शिवाजीला दिल्लीस बोलाविलें. पण या भेटीचे पर्यवसान शिवाजीला कैदेंत टाकण्यात आले. ही शिवाजीची गैरहजेरी व संकट म्हणजे नूतन संस्थापित मराठी सत्तेवर मोठाच प्रसंग होय. तथापि अवरंगजेबासारख्या बलाढ्य व दक्ष मोंगल बादशाहाच्या तावडींत सापडूनहि शिवाजी लवकरच सुटून सुखरूप दक्षिणेंत परत आला. अफजलखानाच्या भेटीप्रमाणेंच हा प्रसंगहि मोठा बिकट असून त्यांतून झालेल्या सुटकेचा विषय अद्भुतरम्य आहे. शिवाजीच्या गैरहजेरींत राज्यकारभाराचीं कामें सर्व अधिका-यांनी मोठ्या दक्षतेनें केलीं. वरील प्रसंगानें राज्य चालविण्याचा मराठ्यांच्या अंगी किती जोम आहे याची परीक्षा झाली, व शिवाजीला मोंगल दरबाराची प्रत्यक्ष माहिती मिळाली, असा या प्रसंगानें दुहेरी फायदा झाला.

या प्रसंगीं अवरंगजेबहि अत्यंत कावेबाजपणानें वागला. हातचें सावज सुटून गेल्यानें क्रोधवश होऊन लढाईचा प्रसंग न आणतां त्यानें पूर्वीचा पुरंदरचाच तह कायम करून शिवाजीच्या राज्यास मान्यता दिली. त्यांत अवरंगजेबाचा हेतु कांहींहि असो, पण शिवाजीला या मान्यतेचा फार फायदा झाला. विजापूर गोवळकोंडा, जंजि-याचा शिद्दी वगैरे मुसुलमानी राजे व सर्व लोकसमुदाय शिवाजीला राजा म्हणून मान देऊं लागले. हा फायदा पूर्ण पदरांत पडण्याकरितां शिवाजीनें दोन तीन वर्षे अवरंगजेबाशीं सख्य राखिले. नंतर १६७० मध्यें पुन्हां उत्तरेकडे वळून मोंगलांच्या मुलुखावर चढाई केली व मोंगल सैन्याशीं साल्हेर येथें सामना देऊन त्याचा पराभव केला.