प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शीख, रजपूत व मराठे यांच्या देशसंरक्षक प्रयत्नांची तुलना.- हिंदुस्थानच्या बुद्धोत्तर इतिहासांत परकी स्वा-यांशीं व परकी सत्तेशी दीर्घकाल झगडण्याचे प्रसंग हिंदुस्थानावर तीन वेळां आले. पहिल्या प्रसंग शकहूणांबरोबचा. हा झगडा दोन तीन शतकें चालवून हर्षवर्धनाच्या (इ. स. ६०० चा सुमार) हिंदुस्थानानें शकहूणांचें पूर्ण उच्चाटण केले होतें. दुसरा प्रसंग त्यानंतर चार शतकांनीं मुसुलमानी सत्तेबरोबर झगडण्याचा आला. शकहूणांपेक्षा ही मुसुलमानी सत्ता अधिक दूरवर म्हणजे दक्षिणेंत कृष्णातुंगभद्रेपर्यंत पसरल्यामुळें अधिक बद्धमुल झाली. शिवाय शकहूणांनां धर्मप्रसाराचें वेड नव्हतें, इतकेंच नव्हे तर उलट तेच भारतीय संस्कृतीचे अनुयायी बनत असा इतिहास आहे. मुसुलमानांनीं धर्मसत्ता व राजकीय सत्ता या दोहोंचा विळखा हिंदुस्थानाभोंवतीं घातला. असल्या मगर मिठींतून सुटका करून घेण्यास अर्थांतच अधिक प्रबल प्रयत्न व अधिक दीर्घ काळ लागला यात आश्चर्य नाही.

मुसुलमानांनी प्रथम (इ. स. १००१-१००६) जयपाळ व अनंगपाळ याचा पराभ करून पंजाब, नंतर (इ. स. ११९३) पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली, आग्रा वगैरे उत्तरहिंदुस्थान आणि पाल व सेन हीं घराणीं बुडवून बंगाल व बहार हे प्रांत जिंकले. अलाउद्दिन खिलजीच्या वेळीं (१२८९-१३१६) मुसुलमानांनी गुजराथेंतील वाघेला वंशातल्या कर्णराजाचा, व महाराष्ट्रांतील देवगिरी येथील यादव वंशांतल्या रामदेव व शंकरदेव यांचा पराभव करून गुजराथ व महाराष्ट्र काबीज केला. नंतर अगदीं दक्षिण हिंदुस्थानांत स्वा-या सुरू झाल्या. इ. स. १३०९ मध्यें मलीक काफूरने तेलंगणांतील वरंगूळचे राज्य आणि इ. स. १३१० मध्यें म्हैसुरांतील होयसळ बल्लाळांची द्वारसमुद्र राजधानी बुडविली. सन १३२६ मध्यें वरंगूळचा कायमचा पाडाव झाला. येणें प्रमाणें चवदाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशींत सर्व हिंदुस्थान मुसुलमानमय झालें होतें. जिकडे तिकडे हिंदूंचा पाडाव झाला, पुरातन राज्यें लयास गेलीं व प्राणाहूनहि प्रिय जो हिंदुधर्म व भारतीय स्त्रियांची अब्रू ती बुडण्याचा समय प्राप्त झाला. गुजराथ व बंगाल तर कायमचेच मुसुलमानी सत्तेखालीं राहिले. अशा संकटसमयीं अघातास प्रत्याघात या न्यायानें हिंदूंनीं आपलें डोकें पुनरपि वर काढण्यास जी सुरूवात केली ती पुनरुद्धाराची लाट साहजिकच प्रथम अगदीं दक्षिणेंत उद्भवली. तुंगभद्रेच्या कांठीं विजयानगर येथें इ .स. १३३६ मध्यें माधवाचार्य ऊर्फ विद्यारण्य ह्या विद्वींन् मुत्सद्ययाच्या शिवणीनें हरिहर व बुक्क यांनीं हिंदुराज्य स्थापलें. हेंच विजयानगरचें सुप्रसिद्ध हिंदु राज्य होय. दुसरा प्रयत्न शिखांचा गुरू नानक (जन्म १४६९) याचा. तो राजकीय नसून धार्मिक स्वरूपाचा, सलोख्याचा व सामदामाचा होता. पुढे त्याचें रूपांतर लष्करी विरोधांत होऊन शिखांनीं पंजाबप्रांत मुसुलमानांच्या तडाख्यांतून थोड्या फार अंशानें सोडवून आपलें स्वतंत्र राज्य इ .स. १८४९ पर्यंत टिकविलें. तिसरा प्रयत्न रजपुतांचा. त्यांनीं प्रथम राजपुतान्यांत व अबूचे पहाडांत पिछेहाट करून व नंतर मोंगल बादशाहांशीं सोयरिकी करून आपला व आपल्या प्रांताचा बचाव कसाबसा केला. रजपुतांचीं लहान लहान राज्यें प्रथम मोंगलाचें व नंतर ब्रिटिशांचें मांडलिकत्व पत्करून अद्यापहि जिवंत आहेत. यानंतर शेवटचा व सर्वांत महत्त्वाचा प्रयत्न मराठ्यांचा होय. शिवाजीनें महाराष्ट्र मुसुलमानांच्या सत्तेखालून सोडवून स्वतंत्र मराठी राज्य स्थापलें व त्याचें पेशव्यांनीं मराठी साम्राज्य बनवून मुसुलमानांची हिंदुस्थानांतील सत्ता जवळ जवळ नामशेष केली. तात्पर्य, मुसुलमानी सत्ता नष्ट करण्याकरितां पंजाब, राजपुताना, महाराष्ट्र व दक्षिणहिंदुस्थान मिळून जे चार प्रयत्न झाले त्यांपैकीं महाराष्ट्रांतील मराठ्यांचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे सर्व हिंदुस्थानाला मुक्त करण्याकरितां झाला व तो ब-याच अंशानें यशस्वी झाल्या. हा मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमानास्पद विशेष होय.

मराठ्यांच्या इतिहासाचा दुसरा अभिमानास्पद विशेष म्हणजे त्यांचा अधिक स्पृहणीय धर्माभिमान व परधर्म सहिष्णुता. पंजाबांतील हिंदूंनीं मुसुलमानांपासून स्वतःचा बचाव करण्याकरितां एक नवाच मिश्र धर्म स्थापण्याची युक्ति योजिली. पण त्यांच्या या प्रयत्नांत सनातन हिंदुधर्माचा त्याग हा गौणपणा येतो. शीखांचीं धर्मतत्वें अधिक उच्च म्हणून ती हिंदुधर्माची सुधारलेली आवृत्ति आहे असें त्याला स्परूप दिलें तरी राष्ट्रीय दृष्ट्या शीखांच्या प्रयत्नाचें गौणत्व मान्य करावें लागतें. रजपुतांच्या प्रयत्नांतहि असाच धार्मिक दृष्ट्या गौणपणा आढळतो. त्यांनीं धर्मत्याग केला नाहीं तर धर्माचा खंबीर आधार जो स्त्रिया त्या मुसुलमान बादशहांनां दिल्या आणि 'स्त्रीपु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। संकरो नरकायैव' इत्यादि श्रीकृष्ण वचनाप्रमाणें आपल्या प्रयत्नाला गालबोट लावून घेतलें. या दोषास्पदतेची जाणीव खुद्द रजपुतांच्याहि मनाला खात होती. कारण उदेपूरचा राणा अमरसिंह यानें सर्व रजपुतांचें एकीकरण करण्याकरितां मुसुलमानांशीं ज्यांनीं सोयरिकी केल्या होत्या त्या रजपूत संस्थानिकांशीं संबंध ठेवावयाचा नाहीं हा आपल्या पूर्वजांचा नियम सैल केला तेव्हां सर्व रजपूत राजांत असा एक ठराव झाला होता कीं मेवाडच्या घराण्यांतील कन्या ज्या राज्यांत दिली असेल त्यांत त्या कन्येचा मुलगा लहान किंवा मोठा कसाहि असला तरी तोच गादीचा वारस समजला जावा. मराठ्यांनीं मात्र धर्माच्या बाबतींत विशेष स्पृहणीय धोरण स्वीकारलें. त्यांनी शीखांप्रमाणें धर्म सोडला नाहीं, मुसुलमानांचा उलट सूड म्हणून मशिदी फोडल्या नाहींत, किंवा मुसुलमान मुल्लांच्या किंवा स्त्रीपुरुषांच्या क्रूरपणानें कत्तलीहि केल्या नाहींत. शीखांनां हा डाग लागला आहे (सरदेसाईकृत मुसुलमानी रिसायत पान ८१८). अगदीं शिवाजीच्या वेळेपासून मुसुलमानांच्या मशिदी वगैरेंचीं वतनें बिनहरकत चालत होतीं. तसेंच रजपुतांप्रमाणें मुसुलमानांशीं सोयरिक करण्याचा कमकुवतपणाहि मराठ्यांनीं दाखविला नाहीं. तात्पर्य स्वधर्माभिमाने व परधर्मसहिष्णुता या दोन्ही गुणांत महराठ्यांचें धोरण निष्कलंक व वाखाणण्यासारखें होतें यांत शंका नाहीं.

आतां देशाभिमानासंबंधानें विचार करूं. यासंबंधी इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे म्हणतातः ''मराठ्यांमधला प्रमुख दुर्गुण म्हटला तर देशभिमानाचा बहुतांशीं अभाव हा होय. या सदगुणाची पैदासच जर मुळीं हिंदुस्थानांत अत्यल्प होते तर महाराष्ट्राच्या वाटणीस त्यांतला कितीसा अंश येणार ! कोणीहि परके लोक आम्हांवर स्वा-या करोत आणि आमचीं राज्यें बळकावोत, आमच्या ग्रामसंस्था, धर्मसमजुती, रीतिरिवाज, वतनहक्क यांत राज्यकर्ते जोंपर्यत हात घालीत नाहींत तेथपर्यंत ते लोक कोण आहेत, काय करतात याची आम्ही पंचाईत करीत नाहीं.'' रा. न. चिं. केळकर यांचें मत असेंच आहे तें वर दिलेंच आहे. राष्ट्राभिमान, देशाभिमानं यांचें अस्तित्व किंवा अभाव केवळ परसत्ता पाहून किंवा मधून मधून होणा-या फंदफितू-या पाहून किंवा व्यक्तिविषयक स्वार्थपरायणतेचीं कांहीं ठळक उदाहरणें पाहून ठरविणें युक्त नाहीं. बुद्धोत्तर हिंदुस्थानाच्या इतिहासांत अलेक्झांडरपासून ज्या अनेक परकी स्वा-या झाल्या त्यांनां तोंड देण्याकरितां व बद्धमूल झालेलीं परकीं राज्येंहि नष्ट करण्याकरितां कोणी कोणी कसे प्रयत्न केले त्यांचा उल्लेख या विभागांत जागोजाग झाला आहे. हा सर्व इतिहास लक्षांत घेतां, परकी सत्तेखालीं भारतीय राजे किंवा भारतीय जनता स्वस्थ मनानें सुखासमाधानांत नांदत होती असा आरोप करणें युक्त होणार नाहीं. हिंदुस्थानांत घुसणा-या किंवा घुसलेल्या परकीयांनां देशाबाहेर काढावें म्हणून अलेक्झांडरच्या ग्रीकांबरोबर पारेस व चंद्रगुप्त, बॅक्ट्रियाच्या ग्रीकांबरोबर पुष्यमित्र, शकांबरोबर विक्रमादित्य व पुलुमायी शातकर्णी, युएची लोकांबरोबर समुद्रगुप्त, श्वेतहूणांबरोबर यशोधर्मा व श्रीहर्ष, महमद गज्नवीबरोबर अनंगपाळ व जयपाळ, महंमंदघोरीबरोबर पृथ्वीराज, अहमदशाहा अबदालीबरोबर सदाशिवराव, वगैरे अनेक वीर लढले, ते देशाभिमानाशिवाय केवळ स्वार्थाकरितांच लढले असा निष्कर्ष काढणें चुकीचें होईल. शेंकडों हिंदू राजे, हजारों सेनापती व लाखों सैनिक बुद्धोत्तर काळांत परकीयांबरोबर लढतांनां धारातीर्थी पतन पावले आहेत, त्या सर्वांवर स्वार्थपरायणतेचा शिक्का मारणें म्हणजे मनुष्यस्वभावाविषयीं आज्ञान व्यक्त करणें होय.