प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शिद्दयाशीं संबंध व आरमाराची वाढ.- जंजीरा काबीज करून शिद्दयास तेथून हांकून लावावें अशी शिवाजीची फार इच्छा होती, परंतु अखेर पावतों ती सफळ झाली नाहीं. शिवाजी व शिद्दी यांचे अनेक युद्धप्रसंग झाले व त्यांत कित्येक वेळां शिवाजीनें त्यास जेरीसहि आणलें होतें. तथापि त्याला मोंगलांचें साहाय्य असल्यामुळें त्याला समूळ उच्छेद होऊं शकला नाहीं. शिद्दी आपल्या पराजयाचा वचपा काढण्याकरितां शिवाजीच्या राज्यांत स्वा-या करून त्याच्या प्रजेची कत्तल करी व त्यांचीं बायकापोरें पकडून त्यांनां बाटवी किंवा गुलाम म्हणून विकी. यामुळें शिवाजीस शिद्दयावर दाब ठेवण्यासाठीं आपलें स्वतंत्र आरमार तयार करावें लागलें. हें आरमार वाढत वाढत इतके वाढलें कीं, आरंभीं त्यामध्यें मोठी लढाऊ जहाजें तीन होतीं तीं त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस साठांवर गेलीं. मोंगलांचा व विजापुरकरांचा बंदोबस्त करून या आरमाराच्या साहाय्यानें शिवाजी शिद्दयाचें पारिपत्य करणार तोंच इ. स .१६८० त तो एकाएकीं मरण पावला.