प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शाहूच्या व्यवस्थेंतील दोष :- शाहूच्या स्वार्थत्यागानें मराठी राज्याचें आत्यंतिक कल्याण झालें असें मात्र मुळींच नाहीं. आजचें मरण उद्यांवर ढकलेले गेलें इतकेंच काय तें झालें ! असें होण्याचें कारण धड ना धनी ना नोकर अशी पेशव्यांची स्थिति हेंच होय. शाहूच्या ज्या सनदेनें पेशव्यास अधिकार मिळाला त्याच सनदेने मराठी राज्यांत आपआपल्या क्षेत्रापुरते असंख्य पेशवे आपोआप निर्माण झाले! राज्यकारभाराचें सर्व चातुर्य काय तें ‘जुनें मोडूं नये नवें करूं नये' या वाक्यद्वयांत समाविष्ट होऊन बसलें ! महाराजांच्या वेळचे सरंजाम, तैनाता, अधिकार या सर्वांस मिरासदारीचा हक्क प्राप्त झाला ! पेशव्यांस एखादा किल्ला पाहिजे असला तरी त्यास किल्लेदाराचा मिराशी हक्क आडवा येऊं लागला ! कारण कीं, सरकारचें धान्य, खजिना व बंदिवान हे सर्व हवालीं करून घेऊन राखणें व परचक्र आलें. तर त्याशीं लढाई करणें हे जेथपर्यंत आपण करीत आहों, जेथपर्यंत आपण राज्याशीं हरामखोरी केलीं नाहीं. तेथपर्यंत आपणांस काढण्याचा पेशव्यांस अधिकार नाहीं, हें किल्लेक-यास माहीत होतें ! एखाद्या शंभर स्वारांच्या पथक्यास तूं स्वारांचें पथक मोडून पायदळाचें पलटण तयार कर असे पेशव्यांनीं सांगितले तर तो पथक्या म्हणणार कीं, महाराजांच्या वेळेस जसा सरंजाम होता तसा बाळगून मी चाकरी करीत आहे. त्या बाहेरची गोष्ट मला करावयास सांगण्याचा तुम्हास अधिकार नाहीं! यद्यपि एखादा पथक्या कबूल झाला, तरी त्याचे कारभारी, मुजुमदार, फडणीस व स्वारसुद्धां असली गोष्ट कबूल करावयाचे नव्हत ! कारण तेंहि सारे मिरासदारच ! महादजी शिंद्यानें पलटणें तयार केलीं तीं दिल्लीच्या बादशहाच्या दौलतींतून ! तें काम तो मराठी राज्याच्या उत्पन्नांतून करूं जाता तर मिरासदारांनीं उलट त्याचेंच उच्चाटन केलें असतें ! या मिरासदारीमुळें सरदारांस भय नाहींसें झालें, कशीबशी चाकरी करून दिवस काढण्याची चाल पडली, आणि त्यामुळें राज्याची वाढ खुंटली, राज्यांतल्या फौजा गोळा करून पेशव्यानें परमुलुखीं स्वा-या करून महाराष्ट्रात दौलत आणावी, राज्य वाढवावें, व त्यांतलें तेज व उत्साह कायम राखावा, अशी शाहूची मनीषा होती. एक दोन पेशवे बरे निघाले तोंपर्यत त्या मनीषेचें साफल्य होत गेलें. परंतु पुढें तो प्रकार बंद पडताच मराठी राज्य इंग्रजांच्या तडाख्यानें कपाळमोक्ष करून घेण्याची वाट पहात बसले !!!

सातारच्या महाराजांस नामधारी बाहुलें करून पेशव्यांनीं राज्याधिकार भोगला असें म्हणण्याची प्रवृत्ति पडली आहे. परंतु तो केवळ त्यांचाच अपराध नसून त्या कालमहिम्याचा अपराध होता हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. त्या काळची स्थिति पाहतां हैद्राबाद, म्हैसूर, अर्काट, मुर्शिदाबाद, दिल्ली वगैरे ठिकाणीं तोच प्रकार चालू होता असें कोणासहि दिसून येईल. जुने वृक्ष मोडून पडल्यामुळें त्यांच्या बुंध्यांपासून नवे कोंब उत्पन्न होऊन जोरानें वर येण्याचा तो काळ होता. असो.