प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शिवाजीच्या चरित्राचें पर्यालोचन.- मराठी राज्यस्थापनेच्या दृष्टीनें शिवाजीच्या चरित्राचें निरीक्षण करूं गेलें असतां त्याच्या आयुष्याचे स्थूल मानानें आठ आठ वर्षांचे पांच व दहा वर्षांचा एक असे सहा विभाग पाडतां येतात. यांपैकीं पहिला विभाग म्हणजे बाळपण. हा काळ इ. स. १६३० पासून १६३८ पावेतों येतो. त्यानंतरच्या आठ वर्षांत शिवाजीनें किंवा वस्तुस्थितीस धरून बोलावयाचें म्हणजे त्याच्या आईबापांच्या विश्वासू नोकरांनीं त्याच्या नांवावर शहाजीच्या जहागिरींतच एक चिमुकलें परंतु सर्वांशीं स्वतंत्र असें व्यवस्थित व नमुनेदार राज्य निर्माण केलें. ह्यापुढील शिवाजांचीं आठ वर्षें मुख्यतः किल्ले घेऊन व आसपासचा मुलूख कबजांत घेऊन ह्या राज्याचा बंदोबस्त करण्यांत गेलीं. यानंतर विजापुरकरांशीं युद्ध सुरू होऊन तेंहि पुढें जवळ जवळ आठ वर्षेंच चालले होतें. शहाजीच्या मध्यस्थीनें विजापुरकरांशीं समेट झाल्यावर, यापूर्वींच मोंगलांशीं सुरू झालेलें भांडण रंगांत आलें. हा औरंगजेब व शिवाजी यांचा सामना सुमारें १० वर्षेंपर्यंत टिकला. यापुढील आठ वर्षांतील शिवाजीची कामगिरी म्हटली म्हणजे विजापुरकरांशीं तंटा व दक्षिणदिग्विजय होय. कोंकण प्रांत हाताखालीं घालीत असतां शिवाजीचा जंजि-याच्या शिद्दयाशीं संबंध आला. त्यापासून व इतर श्वेतवर्ण दर्यावर्दी लोकांपासून आपल्या मुलखाचा बंदोबस्त करण्याकरितां शिवाजीनें आपलें आरमार तयार केलें. तथापि अखेरपर्यंत शिद्दयाचा प्रश्न शिवाजीच्या हातून सुटला नाहीं तो नाहींच.

शिवाजीच्या आयुष्याचें साद्यंत पर्यालोचन करावयाचें म्हणजे उपरिनिर्दिष्ट सहा भागांत कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या याचा पार्थक्यानें विचार करावयास हवा. यांपैकीं पहिल्या भागाचें पर्यवसान कोणत्या गोष्टींत झालें हें आपण वर पाहिजेंच आहे. तेव्हां बाकीच्या पांच भागांचा आढावा काढून शेवटीं ज्यामुंळें शिवाजीचें आरमार निर्माण झालें त्या शिद्दयाच्या लढ्याचें सामान्य स्वरूप ध्यानांत आणलें म्हणजे मराठी राज्यस्थापना कसकशी व कोणकोणत्या पाय-यांनीं झाली याची नीट कल्पना होईल.