प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शीख संप्रदायाचें स्वरूप.- इस्लामी धर्माचा प्रवेश हिंदुस्थानांत झाल्यापासून त्यांतील धर्मतत्त्वांची हिंदुधर्मतत्वांशीं तुलना साहजिकच सुरू झाली आणि जातिभेद वगैरे समाजविघातक प्रचार मोडून हिंदुमुसलमानांचें संमेलन करण्याचे प्रयत्न चालू होते. मुसुलमानांच्या प्रवेशास मूलतःच तलवारीच्या जोरावर बंदी करतां न आल्यामुळें पंजाबांतील हिंदूंनां ही तडजोडीची व समेटाची बुद्धि सुचूं लागली असावी. याच बुद्धीनें गुरु नानकानें (जन्म १४६९) आपल्या शीख पंथाची प्रस्थापना केली शीख संप्रदायाचीं प्रमुख तत्त्वें अशा तडजोडीच्या स्वरूपाचीं आहेत. तीं तत्त्वें येणे प्रमाणें (१) जगांत अल्ला किंवा राम, वगैरे विशिष्ट लोकसमुदायाचे पृथक पृथक देव नसून सर्व मानवजातीचा एकच देव आहे, (२) देवाचे अवतार व निरनिराळ्या मूर्ती या गोष्टी त्याज्य आहेत, सर्व माणसें एकाच ईश्वराचीं लेंकरें असल्यामुळें सर्वांचा दर्जा समान आहे. सबब कोणीहि जातिभेद मानूं नये; इत्यादि. या सर्वांहूनहि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदूंशीं किंवा मुसुलमानांशीं लष्करी सामना न करतां केवळ शांतताप्रधान मार्गांनीं स्वसंप्रदायाचा प्रसार करण्याचें व्रत आद्यगुरू नानक व तदनंतरचे पांच शीखगुरू त्यांनीं एकनिष्ठपणें पाळलें. मोंगल बादशाहा अकबर याची कारकीर्द या पंथाला विशेष अनुकूल गेली. सारांश कडव्या इस्लामी धर्माचा मूर्तिपूजक हिंदुधर्माबद्दलचा राग कमी करून इस्लामी धर्मप्रसाराला आळा घालणे हेंच शीखसंप्रदायसंस्थापकाचें उद्दिष्ट होतें असें म्हणावें लागतें.

तथापि या शांतताप्रधान संप्रदायास त्रास देण्यास मोंगल बादशाहांनीच सुरवात केली. अर्जुनमल्ल नांवाच्या शीख गुरुस १६०६ मध्यें मुसुलमानांनीं पकडून ठार मारलें. या कृत्यानें शीख लोक चवताळून गेले व शांततेचा बाणा सोडून देऊन ते लढाऊ बनले. औरंगजेबाच्या वेळीं नववा शीख गुरू तेघबाहाद्दर याचा वध (सन १६७२) करून शिखांचा बहुतेक नायनाट करण्यांत आला. तथापि दहावा शीखगुरू हरगोविंद यानें लष्करी पद्धतीवर नवीन प्रजासत्ताकमंडळ स्थापन केलें. औरंगजेबाच्या मरणानंतरचे दिल्लीचे पातशहा दुर्बल निघाल्यामुळें शिखांनां आपली सत्ता वाढविण्यास काल अनुकूल मिळाला. गुरुगोविंद (१६७५-१७०८) नंतरचे सर्व शीखगुरू धर्मोपदेशकापेक्षां सेनानायक म्हणून प्रसिद्ध आहेत.

पण या नव्या लष्करी स्वरूपामुळें शीख लोक १७०८ पासून १८०५ पर्यंत अधिकच कचाट्यांत सापडले. एका अंगानें दिल्लीच्या पातशहांनां व दुस-या अंगानें नादीरशहा अहमशहा यांनां तोंड देण्याचे प्रसंग त्यांच्यावर वारंवार आले. तथापि नादिरशहा व अहमदशहा हे दिल्लीची पातशाही खिळखिळी करून परत गेल्यानंतर मध्यंतरींच्या अंदाधुंदीच्या काळांत आपली सत्ता फैलावण्यास शिखांनां चांगली संधि मिळाली. अवरंगजेबाच्या कारकीर्दीत शिखांचा छळ झाला त्याचा सूड शीखांनीं बहादुरशहाच्या कारकीर्दींत बंदा नामक पुढा-याच्या नेतृत्वाखालीं मोंगलाच्या मुलुखांत चाल करून घेतला. उलट फर्रूखसेयर बादशहानें फौज पाठवून शिखांचा पराभव केला व बंदाला हाल हाल करून ठार मारिलें. पुढें अहमदशहा अबदाली मरण पावल्यानंतर पुन्हां शिखांनीं उचल केली व आपल्या लहान लहान टोळ्या बनवून लहान लहान राज्यें स्थापिलीं. त्यानंतर रणजितसिंग नामक पराक्रमी शीख राजानें (१७९९-१८६९) लहान लहान राज्यें मोडून आपलें एक मोठें राज्य बनविलें. या वेळी ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानांत बरीच वाढली होती. पण रणजितसिंगानें ब्रिटिशांबरोबर अखेरपर्यंत दोस्ती ठेविली. त्या वेळीं शीखांचे ९०,००० कवायती सैन्य होतें. रणजितसिंग वारल्यानंतर शीख राज्यांत अव्यवस्था माजली आणि अखेर तीनचार निकराचीं युद्धें होऊन ब्रिटिशांनी शिखांची सत्ता नष्ट करून पंजाब प्रांत जिंकून घेतला.

स्वातंत्र्यसंरक्षणाच्या कामीं शिखांनीं लाविलेला हातभार.- मुसुलामानी सत्तेला व धर्मप्रसाराला शिखांनी केलेला विरोध महत्त्वाचा होता यांत शंका नाहीं. शिखांच्या पराक्रमाच्या गोष्टी वाचतांना रजपुतांच्या पराक्रमांची आठवण होते. मुसुलमानांच्या लाटेबरोबर रजपूत मागें हटून राजपुतान्यांत व अबूच्या पहाडांत शिरले. पण शीख आघाडीवर नेट धरुन राहिले इतकेच नव्हे तर दिल्लीवाले व अफगाण सत्ता यांच्यामध्यें पाचरीप्रमाणे सापडले असतांहि त्यांनीं नामशेष होऊन न जातां अखेरपर्यंत आपलें हिंदराष्ट्रीयत्व कायम राखले हे त्यांस अत्यंत भूषणावह आहे. पुढें वेळ आली तेव्हां ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचें कामहि त्यांनीं पूर्ण राष्ट्रीय अभिमानाने केले. व्यक्तिगत शौर्यपराक्रमादि गुणांत इंग्रज सैनिकांसच काय पण जगांतील कोणाहि सैनिकास शीख हार जाणार नाहीत अशी ख्याति त्यांनी गेल्या महायुद्धांतहि कायम राखली आहे.