प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
शिवाजीचा जन्म व त्याचा काल.- अशा प्रकारच्या परिस्थितीमध्यें शिवाजीसारखा एखादा अलौलिक पुरूष जन्मास येऊन त्यानें मुसुलमानांच्या छळापासून आपल्या लोकांस सोडविण्याचा विडा उचलला तेव्हां त्याला महाराष्ट्रांतील त्रस्त झालेल्या लोकांनीं मनोभावानें साह्य केलें असल्यास त्यांत नवल नाहीं. शिवजन्माचा शक रायगड बखरींत १५४८ व इतर बखरींत १५४९ दिला असून ग्रँडडफच्या व किंकेड आणि पारसनीस यांच्या इतिहासांत ह्या दुस-या बखरीच्याच आधारावर शिवाजीचा जन्म इ. स. १६२७ च्या एप्रिल महिन्यांत (वैशाख शुद्ध २ स) झाला असें म्हटलेलें आहे. परंतु हा काळ चुकला असून जेधे यांच्या शकावलींत म्हटल्याप्रमाणें शिवाजीचा जन्म शके १५५१ च्या फाल्गुन वा ३ ला म्हणजे इ. स. १६३० च्या फेब्रुवारी महिन्यांत १९ व्या तारखेस शुक्रवारीं झाला होता असें आतां बहुतांशीं सिद्ध झाल्यासारखें झालें आहे. ह्याला पुरावा म्हणून रा. वासुदेव शास्त्री खरे यांनीं भारत इतिहाससंशोधक मंडळाच्या अष्टमसंमेलनांत वाचलेल्या आपल्या मालोजी व शहाजी नामक निबंधांत जो एक मुद्दा पुढें आणला तो असाः 'शिवाजीच्या प्रत्येक बखरींत, 'जाधवराव बरोबर मोंगल फौज घेऊन शहाजाचा पाठलाग करूं लागला तेव्हां शहाजीबरोबर जिजाऊ होती तिला शहाजीच्या स्वारीबरोबर धांवणें निभेना सबब शिवनेरीस जाऊन राहणें प्राप्त झालें व तेथेच ती प्रसूत होऊन तिला शिवाजी हा पुत्र झाला' असा मजकूर लिहिलेला असतो. परंतु १६२७ त लढाई बालेघांटाकडे चालली होती पश्चिमघांटाकडे तिचा संबंध नव्हता. उलटपक्षीं इ. स. १६३० त लढाईची धुमश्चकी सह्याद्रीच्या लागत्यास सुरू होती. इ. स. १६२७ त मोंगलांनां शहाजीचा निकरानें पाठलाग करण्यास विशेष निमित्त नव्हतें, पण १६३० त लोदांच्या बंडाचा बीमोड करण्यासाठीं शहाजीचा झपाट्यानें पाठलाग करण्याचें काम मोंगल सरदारांस खुद्द बादशहाच्या हुकुमानेंच करावयाचें होतें. अर्थात् यावरून शिवजन्माचा शक जेधेशकावलींत दिल्याप्रमाणें १५५१ हाच असणें अधिक संभवनीय दिसतें. तंजावरच्या शिलालेखांतहि शिवजन्माचा काळ हाच दिलेला आहे. भारत इतिहाससंशोधक मंडळाच्या नवम संमेलनांत ह्या विषयावर जो एक स्वतंत्र निबंध वाचण्यांत आला त्यांतहि निबंधकारांनीं (रा.चांदोरकर व दिवेकर) तंजावर येथें सांपडलेल्या शिवभारत ग्रंथाचा आधार दिला आहे.