प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
शाहूच्या मृत्यूबरोबर एकतंत्रीपणाचा लोप.- शाहूच्या ज्या सरदारानीं एवढे अवाढव्य नवीन राज्य संपादिलें ते प्रतिनिधि, दाभाडे, गायकवाड, भोसले व पेशवे हे होत. या सर्वांत पेशव्यांचे प्राबल्य विशेष होतें. किंबहुना बाकीच्या सरदारांनी जेवढे राज्य मिळविलें जवळ जवळ तितके एकट्या पेशव्यांनीं मिळविलें होतें. आपल्या अभ्युदयाचा उगम शाहूच्या कृपेपासून आहे हें ओळखून हे सर्व सरदार शाहूशीं नम्रपणानें व आज्ञाधारकपणानें वागत. तें त्यांचें वर्तन सर्वथा औपचारिक होतें असें वाटत नाही. त्यांत भक्तीचा व कृतज्ञेतेचा अंशहि अर्थात् असला पाहिजे. एवढ्यावरून राज्यांतले हे व दुसरे सरदार शाहूशीं जसे वागत होते तसे ते रामराजाशीं वागतील असा कांहीं नेम नव्हता ! स्वतःरामराजांत कांहीं राम नव्हता, त्या अर्थीं नुसत्या पोकळ छत्रपतिपदास कोण जुमानणार ? शाहूचें तेज, दरारा, सारें त्याचें त्याच्याबरोबर ! त्याशीं इमानेइतबारें वागण्याबद्दल सरदारांनीं घेतलेल्या आणाशपथा त्याच्या मागून गादीवर बसलेल्या रामराजाशीं पाळण्यास हे सरदार बांधले गेले नव्हते ! याचें कारण आपणा पौरस्त्य लोकांचे राजकीय कारभार संस्थाप्रधान नसून ते प्रायः व्यक्तिप्रधान असतात, असें खरेशास्त्री म्हणतात. शपथ घेणारा व घेवविणारा या दोहोंतून एक मेला कीं दुसरा वाटेल तें करण्यास मोकळा झाला ! शाहू मरण्याचा अवकाश कीं पेशव्यासुद्धां हे सारे सरदार रामराजा, सकवारबाई, ताराबाई व संभाजी या चौघांपैकीं कोणाचे तरी नोकर आपणांस म्हणवून घेणार, आणि स्वच्छंदचारी राजे बनून एकमेकांच्या उरावर बसणार या गोष्टी अगदीं उघड उघड दिसत होत्या.
संभाजीच्या जागीं त्याच्या दत्तकवंशासहि लेखण्याचें पेशव्यानें कबूल केल्यामुळें स्वतः बाळाजी नोकराच्या नात्यानें बांधला गेला व करवीरकर संभाजी मात्र, बेजबाबदार धनीपणा प्राप्त झाल्यामुळें पाहिजे ते करण्यास मोकळा राहिला तो राहिलाच ! त्यानें किती फितूर व दंगे केले तरी पेशवे आपलें राज्य घेतील हें भय त्यास कधींच वाटलें नाहीं !