प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

विस्कळित घडी सांवरण्याचा प्रयत्न (१७६१-१७७२). - पानिपतच्या पराभवानें मराठशाहीची घडी जी एकदां विस्कळीत झाली ती पुन्हां नीट कधीं बसली नाहीं. शाहूच्या मृत्यूनंतर मराठशाहीच्या शासनपद्धतींत जें एक विचित्र प्रकारचें स्थित्यंतर झालें, त्याला यशस्वी व चिरस्थायी स्वरूप देण्याकरितां पेशव्याच्या जागीं चांगल्या मुत्सद्दी व वजनदार माणसाची जरूर होती. हें कार्य साधण्यास लागणारे गुण नानासाहेब पेशव्यांत होते. परंतु तो मराठशाहींत एकसूत्रीपणा आणून देण्याची कांहीं खटपट करतो न करतो तोंच पानिपतच्या पराभवानें मराठशाहीस व खुद्द नानासाहेबांच्या मनासहि जबर धक्का बसला. नानासाहेब तर पानपतनंतर थोडक्याच महिन्यांनीं मरण पावला. परंतु मराठशाहीस थोरला माधवराव व नाना फडणवीस यांच्यासारखे कर्तृत्ववान्, पाठीराखे मिळाल्यामुळे तिचें मरण सुमारें अर्धशतक पुढें ढकललें गेलें. यापैकीं थोरल्या माधवरावाच्या अंगीं शूरत्व व मुत्सद्दीपणा हे दोन्हीहि गुण योग्य प्रमाणांत वास करीत होते. मराठशाहीच्या शत्रूंनीं चहूं बाजूंनीं उचल खाल्ली होती व जानोजी भोसले, रघुनाथरावदादा यांच्यासारखी खुद्द मराठशाहींतलीच मंडळी शत्रूशीं संगनमत करून मराठशाहीच्या मूळावर घाव घालीत होता, तरी त्या सर्वांचा बंदोबस्त करून मराठशाहीस पानिपतच्या पराभवापूर्वींचें वैभव प्राप्त करून देण्याच्या कामीं बरेंच यश मिळवितां आलें. तथापि काळाचा त्यावर अकस्मात घाला येऊन मराठशाहीच्या शासनपद्धतीस चिरस्थायित्व प्राप्त करून देण्याचे काम तसेंच अर्धवट राहिले. माधवरावाच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या घराण्यांत कोणी कर्तृत्ववान् पुरूष निपजला नाहीं. इतकेंच नव्हे, तर त्या घराण्यांतील पुरूषांतच अधिकारप्राप्तीकरितां इतकी चुरस लागली कीं, तीच शेवटीं विकोपास जाऊन तिनें मराठशाहीची पूर्णाहुति घेतली. नानाफडणविसाची कामगिरी ही कीं, तो अशा परिस्थितींतहि मराठशाहींतील मानानें केवळ आपल्याच नव्हे तर आपल्या धन्याच्याहि बरोबरीच्या सरदारांवर वचक ठेवून त्यांच्या करवीं हैदर, निजाम व इंग्रज या तानहि प्रबल शत्रूंशीं टक्कर देववून मराठशाहीचें वैभव आणखी वीस पंचवीस वर्षें टिकवूं शकला. परंतु अंतःकलहानें मराठशाहीची इमारत इतकी पोखरली गेली होती कीं, ती नानाफडणविसासारख्या बिनलढवय्या व दुय्यम अधिकाराच्या जागेवर काम करणा-या माणसाच्या हातून फार दिवस शाबूत राखली जाणें शक्य नव्हतें. थोरल्या माधवरावाच्या मृत्यूबरोबरच मराठशाहीचें वैभव पुन्हां प्राप्त होण्याची अशा नष्ट झाली, व त्यानंतर मराठशाही किंवा मराठ्यांचें साम्राज्य ही कल्पना केवळ तिच्या नांवातच अवशिष्ट राहिली. अर्थात् थोरल्या माधवरावांच्या मृत्यूंनंतरचा पेशवाईचा इतिहास, मराठशाहीचा -हास व नाश याच सदराखालीं येतो.

मराठ्यांचा विस्कळित घडी सावरण्याच्या प्रयत्नाचा इतिहास द्यावयाचा म्हणजे माधवरावानें उचल करून उठलेल्या निजामाचा, हैदराचा व उत्तरेंतील संस्थानिकांचा बदोबस्त कसा केला हे सांगितलें पाहिजे. हा इतिहास येणेंप्रमाणें:-

माधवराव पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं तेव्हां तो अल्पवयी असल्यामुळें त्याचा चुलता रघुनाथराव हा सर्व कारभार पाहूं लागला. पण लवकरच चुलत्यापुतण्यांचें जमेनासें होऊन रघुनाथरावानें निजामाच्या मदतीनें आपल्या पुतण्याचा पराभव करून सर्व सत्ता आपल्या हातीं घेतली. तथापि माधवरावाचें तेज फार दिवस छपून राहिलें नाहीं. लवकरच ताराबाईच्या मृत्यूमुळें जानोजी भोसल्यास सातारच्या निर्माल्यवत् झालेल्या रामराजास बाजूस सारून मराठशाहीचीं सूत्रें आपल्या हातीं घेण्याची इच्छा झाली; व तो निजामाची मदत घेऊन रघुनाथरावावर चालून आला. तेव्हां निजाम व पेशवे यांच्यामध्यें १७६३ सालीं राक्षसभुवन येथें जी लढाई झाली, तींत मुख्यत्वें करून माधवरावाच्या कर्तबगारीनेंच निजामाचा पूर्णपणें मोड होऊन मराठ्यांस जय मिळाला. या लढाईत माधवरावाच्या कर्तबगारीबद्दल निजामाची व रघुनाथरावाची खात्री होऊन त्यांच्याकडून माधवरावास त्याच्या हयातींत म्हणण्यासारखा त्रास झाला नाहीं. या प्रसंगीं भोसल्यानें आयत्या वेळीं पेशव्याच्या पक्षास मिळून त्यांच्याकडून जो मुलूख उकळला होता, त्यापैकीं बराचसा माधवरावानें १७६६ त व पुन्हां १७६९ त त्यावर स्वारी करून परत मिळविला.

मराठ्यांचा पानिपतच्या मोहिमेत पराभव झाल्याचें ऐकून दक्षिणेंत हैदर नामक म्हैसूरच्या राज्यांतील एका बंडखोर सरदारानें माधवराव अंतःकलहाचा व निजामाचा बंदोबस्त करण्यांत गुंतला होता तोपर्यंत तुंगभद्रेच्या पलीकडील मराठ्यांच्या स्वराज्यांतला शिंद्याचा सुभा हस्तगत करून तुंगभद्रेच्या उत्तरेस कृष्णानदीपर्यंतचा मराठ्यांचा मुलुख काबीज केला होता. त्याचा बंदोबस्त करण्याकरितां माधवरावानें त्यावर १७६४ पासून १७७२ पर्यंत जातीनें मोहिमा केल्या व त्याच्यापासून शिवाजीच्या मरणसमयीं शिवाजीच्या ताब्यांत जितका मुलूख होता त्यापैकीं बेंगरूळ परगणाखेरीजकरून बाकीचा सर्व म्हणजे शिरें, होसकोटें, थोरलें बाळापूर व कोल्हापूर हे चार परगणे व स्वतःहैदरच्या मुलुखापैकीं मदगिरी व गुरमकोंडा हे भाग मिळविले व बरीचशी खंडणीहि वसूल केली.

पानिपतच्या लढाईनंतर उत्तरप्रांती रोहिले, पठाण, अयोध्येचा नबाब व इंग्रज या सर्वांनीं मराठ्यांचे वर्चस्व कमी करण्याचा व त्यांचा मुलुख बळकाविण्याचा उपक्रम आरंभिला होता; व माळव्याच्या उत्तर, वायव्य व पश्चिम सरहद्दीवर रजपूत संस्थानिक, जाट व बुंदेलखंडातील संस्थानिक यांनी बंडळी माजविली. या सर्वांचा बंदोबस्त करणें पेशव्यांस भाग होतें. यांसाठीं उत्तरहिंदुस्थानांत पहिली मोहीम रघुनाथराव दादाच्या आधिपत्याखालीं इ. स. १७६५ त झाली. पण केवळ खेचीवाड व गोहद या दोन ठिकाणच्याच संस्थानिकांचे पारिपत्य करून विठ्ठल शिवदेवास मागें ठेवून रघुनाथराव परत आला. म्हणून १७६९ त रामचंद्र गणेश कानडे याच्या नेतृत्वाखालीं उत्तरहिंदुस्थानांत पुन्हां फौज रवाना करण्यांत आली. तिनें पुढील तीन वर्षांत उदेपूरकरांकडून २० लक्ष रुपये रोख खंडणी व ४० लक्षांकरितां राज्यांतील निरनिराळ्या प्रांतांवर तनखे करून घेतले; बुंदी व कोटा येथील संस्थानिकांपासून खंडण्या मिळविल्या; भरतपूरच्या जाटांचा पराभव करून ६५ लक्ष खंडणी आणि त्यानें बळकाविलेला आग्रा प्रांत व किल्ला परत घेतला; दोआबांतल्या अहमदखान बंगषास जेर करून त्यानें १७५१ त स्वतः दिलेल्या १६|| परगण्यांपैकीं जेवढा मुलुख बळकाविला होता तेवढा त्यापासून सोडविला; गंगापार रोहिल्यांच्या मुलुखांत लुटालूट, कत्तल व जाळपोळ करून पानिपतचा पुरा सूड उगविला आणि शहाअलम बादशहास दिल्लीच्या तख्तावर बसवून पेशव्याचा भाऊ नारायणराव याकरितां मोरबक्षीगिरी हे पद मिळविलें.