प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

मोंगलांशी सामने - रायमल्लाचा पुत्र संग्रामसिंह उर्फ संग याच्या कारकीर्दींत मेवाडच्या भाग्योदयाचा कळस झाला. त्यानें सर्व रजपुतांपासून करभार घेऊन व माळवा व दिल्ली येथील मुसुलमानी फौजांचा अठरा वेहां पराभव करून सार्वभौमाप्रमाणें अनेक वर्षे वैभव भोगिलें. परंतु शेवटीं फत्तेपूर शिक्रीच्या लढाईंत त्याचा पराजय होऊन रजपुतांचे वर्चस्व मोंगलवंशीय बाबर राजाच्या ताब्यांत गेलें. तथापि संगराण्याच्या पश्चात त्याचा तरूण पुत्र रत्नसिंह यानें मुसुलमानांचा निःपात करीपर्यंत विश्रांति घ्यावयाची नाही असा निश्चय केल्यामुळें बाबरास शिक्रीच्या जयाचा फायदा घेतां आला नाहीं.

रत्नसिंहाचा भाऊ विक्रमाजित याच्या कारकीर्दींत गुजराथच्या वहादुरशहानें पोर्तुगीझ अधिका-यांकडून तयार करविलेलें आपले कवायती सैन्य घेऊन चितोडवर स्वारी केली व सुरूंग लावून किल्ल्याचा तट तेव्हांच उडवून दिला. विक्रमाजिताच्या मदतीस कित्येक रजपूत राजे आले होते. त्यांचें कांहीं चालेना, तेव्हा त्यांनीं आपल्या स्त्रियांस दारुच्या भडक्यांत उडवून देऊन शस्त्रास्त्रांसहित शत्रूवर चाल केली, व धारातीर्थी आपले जीव बळी दिले (१५३६). तथापि बहादुरशहाच्या हातीं चितोड फार दिवस राहिलें नाहीं. बाबराप्रमाणेंच त्याचा पुत्र हुमायून याच्या मनांत चितोडच्या राण्यांविषयीं आदर वसत असल्यामुळें त्यानें बहादुरशहापासून चितोड घेऊन राण्याच्या वंशजाच्या स्वाधीन केलें. हुमायूनांनंतर त्याचा पुत्र अकबर यानें रजपुतांस आपले सार्वभौमत्व कबूल करावयास लाविलें व जयपूरचा राजा बहारमल्ल यानें तर त्याचा स्नेह संपादण्याकरितां त्यास आपली मुलगीहि दिली. इ. स. १५६७ त अकबरानें चितोडवर स्वारी केली. या प्रसंगीं चितोडचा उदयसिंह हा मुसुलमानांशीं तोंड न देतां पळून गेला; पण इतर सरदार नेटानें लढले व अखेर जय प्राप्त होत नाहीं असें दिसलें तेव्हां जोहार करून त्यांनीं रणांगणीं जीव दिले. या उदयसिंहानें आपल्या अज्ञातवासांत रानामध्यें जें एक खेडे वसविलें, तेथेच पुढें मेवाडची राजधानी होऊन ते उदेपूर या नांवानें प्रसिद्धीस आलें.

चितोड शत्रूच्या हातीं गेले तरी उदयसिंहाचा पुत्र प्रतापसिंह (राज्यारोहण १५७२) यानें अनेक यातना सोसून रजपुतांचे धैर्य व उमेद खचूं दिली नांहीं. याचा बराच काळ अकबराशीं लढण्यांत खर्च झाला. संकटकाळीं प्रताप राण्याला पुष्कळ साहाय्यकर्ते मिळाले व त्यानें हळू हळू मुलूख कमावून राज्यांत स्वस्थता केली. त्यानें ज्या रजपूत राजांनीं मुसुलमानांस आपल्या मुली देऊन त्यांचा स्नेह संपादिला होता व ज्या रजपूत ठाकरांनीं मुसुलमानी धर्म स्वीकारिला होता त्यांचा निषेध करून त्यांच्याशीं निष्कलंक राहिलेल्या रजपुतांनीं सोयरीक करूं नये असा ठराव केला. तथापि प्रतापसिंहास अखेरपर्यंत चितोड हस्तगत करतां आलें नाहीं. व त्यामुळें यापुढें उदेपूर हीच मेवाडची राजधानी झाली. प्रतापसिंहाचा पुत्र अमरसिंह यानें तर कित्येक वेळां मोंगलांच्या फौजेचा प्रत्यक्ष पराभव केला होता. पण तिच्याशीं झगडण्यांत आपला निभाव लागणार नाहीं असें पाहून अखेर तो जहांगिरास शरण गेला, व जहांगिरानेंहि इतके दिवस झालेली खराबी लक्षांत घेऊन अमरसिंहास सन्मानानें वागविलें.

जहांगिरच्या मुलांत तंटे लागले तेव्हां उदेपुरच्या राण्यानें शहाजहानास मदत करून त्यास आपल्या राजधानींत आश्रय दिला. त्या उपकाराबद्दल शहाजहानानें अधिकारारूढ झाल्यावर राण्यास फार सन्मानानें वागविलें. पुढें औरंगजेबानें रजपुतांबरोबर युद्ध सुरू केलें तेव्हां मेवाडच्या राण राजसिंह हा रजपुतांचा पुढारी बनला, व त्या हट्टी बादशहाचा या बाणेदार राजानें चांगलाच समाचार घेतला. त्यानें रुपनगरच्या ठाकुराची कन्या औरंगजेबाच्या तडाख्यांतून सोडवून तिला स्वतःवरिलें. औरंगजेबानें सर्व लष्करानिशीं मेवाडवर स्वारी केली तेव्हां तीन चार प्रचंड लढाया होऊन त्यांत औरंगजेबाचा पराजय झाला; आणि अत्यंत मानहानि व निरुपाय होऊन त्यास कसाबसा तह करून राजपुतान्यांतून पाय काढावा लागला (इ. स. १६८१).

राजसिंहानंतर त्याच्या तोडीचा पुढारी रजपुतांस मिळाला नाहीं व इ. स. १७०७ त औरंगजेब मरण पावल्यावर दिल्लीच्या तख्तावर बसलेले मोंगल बादशहाहि दुर्बलच निघाले.

  दक्षिणेंतील हिंदूंची उचल -  १ विजयनगरचा इतिहास