प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
मुसुलमानांचा महाराष्ट्रांत प्रवेश - १४ व्या शतकाच्या पूर्वार्धांत उत्तरेकडील मुसुलमानांनीं दक्षिणेंत येऊन तेथें आपली सत्ता प्रस्थापित करीपर्यंत या भागांत हिंदू राजेच राज्य करीत होते. इ. स. १२९४ त अलाउद्दीन खिलजी यानें दक्षिणेंत प्रथम स्वारी केली परंतु देवगिरीचा यादव राजा रामदेव याजकडून वार्षिक खंडणी देण्याचें अभिवचन घेऊन तो पुन्हां लागलीच उत्तरेस परत गेला. पुढें अलाउद्दिनाच्या कारकीर्दींत देवगिरीच्या यादवांनीं दिल्लीच्या बादशहास खंडणी पाठविणें बंद केल्यामुळें मलीक काफुर याच्या आधिपत्याखालीं उत्तरेकडील मुसुलमानांनीं दक्षिणेंत एकंदर तीन स्वा-या केल्या (१३०७-१२). यांपैकीं शेवटच्या स्वारींत रामदेवाच्या मागून गादीवर बसलेला त्याचा पुत्र शंकर हा ठार होऊन त्याची राजधानी देवगड मुसुलमानांच्या ताब्यांत गेली. पुढें अलाउद्दिनाच्या मरणानंतर दिल्ली येथें जो गोंधळ माजला त्याचा फायदा घेऊन रामदेवाचा जांवई हरपाळ यानें स्वातंत्र्याचें निशाण उभारुण कित्येक मुसुलमान सुभेदारांनां हांकून लावलें. परंतु इ. स. १३१८ त दिल्लीचा बादशहा मुबारिक यानें दक्षिणेंत स्वारी करून हरपाळ यास कैद केलें व त्याचा मोठ्या क्रूरपणानें अंग सोलून वध केला.