प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

मराठी सत्तेवरील संकट व त्याचें निवारण.- (१६८०-१७०७) मुसुलमानी सत्तेनें व्यापलेल्या हिंदुस्थानापैकीं एका प्रांताला म्हणजे महाराष्ट्राला पारतंत्र्यांतून मुक्त करणारा शिवाजी १६८० मध्यें मरून मोंगली सत्तेचा व धर्माचा कट्टा अभिमानी अवरंगजेब पुढें आणखी सत्तावीस वर्षें जगला हा दैवविलास चिंतनीय आहे. अवरंगजेब अगोदर मरून शिवाजी आणखी वीस पंचवीस वर्षें जगता तर महाराष्ट्राप्रमाणें इतर प्रांतांनां मुसुलमानी अमलांतून मुक्त करण्याचें अल्पावधींत साधलें असतें असें मानण्यास पुष्कळ जागा आहे. असो; वस्तुस्थिति अशी झाली कीं, शिवाजी अवरंगझेबाच्या अगोदर वारला, इतकेंच नव्हे तर त्याच्या राज्याचा वारस संभाजी हा दुर्व्यसनी अतएव नालायक निघाला. त्याच्या नालायकीची जाणीव असल्यामुळें शिवाजीच्या अंतकाळच्या सुमारास संभाजीऐवजीं त्याचा भाऊ राजाराम याला राज्यावर बसविण्याचें कारस्थान सोयराबाईनें कांहीं मंत्रिमंडळींच्या साह्यानें केलें. पण तें फसून व संभाजी राजा होऊन राज्यकारभारांत अव्यवस्था माजली. या संधीचा फायदा घेण्याकरितां अवरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशीं दक्षिणेंत चालून आला. त्या वेळीं पहिल्या सामन्यांत (इ. स. १६८३-१६८९) संभाजी अवरंगजेबाच्या कैदेंत पडून त्याचा वधहि झाल्यामुळें मोंगलांनां चांगलें यश मिळाल्यासारखें झालें. शिवाय १६८६ मध्यें विजापूरचें व १६८७ मध्यें गोंवळकोंड्याचें हीं दोन्ही मुसुलमानी राज्यें अवरंगजेबानें खालसा केलीं. अवरंगजेबाचा मराठ्यांबरोबर दुसरा सामना १६८९ ते १७०७ पर्यंत झाला. त्यांत आरंभीं संभाजीची बायको व मुलगा अवरंगजेबाच्या हातीं सापडलीं व मराठी राजा राजाराम याला दूर पळून जाऊन जिंजीच्या किल्ल्यांत मुसुलमानांच्या वेढ्यांत अडकून पडावें लागले. रायगड, पन्हाळा, विशाळगड, राजगड, तोरणा, रोहिडा वगैरे किल्ले एकामागून एक मोंगलांनीं घेतले. अशा रीतीनें शत्रू मराठ्यांच्या घरांत शिरून तें काबीज करून बसला. मराठ्यांच्या हिंमतीची, शौर्याची,  धाडसाची हुषारीची, युद्धकौशल्याची, राज्यकारभारपटुत्वाची, धर्माभिमानाची, स्वांतत्र्यप्रीतीची, हरएक गुणाची परीक्षा होण्याची हिच्यासारखी दुसरी वेळ क्वचित् आलेली आढळते. अशा वेळीं शिवाजीसारखा अद्वितीय नेता नसतांहि मराठी राज्याचा मालक राजाराम, त्याचे मंत्री रामचंद्रपंत व प्रल्हाद निराजी, आणि सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर, शंकराजी नारायण (पंतसचीव), वगैरे स्वातंत्र्यवीरांनीं अद्भुतरम्य कामगिरी बजावली. त्यांनीं मोंगल शत्रूला ज्या युद्धनीतीच्या बळावर जेरीस आणून परत फिरविलें व देशाचें स्वांतत्र्य रक्षण केलें, ती गनिमी काव्याची सुप्रसिद्ध युद्धनीति होय. या युद्धनीतीनें मराठ्यांनीं मोंगलापासून आपला मुलुख हळुहळु परत जिंकून घेतला. कोणताच मराठी राज्याचा भाग पूर्णपणें कायमचा ताब्यांत येईना म्हणून अवरंगजेब निराश होऊन आपल्या सरदारांना दोष देत अहमदनगर येथें अखेर १७०७ मध्यें मरण पावला. पण त्यापूर्वीं १७०० मध्यें राजाराम मरण पावून त्याची स्त्री ताराबाई हिनें आमला मुलगा शिवाजी यास राजाभिषेक करविला. तथापि राज्याचा खरा वारस संभाजीचा मुलगा शाहू हा अवरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेतून सुटून परत आला; व १७०८ मध्यें ताराबाई व शाहू या दोन पक्षांत युद्धप्रसंग होऊन त्यांत शाहू यशस्वी झाला व सातारच्या राज्यावर आला आणि ताराबाईनें कोल्हापुरास आपले स्वतंत्र राज्य स्थापलें.