प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
मराठी सत्तेच्या नाशाची कारणें.- या कारणांचा सविस्तर उहापोह रा. नरसिंह चिंतामण केळकर यांनीं आपल्या 'मराठे व इंग्रज' या पुस्तकांत केला आहे. इंग्रजांनां व्यापारास परवानगी देणें व प्रसंग विशेषीं इंग्रजांची मदत घेणें, ही कारणें किंवा जातिभेदामुळें राज्यनाश झाला, हें कारण अग्राह्य ठरवून केळकर म्हणतात, ''आमच्या मतें राज्य जाण्याचीं खरीं कारणें मुख्य अशीं दोनच आहेत. पहिलें, मराठ्यांमधील सवत्या सुभ्याची आवड आणि जुटीचा, शिस्तीचा व राष्ट्राभिमानाचा अभाव; आणि दुसरें, कवाइती लष्कर सुधारलेली युद्धसामुग्री यांचा अभाव. कवाईती फौजा व सुधारलेला तोफाखाना मराठ्यांजवळ व शीखांजवळ होता हें सिद्ध आहे. या बाबतींत हिंदी राजे फारसे मागासलेले राहात नसत. जपान व चीन लष्करी बाबतींत मागासलेले असूनहि स्वतंत्र राहूं शकले, तेव्हां हें स्वांतत्र्यनाशाचें प्रधान कारण होऊं शकत नाहीं. सरंजामी राज्यपद्धति व सवत्या सुभ्याची आवड या गोष्टींची पुनरावृत्ति जगाच्या इतिहासांत अनेक ठिकाणीं आढळते. साम्राज्यें वाढलीं म्हणजे दूरदूरचे प्रांत स्वतंत्र होण्याची धडपड करणारच. आजचें विसाव्या शतकांतलें ब्रिटिश साम्राज्य त्याच पेंचात सापडलेलें आहे. तथापि साम्राज्याला लगाम घालणारी मध्यवर्ति सत्ता खंबीर असली म्हणजे सर्व सुरळीत चालतें. प्रांतिक स्वांतत्र्य व मध्यवर्ति सत्ता यांचा मेळ घालून सुसंघटितता राखणें ही जबाबदारी केंद्रवर्ति सत्तेवर असते. बाजीराव, नानासाहेब व नाना फडनवीस यांनीं हीं कामें ब-याच हुषारीनें केलीं. पानिपतावर (१७६१) व खड्र्याच्या रणमैदानावर (१७९५) दूरदूरच्या मराठी फौजा एकत्र जमू शकल्या; आणि दुस-या बाजीरावाच्या वेळीं मात्र इंग्रजांबरोबर बाजीराव, होळकर व शिंदे पृथक् पृथक् लढले ! याचा गुणदोष केंद्रवर्ति सत्तेकडे आहे. कित्येक वेळीं मराठे सरदारांनीं लष्करी मदत देण्यांत कुचराई किंवा कधीं कधीं तर प्रत्यक्ष फितुरी केली. पण असले कुचराईचे प्रसंग गेल्या महायुद्धांत ब्रिटिश प्रधानमंडळालाहि गोड बोलून व राजकीय हक्क देऊं करून निभावून न्यावे लागले.
प्रत्यक्ष फितुरीला देहान्त प्रायश्चित शिवाजीनें अनेकदां दिलें. आजहि ब्रिटिश प्रधानमंडळ देतें रघुनाथराव, दुसरा बाजीराव, किंवा रघूजी भोसले असल्यांची उपेक्षा केली गेली हा मराठा मध्यवर्ति सत्तेचा मोठा दोष होय. तात्पर्य, मराठेशाहींत शिवाजीनंतर मध्यवर्ति सत्ता असावी तितकी जोरदार नव्हती, हें राज्यनाशाचें प्रधान कारण आहे. राज्यशासनशास्त्रांत यूरोपमध्यें १७|१८|१९ व्या शतकांत फार प्रगति झाली. ब्रिटिश मुत्सद्दी साम्राज्य चालविण्याचा अवघड प्रश्न मोठ्या चतुराईनें सोडवीत आहेत. हिंदुस्थानांत अशोक हर्षवर्धनासारखे कर्तृत्ववान् सम्राट अनेक झाले पण त्याबरोबर अराजकीहि अनेकदां माजली. कारण शुक्रनीतीपासून रामचंद्रपंताच्या 'राजनीती' पर्यंत. सर्व शासनशास्त्रविषयक ग्रंथांनीं कर्तृत्ववान् सम्राटाने राज्य कसें करावे हें उत्तम दिलें आहे, पण सम्राट दुर्बल निघाला तरी राज्यकारभार उत्तम रीतीनें कसा चालवावा हा अवघड प्रश्न कोठेंच सोडविला नाहीं. शिवाजीनें अष्टप्रधानमंडळ, पगारी नोकर, वगैरे घालून दिलेल्या पद्धतीऐवजीं जहागिरी वतनें व वंशपरंपरा अधिकार ही पेशवाईंतील पद्धति हें राज्यनाशाचें एक जबरदस्त कारण आहे. शाहूनें व पेशव्यांनीं सुरू केलेल्या सरंजामी पद्धतीचे दोष रा. वासुदेवशास्त्री खरे यांनीं दाखविले आहेत ते येणें प्रमाणें: ''सरदारांचें लक्ष्य सरकारी कामावरचें उडून आपापल्या सरंजामाकडे वेधलें गेलें; सरंजामदार मगरुर होऊन धन्यास उलट्या गोष्टी सांगूं लागले आणि स्वतंत्र होण्याची इच्छा करूं लागले; त्यामुळें राज्यांतलें ऐक्य नाहींसें होऊन राज्य बुडालें असें कांहीं लेखकांचें म्हणणें आहे, तें सर्वांशीं खरें नाहीं. तसेंच सरंजामी पद्धत सुरू केल्याचा दोष एकट्या शाहूवर अथवा पेशव्यांवरहि लादणें वाजवी नाहीं. मध्यवर्ति सत्ता खंबीर असली म्हणजे सरंजामी काय आणि इतलाखी काय, सर्वच नोकर नम्र व कर्तव्यतर्त्पर असतात. शिवाजीनें आपल्या सरदारांस सरंजाम दिले नसले तरी देशमुखीसारखीं वतनें दिलीं होतीं. आणि त्या वतनांबद्दल सरदारांस लष्करी चाकरी करावी लागे. हीं वतनें म्हणजे लष्करी सरंजामच नव्हेत काय ? त्या वेळीं सर्व हिंदुस्थानांत कमीजास्त मानानें ही सरंजाम देण्याची पद्धति प्रचलित होती. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड यांतले संस्थानिक आपणांस दिल्लीच्या बादशहाचे सरंजामदारच म्हणवीत होते. रोहिले, पठाण व शीख यांचे सरदार सर्व सरंजामीच होते. मग शाहूनें अगर पेशव्यांनीं रोख पैका देण्याची सोय नसल्यामुळें आपल्या सरदारांनां सरंजाम तोडून दिले यांत काय बिघडलें ?
''सरंजामी पद्धत जारीनें अंमलांत आल्यामुळें तिच्या योगानें परिणामीं राज्यास बळकटी यावी ती न येतां दुर्बळपणाच आला असें मीहि म्हणतों, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ मात्र निराळा आहे. अजमासें १७२०|२५ पासून १७६० पर्यंत मराठ्यांच्या परमुलखीं स्वा-या होत होत्या. जो मुलुख ज्या सरदारानें काबीज करावा तोच मुलुख त्या सरदारास महाराजांनीं सरंजाम करून द्यावा. पुन्हां त्या सरदारानें आणखी मुलुख घेतला तर तोहि फौजेच्या खर्चाकरितां महाराजांनीं सरंजाम म्हणून नेमून द्यावा, असें होऊं लागलें; तेव्हां शूर व उत्साही सरदारांत महत्त्वाकांक्षा उत्पन्न होऊन परमुलुखावर स्वा-या कराव्या, लढाया माराव्या, लुटीवर पोट भरावें आणि प्रदेश काबीज करवेल तो महाराजांकडून सरंजाम म्हणून मिळवून आपली सरदारी कायम करावी, आपलें घराणें कीर्तिमंत व वैभवसंपन्न करावें असें ज्या त्या सरदाराच्या मनांत येऊं लागलें. नंतर हजारों स्वारांच्या झुंडी गोळा करून हे सरदार यंदा माळवा, पुढच्या वर्षीं गुजराथ, त्याच्या पुढच्या वर्षीं दुसराच एखादा प्रांत, याप्रमाणें निरनिराळ्या प्रांतांत मोहिमा करूं लागले. शाहूमाराजांनीं आपल्या ह्यातींत जें हें मोहिमांचें सत्र सुरू करविलें तेंच पुढें नानासाहेब पेशव्यांनीं चालू ठेविलें. त्याचा परिणाम असा झाला कीं, दक्षिणेकडे म्हैसून, अर्काट, त्रिचनापल्लोपर्यंत आणि उत्तरेस दिल्ली, पंजाब, आग्रा, अयोध्या, रोहिलखंडपर्यंत सर्व देशांतून मराठ्यांचा व्याप पसरला. पण मराठ्यांनीं जर हें एवढें राज्य १७२० पासून १७६० पर्यंत मिळविलें तर तें पुढच्या चाळीस वर्षांत घालवूनहि टाकिलें ! ईस्ट इंडिया कंपनीनें इ. स. १६०० पासून १८०० पर्यंत २०० वर्षांत जेवढें राज्य मिळविलें तेवढें राज्य मराठ्यांनीं चाळीस वर्षांत कमावलें ! मात्र मराठ्यांचे राज्य थोड्याच काळांत नष्ट झालें आणि कंपनीचें राज्य अद्यापि कायम असून उत्तरोत्तर त्याचा उत्कर्ष होत आहे. महापूर आला म्हणजे नदीचें पाणी आसपास पांचचार कोसपर्यंत पसरतें आणि मग ओसरतां ओसरतां अखेरीस उन्हाळ्यांत पात्रांत सुद्धां पाण्याचा बिंदु रहात नाहीं त्याप्रमाणें मराठी राज्याची स्थिति झाली !
''सरंजाम मिळविण्यासाठीं परमुलुख जिंकून राज्य वाढविण्याची सरदारांनां हांव सुटली नसती, किंवा महाराज छत्रपतींनीं तसें न करण्याविषयीं त्यांस उत्तेजन देण्याऐवजीं 'आहे तेंच राज्य प्रथम चिरस्थायी करा, त्यांतलीं बंडें मोडा, शिस्त बसवा, कायदेकानू चालू करा, हाच मुलुख भरभराटीस येऊं द्या, मग दुस-या प्रांताला हात घाला,' अशी सक्त ताकीत दिली असती, तर राज्य इतकें वाढलें नसतें हे खरें; परंतु त्याला बळकटी आली असती यांत कांहीं संशय नाहीं. जिकडे सूर लागेल तिकडे मोहीम करून भालेराई गाजवण्याच्या फंदांत पडलेल्या मराठे सरदारांनां लाहोरावर स्वारी करण्यास फावलें, आणि बालेघाटाचा मुलुख-ज्याला साधुसंतांची जन्मभूमि वि प्राचीन खरोखरीचें महाराष्ट्र म्हणतां येईल तो पैठण, औरंगाबाद, नांदेड जालना, बीड वगैरे मुलुख - ताब्यांत घेण्याची फुरसत मिळाली नाहीं ! शांततेच्या काळांत मराठ्यांचे राज्य सर्वत्र होतें आणि अस्वस्थतेच्या काळांत कुठेच नव्हतें अशी दशा होण्याचें कारण कोणताहि प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत पूर्णपणें आला नव्हता हेंच होय.''
लष्करी व मुलकी सत्ता पृथक न ठेवणें व मुलकी सत्तेच्या कह्यांत लष्करी सत्ता न ठेवणे हें नाशाचें दुसरें बलवत्तर कारण आहे, इंग्लंडांत चार्लस राजाबरोबर व क्रामवेलबरोबर पार्लमेंट याच हक्काकरितां झगडलें. हिंदी शासनशास्त्रांतील मराठे किंवा क्षत्रिय आणि ब्राह्मण ही विभागणी या स्वरूपाची आहे. युद्धनिपुणांस रणांगणावर धाडणें व राज्यव्यवस्थानिपुणांस राजधानींत बसून अन्तर्गत व परराष्ट्रीय कारभार संभाळण्यास सांगणें अशी योजना पेशवाईंत कांहीं कांहीं वेळां केलेली दिसते. परंतु बाळाजी विश्वनाथ व पहिला बाजीराव ह्यांनीं एका हातांत लेखणी व एका हातांत तरवार असा आजन्म केलेला खटाटोप, शिपाई बाण्याच्या रघुनाथरावानें प्रधानपदाची धरलेली हाव, महादजी शिंद्यानें नानाच्या लेखणीवर ठेवलेला डोळा, उभयविधा नालायक असलेल्या दुस-या बाजीरावाच्या हातीं लेखणी व तरवार दोन्ही देण्याची मराठामंडळानें केलेकी चूक, या राजशासनशास्त्रविरुद्ध केलेल्या अक्षम्य प्रमादांमुळे मराठेशाही बुडाली असेंहि एक मत आहे. हिंदु शासनशास्त्र प्रगतिप्रवर्तक कधींच बनलें नाहीं. १८ व्या शतकाच्या अखेरीस देखील फ्रान्स, इंग्लंडसारखीं यूरोपियन राष्ट्रें व महाराष्ट्र यांच्या शासनशास्त्रविषयक ज्ञानांत केवढें महदंतर होतें ? इकडे नेपोलियन जगाचा भूगोल समोर पसरून मोहिमा कशा व कोठून न्यावयाच्या हा विचार करीत होता तर इकडे आमचे नानाफडणीस श्रीमंतांनां भारत भागवतांतील कोणते उतारे अध्ययनार्थ काढून द्यावेत हे ठरवीत बसले होते. तसेंच यूरोपियन राष्ट्रें जगाच्या प्रत्येक भागांत आपल्या वसाहती स्थापन करण्याच्या मार्गांत होतीं तर आपल्या इकडे मार्कंडेयादि पुराणांतील नवखंड पृथ्वीचीच कायती काल्पनिक माहिती खरी धरून चालत. हीच स्थिति युद्धसाधनांची. बंदुका व तोफा जुन्या पुराण्या अशा फिरंग्यांकडून खरेदी करून मग त्या लढाईंत चालवावयाच्या तेव्हां साहाजिकच त्या कितपत कार्यक्षम असतील याचा अंदाज करावा. फिरंग्यांच्या युद्धकौशल्याची जागोजागीं मराठ्यांनीं स्तुति केलेली आढळते, व पुष्कळ सरदारांनीं त्यांचीं पलटणें आपल्या दिमतीसहि ठेविली होतीं. सारांश, मराठ्यांनां, किंबहुना आशियाटिक राष्ट्रांनां युद्धशास्त्राची शिकवण नव्हती. तसेंच त्यांचें एकंदर ज्ञान पाश्चात्त्यांच्या ज्ञानापेक्षां कमती व कमी दर्जाचें होतें यांत संशय नाहीं. तात्पर्य ''ज्ञानविषयक प्रगती शिवाय राजकीय स्वायत्तता ठिकणें शक्य नाहीं'' हा सिद्धांत राष्ट्रानें ध्यानांत ठेवला म्हणजे मराठी सत्तेच्या नाशाचा उलगडा तेव्हांच होतो.
राष्ट्रांभिमानींचा अभाव हें कारण केळकर यांनीं दाखविलें आहे. परंतु हा मुद्दा एकट्या मराठ्यांनांच लागू नसून शीख रजपूत, मराठे वगैरे सर्वप्रांतीय लोकांनां लागू असल्यामुळें त्याचा उहापोह प्रकरणाअखेर करूं.