प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
बाजीराव व नानासाहेब पेशवे आणि साम्राज्याची वाढ.- १७२० ते १७६० पर्यंतचा मराठी इतिहास म्हणजे साम्राज्यवाढीचा इतिहास होय. या कामास मराठ्यांनां दिल्लीकडे उत्तम वाव मिळाला. दिल्लींचे मोंगल बादशहा सर्व दुर्बल निघाल्यामुळें वरील सनदेच्या आधारावर उत्तेरकडे मराठी साम्राज्य वाढविण्याचें काम दुसरा पेशवा बाजीराव यानें शिदें, होळकर, गायकवाड वगैरे सरदारांच्या मदतीनें केलें. शिवाजीच्या काळापासून युद्धव्यवसायांत कसलेल्या मराठा जातींतील अनेक सरदारांनीं हैद्राबादच्या निजामाचा, जंजि-याच्या शिद्दयाचा, वसईकडील पोर्तुगीजांचा, माळवा व बुंदेलखंड यांतील मुसुलमान सरदारांचा, आणि तालभोपालच्या लढाईंत दिल्लीच्या बादशाहाच्या खाशा फौजेचा पराभव केला. सारांश बाजीरावासंबंधानें बिनहरकत असें म्हणतां येतें की, ''त्याला जय मिळाला नाहीं अशी कोणतीच लढाई तो खेळला नाहीं.''
ही मराठ्यांच्या पराक्रमाची बाजू भूषणावह असली, तरी अंतर्गत राज्यव्यवस्थेंत मोठे दोष आढळतात. पहिलें व्यंग सातारकर व कोल्हापूरकर मराठा राजांच्या आपसांतील तंट्यांचें; व दुसरे बंडखोर मराठे सरदारांचें. शिवाय मराठी सत्तेला अगदीं घराशेजारीं एक जबरदस्त परशत्रु उद्भवला होता. हैदराबादचा निजामउल्मुक हा मोठा पराक्रमी व कारस्थानी सरदार असल्यामुळें दिल्लीच्या दरबारांत त्याला चांगलें वजन होतें व दक्षिणेंत तर तो स्वतंत्र राजाप्रमाणें राहून मराठी राज्यांत सतत वीस वर्षें वखेडे माजवीत होता. या निजामानें कोल्हापूरकरांस आणि चंद्रसेनजाधव, रावरंभा निंबाळकर, त्रिबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड वगैरे मराठे सरदारांस चिथावून व फितवून आणि स्वतः व त्यांच्या मार्फत अनेक लढाया करून मराठी राज्याचें बळ बरेंच खर्ची घातलें. या सर्व बंडखोरांस व निजामउल्मुकासारख्या स्वकर्तृत्वानें व दिल्लीच्या बादशाहाच्या मदतीनें बलाढ्य बनलेल्या निकटवर्ति शत्रूस जमीनदोस्त करून मध्यहिंदुस्थान, माळवा व बुंदेलखंड येथपर्यंत साम्राज्यविस्तार बाजीरावानें केला, ही गोष्ट त्याच्या युद्धकौशल्याची तसेंच कारस्थानपटुत्वाची उत्तम साक्ष पटविते.
याप्रमाणें कामगिरी बजावून बाजीराव १७४० मध्यें वारल्यावर त्याचा मुलगा नानासाहेब पेशवा झाला. स्वराज्य व वाढलेलें साम्राज्य यांचा कारभार नीट चालवून शिवाय साम्राज्य वाढविण्याची जबाबदारी नानासाहेबावर बाजीरावापेक्षां अधिक मोठी होती. पण ती पार पाडण्यास, बाजीराव बहुतेक एकाकी होता, त्याऐवजीं नानासाहेबास त्याच्या रघुनाथराव व सदाशिवराव या भावांचें साहाय्य होतें. नानासाहेबानें युद्धमंत्रि, पराराष्ट्रमंत्रि, द्रव्यकोषमंत्रि, आणि रणांगणावर प्रत्यक्ष लढणारे सेनापती अशा निरनिराळ्या अधिका-यांत कामाची वाटणी केली, त्यामुळें साम्राज्यसंरक्षण व साम्राज्यविस्तार हीं दोन्ही कामें त्याला व्यवस्थित चालवितां आलीं. शिवाय मागील कारकीर्दींतील कर्जाची फेड व वाढत्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याचें अवघड काम त्याला करावें लागलें.
उत्तरेकडे शिंदे, होळकर व भोंसले या मराठे सरदार घराण्यांची कायमची स्थापना झाल्यामुळें तिकडील मुलुखाचा बंदोबस्त चांगला लागला होता. म्हणून नानासाहेबानें प्रथम कर्नाटक, तंजावर, त्रिचनापल्ली, अर्काट, वगैरे दक्षिणेकडील मुलुख स्वसत्तेखालीं आणला आणि रघुजी भोसल्याकडून बंगालवर पांच स्वा-या करवून अलीवर्दीखानापासून बारा लक्ष रुपये व कांहीं प्रांत मिळविला.