प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

मराठी सत्तेचा -हास व नाश.- खड्र्याची लढाई ही जींत सर्व मराठे सरदार एकत्र झाले होते अशी शेवटचीच लढाई होय. तिच्यानंतर लवकरच ज्याचें नांव पुढें करून नाना फडनवीस पेशवाईंतील सरदार कसे बसे एकत्र करूं शकत होता तो नारायणराव पेशव्याचा पुत्र सवाई माधवराव मरण पावला. महादजी शिंदे खड्र्याच्या लढाईच्या अगोदर मृत्यु पावला होता व तुकोजी होळकरहि खड्र्याच्या लढाईनंतर दोनच वर्षांनीं म्हणजे इ. स. १७९७ त स्वर्गवासी झाला. विपत्तीच्या दिवसांत पेशवाईचे केवळ आधारस्तंभच असलेले हे दोन कर्ते पुरुष नाहींसे झाल्यामुळें नाना फडनविसासारख्या 'अर्ध्या शाहण्या' पुरुषांस मराठशाहीच्या ढासळण्या-या इमारतींस टेकू देणें अशक्यप्राय झालें व जिकडे तिकडे बेबंदशाही माजून सुमारें पांच वर्षांच्या अवधींतच इंग्रजांच्या हातीं मराठशाहीचीं सूत्रे देणा-या वसईच्या तहावर बाजीराव पेशव्याने सही केली.

या नंतर १८०२ ते १८१८ पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास म्हणजे मरणोन्मुख माणसाच्या अन्तकालीन धडपडीसारखा आहे. वसईचा तह बेकायदेशीर ठरवून उत्तरेकडील मराठशाहीच्या अभिमानी सरदारांनीं इंग्रजांशीं शत्रूत्व चालू ठेविले व त्यामुळें बाजीरावालाहि लाज वाटून त्यानें पुन्हा दक्षिणेत इंग्रजांशीं सामना दिला. पण या धडपडींत एकसूत्रीपणा, परस्पर विश्वास व सहकार्य नसल्यामुळें इंग्रजांनीं मराठी साम्राज्याच्या प्रांताधिका-यांशीं पृथक् पृथक् सामने करून एकेक तुकडा घशांत टाकला. अशा सार्वत्रिक विनाशकालीं शिंदे, होळकर, गायकवाड, पटवर्धन, वगैरे कांहीं ब्राह्मण मराठे यांनीं अधिक बाणेदारपणानें व धूर्तपणानें वागून स्वतःच्या जहागिरी कायम राखल्यामुळें मराठे शाहीचें अल्पस्वल्प स्मारक आज पहावयास मिळतें.