प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
मराठी सत्तेविषयीं व्हिन्सेंट स्मिथचें मत - मराठ्यांनीं व पेशव्यांनीं जें साम्राज्य कमविलें व चालविलें त्यांतील त्यांच्या हेतूविषयीं व राज्यकारभारपद्धतीविषयीं अनेक परकी ग्रंथकारांनीं चुकीचीं मतें प्रदर्शित केलीं आहेत. तथापि खुद्द मुसुलमान तवारिखकारांच्या काळीं असणारे गैरसमज पुढें गँडडफच्या काळींच नव्हे तर आज १९२० सालीं इतिहास लिहिणा-या इंग्रज लेखकांतेहि दिसावे याचें सखेद आश्चर्य वाटतें; अशा मतांचा नमुना म्हणून पुढील उतारा वाचकांस सादर करतों. प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार व्हिन्सेंट ए. स्मिथ हे आपल्या ऑक्सफोर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकांत लिहितात! ''शिवाजीचे अत्याचार व विश्वासघातकीपणाचे गुन्हे धडधडीत दिसत असतां. त्याच्याबद्दल पुष्कळ हिंदूंनां जो इतका अभिमान वाटतो व व्यक्तहि केला जातो त्याचा खुलासा व थोडेसें समर्थनहि सहज करतां येईल
(पण) १८ व्या शतकाच्या अखेरीस व १९ व्या शतकाच्या सुरवातीस होऊन गेलेल्या बाजीराव आदिकरून मराठे सरदारांची सन्मान किंवा वाहवा करून घेण्याची मुळींच योग्यता नाहीं अहल्याबाई नांवाच्या स्त्रीचा एकच अपवाद वगळला तर त्या सर्वांमध्यें एकहि म्हणण्यासारखा सदगुण नव्हता; उलट दगेबाजपणा, दुष्टपणा, लुटारुपणा व दुस-या आणखी कित्येक दुर्गुणांची त्यांनां काळोखी लागली आहे. ज्या घाणेरड्या राज्यपद्धतीचा त्यांनीं अवलंब केला होता ती मनुष्य जातीच्या कोणत्याहि दिशेनें प्रगतीस अगर यत्किंचितहि कल्याणास अपात्र होती.
''मराठ्यांचा राजकीय व्यवस्थेंत आढळून येणारा नीतीचा खून अगदीं स्पष्ट व निर्लज्जपणाचा होता.' त्यांच्यासैन्याची व राज्यव्यवस्थेची पद्धति साम्राज्यें उत्पन्न करण्यापेक्षां नष्ट करण्याकडेच गणली जाईल (अशी होती). त्यांच्या सर्व राज्यघटनेच्या मुळाशीं असलेली लुटालुटीचे छापे घालण्याची सवय तसेच त्यांची भावना व वागण्याची त-हा या गोष्टीं इंग्रजी सत्तेचे नैसर्गिक शत्रूच होत. ज्यांच्या राज्यपद्धतीचे उद्देश व तत्त्वें परस्परविरुद्ध आहेत अशा राष्ट्रांत टिकाऊ सलोखा कधींच असणें शक्य नाहीं.
''एकंदरींत मराठे हे धंदेवाईक चोर असून त्यांच्या चळवळी त्यांच्या सालस शेजा-यांनां असह्य होत असत. धामधुमीच्या काळांत पुढें घुसणा-या सर्व दगेखोरांशीं ते उघडपणें मिसळत व नंतर त्यांच्या बेलगामी राज्यास दाबून टाकणें हें त्यांचें पहिलें काम असें. असें असून देखील ते हिंदुस्थानांत एक सत्ताधारी राष्ट्र होऊन बसले होते.
''१८१८ त मराठी राज्याचा पुरा नाश झाल्याबद्दल कोणाहि हिंदूच्या किंवा यूरोपीयाच्या अंतःकरणांत विषाद किंवा सहानुभूतीचा यत्किंचितहि विचार उद्भवण्याचें कारण नाहीं. ज्याला ऐतिहासिक वस्तुस्थितीचा थोडा तरी परिचय झालेला आहे. असा कोणहि मनुष्य, मराठ्यांच्या दृष्टपणाबद्दल त्यांचा झालेला पुरा नाश व त्यांच्या जागीं व्यवस्थित ब्रिटिश राज्यव्यवस्थेचें आगमन हीं हिंदुस्थानच्या अलोट कल्याणासाठीं अवश्य होतीं याबद्दल संदेह बाळगणार नाहीं.''
ज्या अर्वाचीन पाश्चात्त्य पंडितांनीं हिंदुस्थानच्या इतिहासाचें सूक्ष्म अवलोकन करून, त्यावर ग्रंथरचना केली अशा इतिहासकारांपैकीं व्हिन्सेंट स्मिथ हा एक असून, त्याचीं विधानें सर्वत्र प्रमाणभूत धरण्याचा परिपाठ आहे. तेव्हां त्याचें मराठ्यांसंबंधीं वरील धाडसाचें विधान वाचून व त्यामुळें आपल्या राष्ट्रसंस्थांपकांबद्दल खोटा गैरसमज उत्पन्न होणार हें पाहून कोणा महाराष्ट्रीयाचें अंतःकरण तिळतिळ तुटणार नाहीं ? सध्यां तरी राजवाडे-खरे यांसारख्या निरपेक्ष स्वदेशाभिमान्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं अज्ञानमूलक कुशंका काढण्याचें कारण उरलें नाहीं. पण जेव्हां मराठ्यांच्या वैभवाच्या आठवणीमुळें ब्रिटिश साम्राज्याच्या कायदेशीरपणास किंवा अस्तित्वसमर्थनास धोका येईल काय अशी भीति त्यांच्या विरोध्यांनां भासूं लागते, तेव्हां तो विषय त्रयस्तपणें वादाचा राहिला नाहीं असें वाटावयास लागतें. तेव्हां स्मिथचें वरील विधान खोडून न काढलें तरी चालण्यासारखें आहे. पण या ठिकाणीं एक दोन आरोपांचा थोडासा उहापोह केलेला बरा.
मराठ्यांचें स्वतंत्र राज्य हे नांवाजलेल्या दरोडेखोरांचें राज्य असें जे स्मिथ म्हणतो त्याला कारण मराठे व इंग्रज यांचे हितसंबंध एक येत जाऊन ब-याच वेळां इंग्रजांनां मराठ्यांनीं मोठा विरोध केला आहे. १६६४ व १६७० या सालीं शिवाजीनें सुरत लुटली, तेव्हां आपल्या जवळची सर्व संपत्ति त्याच्या हवालीं करावी म्हणून त्यानें अनेक इंग्रजांची कत्तल केली असा शिवाजीवर आरोप ठेऊन स्मिथसारखा इंग्रज त्याला दरोडेखोरांचा नायक म्हणतो. उलट, क्यारे नांवाचा फ्रेंच प्रवासी १६६८-१६७३ पावेतों हिंदुस्थानांत होता त्यानें शिवाजीची तुलना ज्यूलियस सीझर, व गस्टाव्हस अडॉल्फस यांच्याशीं करून ''तो सर्वगुणसंपन्न योद्धा व चक्रवर्ती राजा होता'' अशी प्रशंसा केली आहे. असे अनेक तत्कालीन पुरूषांचे शिवस्तुतीदाखल उतारे दाखवितां येतील. ज्यांचा फायदा होतो ते गुण घेतात व तोटा होतो ते शिव्या देतात. अशा गोष्टी थोर पुरूषांसंबंधांत आढळून येतात; त्यांपैकींच मराठे हे एक आहेत.
मराठे व इंग्रज यांचा उत्कृर्ष बराच काळपर्यंत एकसमयावच्छदेंकरून होत होता; इंग्रजांचा उत्कर्ष हळू हळू पण शेवटपर्यंत, व मराठ्यांचा प्रथम प्रथम मोठ्या झपाट्यानें व पुढें पिछेहाटीनें होत गेला. दोघांनांहि साम्राज्यतृष्णा होती, व त्यामुळें मत्सर उत्पन्न झाला. हिंदुस्थानांत साम्राज्यसत्ता स्थापण्याचा हक्क मोंगल, इंग्रज, मराठे वगैरे सर्वांसच आहे. मराठे हिंदु असल्यामुळें त्यांनां तर हिंदुपदपादशाही स्थापण्याचा सर्वांत जास्त हक्क आहे तेव्हां ते आपल्या राज्यतृष्णेच्या मार्गांत येतात म्हणून वाईट हें म्हणणें कितपत न्याय्य होईल ? शिवाय मराठे हे इंग्रजांचे हिंदुस्थानांतले सर्वांत बलिष्ठ प्रतिस्पर्धा कडव्या शीखांशी गांठ पडेपावेतों त्यांनां मराठ्याइतका लवकर न मोडणारा शत्रु मिळालाच नव्हता. शिखांशीं युद्ध जमलें त्यावेळी इंग्रजांची सत्ता व बल फार वाढलें होतें, पण आरंभीं मराठ्यांशीं प्रसंग पडले त्यावेळीं इंग्रज फारसे सामर्थ्यवानं नसल्यामुळें दुबळ्या लोकांप्रमाणें ते मराठ्यांवर बोटें मोडीत राहिले यांत आश्चर्य तें काय ? ''आमचें बल वाढेपर्यंत मराठ्यांसारख्या शत्रूंशीं आमची टक्कर झाली नाहीं हें आमचें सुदैवच समजलें पाहिजे'' असें सर आलफ्रेड लायलसारखा प्रख्यात आधुनिक इतिहासज्ञ कबूल करतो. तेव्हां केवळ मत्सर बुद्धीनें मराठ्यांची नालस्ती स्मिथसारखें प्रबुद्ध इतिहासकारहि करूं शकतात याचा हा मासला म्हणतां येईल!
दुसरी गोष्ट मराठ्यांच्या नीतिमत्तेविषयीं मराठे राजकारणांत अनीतिपटु होते, चोराच्या शब्दाला जी किंमत ती त्यांच्या वचनाला होती, त्यांची राज्यघटना दरोडे, छापे, लुटालूट यांवर उभारली होती, व इंग्रज हे निसर्गतःच असत्य-अनीति, जुलूम याविरूद्ध असल्यानें त्यांनां उघडच मराठ्यांचा वीट आला अशा अर्थांची स्मिथ साहेबांची बतावणी कितपत सत्याला धरून आहे हें पाहण्याचा प्रयत्न म्हणजे तिला महत्त्व दिल्यासारखें होणार आहे. क्लाईव्हची उमीचंदाच्या बाबतींत खोटा दस्तऐवज करण्याची बुद्धी, वारन, हेस्टिंगनें अयोध्येच्या नबाबाला रोहिल्यांची अमानुष कत्तल करण्याला दिलेली उघड उघड मदत, बेगमांपासून अमानुष छळ करून उकळलेले द्रव्य तसेंच हिंदी संस्थानिकांवर इंग्रज अधिका-यांनीं अनेकदां केलेले जुलूम व परवां परवांचें क्राफर्ड प्रकरण या सारख्या गोष्टी जर न्याय्य व मुत्सद्दीगिरीच्या ठरतात तर मराठ्यांची मुत्सद्देगिरी कां ह्यणूं नये! वारन हेस्टिंग्जनंतर कोणाहि सिव्हिलियनाची पार्लमेंटांत अन्यायाबद्दल चवकशी झाली नाहीं याचा अर्थ त्यानंतर हिंदुस्थानांत मुळीच कोणीहि इंग्रजानें अन्याय केला नाहीं असा समजावयाचा की काय ? याचें उत्तर वारन हेस्टिंगच्या पुढील काळात इंग्रजांनां साम्राज्य वाढवितांना ज्या ज्या ब-या वाईट गोष्टी कराव्या लागतील त्यांकडे डोळेझांक रावयाची असें इंग्लंडांत ठरून गेल्यासारखें झाले होते. म्हणजे तें नैतिकदृष्ट्या बरोबर होतें असें मात्र नाहीं; तर ती ''मुत्सद्देगिरी'' होती. लार्ड वेलस्ली व डलहौसी यांनीं जे संस्थानें खालसा करण्याचें धोरण ठेविलें ते कितपत न्यायाला धरून होते ? मग त्यांचे गुण का गावेत ? त्यांनीं मराठ्यांप्रमाणें इंग्रजी साम्राज्य दरोडे घालून व लुटून वाढविलें असें कां म्हणूं नये ? शिवाय पेशवाईच्या अखेरीस मराठ्यांत एकोपा नव्हता व इंग्रजांप्रमाणें मध्यवर्ती सत्ता राहिली नाहीं म्हणून जी अंदाधुंदी झाली व त्या काळीं ज्या वाईट प्रकारच्या गोष्टी घडल्या त्यांवरून सररहा मराठे हे दरोडेखोर, दगडबाज राज्य करण्याला नालायक अतएव स्वातंत्र्याला व स्वराज्याला अपात्र असा एकदम शेरा मारणें स्मिथसारख्या विद्वान इतिहाससंशोधकाला तरी शोभत नाहीं. संशोधकाला एकांगीपणा व पूर्वग्रहदूषितता यांचा विटाळ असतां कामा नये. एखाद्याला अपशय आलें म्हणजे तो सर्वदोषसंपन्न असतो असें नाहीं. लायलनें तर पदोपदीं आपल्या इतिहासांत इंग्रजांचें सुदैव म्हणूनच त्यांनां हिंदुस्थानचे राज्य प्राप्त झाले असें जें म्हटले तें खोटें नाहीं. तेव्हां साम्राज्यप्राप्तीच्या मदानें धुंद होऊन वाटेल तें बरळत सुटणें हें स्मिथसारख्या थोर पुरुषाला तरी भूषणावह नाहीं.
असो; पूर्वग्रहदूषित इतिहासकारांच्या मताचा मासला दिल्यानंतर स्वाभिमानाच्या दृष्टीनें मराठी सत्तेचें महत्त्व येथें थोडेसे वर्णन करतों.