प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ७ वें.
विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय                
 
अॅनॅक्सॅगोरसचीं मूलबीजें डिमॉक्रिटसच्या परमाणूंहून भिन्न नव्हतीं.– वर दिलेली डिमॉक्रिटसच्या उपपत्तीची मीमांसा जर चुकीची नसेल, तर आपणांस तिच्यावरून असें दिसून येतें कीं, डिमॉक्रिटस हाहि वस्तुत: एकतत्त्ववादी नव्हताच. कारण, त्याचे मूळ  परमाणू आकार व परिणाम या बाबतींत परस्परांहून भिन्न असल्यामुळें ते सर्व एकाच जातींचे आहेत असें म्हणतां येत नाहीं. वास्तविक तेहि अॅनॅक्सॅगोरसच्या भिन्नरूपी परमाणूंसारखेच आहेत असें म्हटलें पाहिजे निराळ्या शब्दांत सांगावयाचें म्हणजे डिमॉक्रिटसचे परमाणू व अॅनॅक्सॅगोरसचीं मूलबीजें यांत तत्त्वत: कांहीच फरक नाहीं. डिमॉक्रिटसचे परमाणू जरा अधिक इंद्रियगोचर आहेत व त्यांना विशिष्ट नांव दिलेलें आहे एवढेंच काय तें. अॅनॅक्सॅगोरसचीं मूलद्रव्यें इंद्रियांनां अगोचर असून तीं असंख्य आहेत, आणि जगांत जेवढे निरनिराळे पदार्थ आहेत, तितक्या प्रकारचीं ही मूलबीजें आहेत. परंतु डिमॉक्रिटसच्या परमाणूंबद्दलहि अशा प्रकारचेंच विधान करणें भाग आहे. ते सुद्धां इंद्रियांनां अगोचर असण्याइतके सूक्ष्म आहेत. त्यांची संख्याहि अगणित आहे आणि जगांत जितक्या जातींचे पदार्थ आहेत तितक्या प्रकारचे हे मूल परमाणू आहेत, असेंच डिमॉक्रिटसचें मत होतें. `मूलबीजें’ आणि `परमाणु’ हीं दोन्हीं सारखींच; कारण दोन्हीहि आपल्या तत्वांनां आद्यस्वरूपी, अविकारी व अविनाशी असें मानतात. मग दोघांत फरक तो काय? `फक्त नांवांत फरक’ याशिवाय याला दुसरें उत्तर नाही. कदाचित् असें म्हणतां येईल कीं, अॅनॅक्सॅगोरसनें या मूलबीजांचे भौतिक गुणधर्म कोणते ते सांगितले नाहींत व डिमॉक्रिटसनें ते सांगितले आहेत.