प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
ग्रंथप्रवेश
वेदोत्तर काल म्हणजे मुख्यत: कुरूपुध्दोत्तर काल. कुरूपुध्दानंतर थोडक्याच कालानें वैदिक वाङमयाचें संहितीकरण झालें. श्रौतसंस्थांच्या ऋस्त्विजांमध्यें पक्षभेद उत्पन्न होऊन यजुर्वेदाचे शुक्ल व कृष्ण असे भेद उत्पन्न झाले व त्यामुळें इतर वेदांचा उपयोग करणार्यांमध्येंहि शाखांतरें उत्पन्न झालीं. श्रौतजीवी ऋत्विजांत जीवनकलहमूलक द्वैत चालू असतांच आरण्यकीय विचार उत्पन्न होऊन ज्ञानमार्गाकडे जनतेंतील विचारी वर्ण वळू लागला असतां, श्रोतजीवी वर्गांतील पक्षभेदामुळे आणि ऋत्विग्मंडळाबाहेर असलेल्या सामान्य जनांमध्ये श्रोतधर्मस्वरूपमूलक निष्कर्तव्यता स्थापन झाल्यामुळें श्रध्दाविषय कमी होत असलेला श्रोतधर्म लयास जाण्याच्या पंथास लागला होता. आरण्यकीय विचार सामान्य जनांस कर्मै उत्पन्न करुन देणारा नव्हता. फक्त पातंजल सिध्दांतांनीं वैयक्तिक कार्मांचे महत्व वाढविले; पण ती कार्मे फारशीं लोकप्रिंय झाली नाहींत; व्यावहारिक विषयांवर नीतिवाक्ये आणि त्यांची पारमार्थिक व अधिक व्यापक विचाराशीं, सोप्या कर्मांशी जोड करुन देणारीं कर्मे यांनी युक्त असे जे संप्रदाय उत्पन्न झाले त्यांत बोध्द, जैन, भागवत, वीरशैव, वीरवैष्णव इत्यादि संप्रदाय उल्लोखिले पाहिजेत.तत्वज्ञानें परमार्थविषयक व्यापार व विचार उत्पन्न करीत, आणि त्या विचारांनी औपनिषद वाङ्मय आणि लोकांमध्यें प्रचंलित असलेल्या विविध उपासना याची गति लावण्यात येई. औपनिषद विचार, विविध दर्शने, ब्रम्हासुत्रें, पुराणें, गीता व ब्रम्हासुत्रांवरील भाष्ये यांत उपबृंहित झाले, आणि ज्या सामान्य जनांस पितृमुलक उपासना करण्यापेक्षां जास्त पुढे जावयाचे असेल त्यांस मार्गदर्शक झाले. ब्रह्मसमाज देखील औपनिषद विचारांवरच रचला गेला पण तो शंकर, रामानुज इत्यादि मतांपैकी कोणत्याच मतांस अंतिमत्व द्यावयाचें नाही., पारमाथक बाबतीत म्लेच्छ म्हणून समजलेल्या लोकांच्या विचारात जे ग्राह्य असेल तेंहि घ्यावयाचें अशा तत्वांचा होता.वेदमुलक संस्कारधर्महि या समाजानें त्यागिला आणि त्यामुळें हिंदुस्थानात त्यास पृथक्त्व उत्पन्न झालें आणि त्यामुळें त्यांची सुधारलेली आवृत्ति जी प्रार्थनासमाज त्यानें पु़ढें संस्कारधर्माचा त्याग केला नाही. आर्य समाजाने ब्राम्हणग्रंथपुर्व संहितोक्त धर्माकडे धांव मारली. येणेंप्रमाणें थोडक्यात हिंदुस्थानच्या पारमार्थिक प्रयत्नाचा इतिहास देतां येईल. या इतिहासांतील उत्तरकालीन भागाशीं सामान्य वाचकवर्ग बराच परीचित असल्यामुळे त्यावर फारसें विवेचन प्रस्तावनाखंडांत करण्याची आवश्यकता वाटली नाहीं.
जगांत पारमार्थिक विचारांचा ओघ केवळ हिंदुस्तानांत उत्पन्न झाला नाहीं, पण त्याबरोबर हेंहि सांगितलें पाहिजे कीं पारमार्थिक विचारांची विविधता भारतीय संस्कृतीत जितका दिसते तितकी अन्यत्र दिसत नाही. प्रत्येक संस्कृतींत विकास दिसतो. नरबली देऊन ईश्वरास संतुष्ट करण्याच्या पध्दतीपासून प्रवक्त्यांच्या आवेशयुक्त सदादित नीतिमय आणि ज्ञानमय भाषणांनीं जनतेस सन्मार्गास लावणाच्या पध्दतीपर्यंत अनेक प्रकारचे प्रयत्न यहुद्यांच्या विकासामध्यें दृष्टीस पडतात; आणि प्रवक्त्यांच्या त्या प्रकारच्या प्रयत्नांचे भिन्न तर्हेचे विकास ख्रिस्त व महमंद यांच्या उपदेशांत आढळून येतात. त्या प्रगतीचेंहि स्वरूप ( सेमोटिक म्हणजे हिब्रू , अरबी यांशी सदृश भाषा बोलणार्यांच्या वंशांत उत्पन्न झालेल्या) वाङ्मयासह येथें प्रदर्शित केलें आहे. प्रस्तावनाखंडांत बहुतेक सर्व संप्रदायांचे आद्यग्रंथ वेदांप्रमाणेंच वर्णिले आहेत. जैनांच्या सर्व संप्रदायांस मान्य असे आद्यग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे वर्णन येथे नाही. प्रत्यक्ष महावीराची वचनें आपणांस ठाऊक नाहींत. आणि भागवताने उल्लेखिलेला महावीरपूर्व जैन तीर्थकर ऋषभ याची तर आपणास निश्चित अशी मुळीचं माहीती नाही. जैन वाङ्मयात संप्रदायद्वैत स्थापन झाल्यानंतरचेच आपणास उपल्बध आहे. कन्फ्यूशिअसचें अतिशय उच्च प्रकारचें सामाजिक तत्वज्ञान बुध्दपुर्वकालीन आहे. ब्रह्म आणि धर्म या दोन्ही कल्पना ज्या ताओ नावांच्या शब्दांत व्यक्त होतात तें ताओ नावानेंच परिचित असलेलें तत्वज्ञान देखील बुध्दपुर्वकालीन असण्याचा संभव आहे. निदान बुध्दाच्या संप्रदायाचा प्रसार चीन देशांत होण्यापूर्वींचे तें खास आहे. म्हणुन त्याचें विवरण प्रस्तुत विभागांत न करतां तिसर्या विभागांत केलें आहे. जपानचा शिंतो (खरोखर शेन ताओ; शेन = चांगला ताओ = धर्म, शिंतो = सद्धर्म) चिनी ताओंचेच एक स्वरूप असल्यामुळें त्यासहि येथें स्थल दिलेलें नाही.
जगाच्या इतिहासामधील एक मोठी क्रिया म्हटली म्हणजे अनेक लहान राष्ट्रकें अथवा राष्ट्रस्वरूपी जाती या एका मोठ्या राष्ट्राच्या अंकित होऊन मोठ्या शासनसंस्था उत्पन्न होणे.आजचीं लहान राष्ट्रें म्हणजे प्राचीन कालच्या अनेक राष्ट्रांच्या समुचयाएवढीं भासतील. विसदृश पण एकत्र झालेली राष्ट्रकें असतील किंवा सदृश जाती अगर राष्ट्रकें एकत्र झालीं असतील त्यांत आजच्या राष्ट्रांचा अंतर्भाव होतो. साम्राज्यें म्हणजे सामाजिक दृढीकरणाची क्रिया ज्यांत अपूर्ण आहे असे समाज. अनेक समाजांस व राष्ट्रांस, साम्राज्यांनीं एकत्र आणले आहे.लहान राष्ट्रांच्या कालापासून आज तागाईत इतिहास द्यावयाचा म्हणजे बुध्दकालीन लहान लहान राष्ट्रांची जितकी व्यापक तितकी यादी करून त्या राष्ट्रांनां आज थोडक्या राष्ट्रांच्या किंवा साम्राज्यांच्या सत्तेखालीं आणतांना काय प्रयत्न झाले त्यांचा इतिहास द्यावयाचा, म्हणजे इराण, ग्रीक व रोमन साम्राज्यें, मगध साम्राज्य व खलिफत देऊन नंतर शेव़टच्या तीन साम्राज्यांच्या दौर्बल्याबरोबर यूरोपांतील राष्ट्रविकास कसा झाला हें द्यावयाचे. आणि राष्ट्रें साम्राज्यांच्यें धोरण अवलंबूं लागल्यानंतर भौगोलिक शोध कसे लागत गेले, आफ्रिका आणि अमेरीका हे भूभाग गोर्यांच्या तावडींत कसे गेले व आशियाहि जवळ जवळ कसा गेला हें दिलें पाहिजे व स्पेन, फ्रान्स, इग्लंड, रशिया इत्यादि राष्ट्रांनी तयार केलेली साम्राज्यें, साम्राज्यीकरणाच्या प्रयत्नांत उत्तरकाली पडलेली जर्मनी व इटली व अमेरीकेंतील संयुक्त संस्थानें यांचे प्रयत्न ही सर्व चित्रिलीं पाहिजेत. स्वप्रदेशविकासाकरितां जी मारपीट होई तीविरूध्द चॅलन्स आफ पॉवर म्हणजे शिरजोरविरूध्द एकीकृत होऊन कोणासहि चढूं द्यावयाचें नाहीं या तर्हेची खटपट चालत होती तिचे वैयर्थ्य या महायुध्दानें सिध्द होऊन जो राष्ट्रसंघ तयार झाला त्याचें विवेचन पहिल्या विभागांत दिलेंच आहे.
बुध्दोत्तर कालांत पारमार्थिक दृष्टीनें जे संप्रदाय उत्पन्न झाले त्या संप्रदायांमुळे राजकीय व सांस्कृतिक परिणाम जे झाले त्यायोगानें जगाचे स्वरूप कसें काय बदललें हा एक मोठा इतिहासाच्या अभ्यासकांचा विचारवषय असल्यामुळें मुसुलमान व बौध्द यांच्या प्रयत्नांचे परिणाम सविस्तर दिले आहेत. ते देतांना सवंध जग हें विस्तीर्ण विचारक्षेत्र करून त्याचा ऊहापोह केला आहे.हिंदूंचा राजकीय इतिहास मुसलमानांच्या प्रवेशापूर्वी बराच विस्तृत आणि पुढील कालांत त्रोटक असा घेतला आहे. या कालाविषयीं त्याच्या निकटत्वामुळें जिज्ञासा विशेष जागृत करण्यास नको म्हणून त्याविषयीं विवेचन शरीरखंडाकडे सोंपविलें आहे. राजकीय इतिहास व भौगोलिक शोध यांचा इतिहासक्षेत्रांत फार निकट संबंध असल्यामुळें त्याविषयीं विवेचन सविस्तर सांपडेल.
सध्यांचा एक विचाराचा महत्वाचा विषय म्हटला म्हणजे राष्ट्रीकरण होय. राष्ट्रीकरण देशांत कोणकोणत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळें उत्पन्न झालें ह्याविषयीं समाजशास्त्रीय नियम काढण्यास जें इतिवृत्ताचे विधान पाहिजे तें या भागांत विशेष सविस्तर केलेलें आढळून आले येईल. लेंटिन व संस्कृत यांसारख्या सांस्कृतिक व व्यापक भाषांपासून विशिष्ट प्रांतिक किंवा राष्ट्रीय भाषांचा विकास कसा होत गेला हा विचार देखील राष्ट्रीकरणाच्या विचारांशी संबंध्द आहे.
प्रस्तुत विभागांत तात्विक विवेचन फारसें सांपडणार नाहीं पण जगांतील अनेक होणार्या गोष्टी, विशिष्ट क्रियेचा अंश म्हणून विवेचन करण्यांतच इतिहासशास्त्रज्ञाचें तात्विक विवेचन मुख्य पहावे लागते. जगाचा सर्व इतिहास कांहीं विशेष क्रियापरंपरेत दाखविणें आणि विशेष कार्यपरंपरेत दृष्ट नियमांचा विकास दाखविणें हे इतिहासशास्त्राचे काम आहे. ते कसें काय झालें आहे तें ग्रंथाच्या वाचनानेंच समजेल.
दक्षिण अमेरिकेचा स्थामनिक इतिहास येथें दिला नाहीं. यूरोपीयांनीं त्या प्रदेशाचे यूरोपीभवन कसें केलें येथपर्यंत इतिहास आणिला आहे. त्या कालापासून आजची राष्ट्रें स्पानिश व पोर्तुगीज सत्तेशीं बंड करून कशी स्वतंत्र झालीं याचा इतिहास, ब्रेझिल आर्जेटाईन रिपब्लिक वगैरेसारख्या शरीरखंडात दिलेल्या देशवर्णनांत सांपडेल. तसाच हिंदुस्थानांतील आजच्या शेंकडो संस्थानांचा इतिहास शरीरखंडातच सांपडेल. दक्षिण अमेरिकेतीलं संस्थाने व हिंदुस्थानांतील संस्थाने हीं दोन्ही जागतिक राजकारणाचा फारसा भाग नाहीत.
हा ग्रंथ तयार करतांना, रा.रा. यशवंत रामकृष्ण दाते, बी.ए. एल. एल. बी.; रा.रा. सर्वोत्तम वासुदेव देशपांडे, बी.ए.; रा.रा. लक्ष्मण केशव भावे,बी.ए.; रा.रा.चिंतामण गणेश कर्वे, बी.ए; यांची विशेष उल्लेखिण्याजोगी मदत झाली आहे.
- श्रीधर व्यंकटेश केतकर.