प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

इस्लामाचा उदय, साम्राज्य व खलीफत यांचा संग्राम.- इस्लामी धर्माच्या उदयानें दोन विश्वव्यापी संप्रदाय प्रथमच समोरासमोर आले. प्रत्येकाची इच्छा जगाला गवसणी घालण्याची होती. तेव्हां या वेळीं हें केवळ यूरोप आणि आशिया खंडामधील भांडण नसून ज्याच्या मुळाशीं धार्मिक तत्वें आहेत असा एक महत्त्वाचा लढा होता यांत संशय नाहीं. अग्न्युपासना केवळ एक राष्ट्र-धर्म असून इस्लाम इतकी त्यापासून भीति नव्हती. मुसुलमानांची राजकीय सत्ता इतक्या तातडीनें निर्माण झाली कीं, सर्व जगाला तिनें स्तंभित केलें. रोमन अरबस्तानांतील बोस्ट्रा हा किल्ला ६३४ मध्यें त्यांच्या हातीं पडला आणि ६४१ मध्यें हिरॅक्लिअसचा अंत होण्यापूर्वीं सिरिया आणि अलेक्झाँड्रिया खेरीज सर्व इजिप्त त्यांनीं जिंकून घेतलें. ६४३ मध्यें त्यांनीं अलेक्झ्रड्रियांत प्रवेश केला. सिरियन आणि इजिप्शियन लोकांचा काँन्स्टांटिनोपलहून (ग्रीकाहून) भिन्न असलेला धर्म हा त्यांच्यावर मुसुलमानांनीं जो विजय मिळविला त्याचा एक महत्त्वाचा राजकीय गुणक म्हणतां येईल. याप्रमाणें मुसुलमानांनीं साम्राज्याचा पूर्वेकडील भाग, जर्मनांनीं ज्याप्रमाणें पश्चिमेकडील भाग घेतला त्याप्रमाणें तोडून घेतला. इजिप्त पुन्हां कांहीं परत घेतां आलें नाहीं, त्याचप्रमाणें सिरिया-आशियामायनरचें अखंडत्व पदोपदीं नाश पावण्याच्या धास्तींत होतें व सिलिशिया पिढ्यानपिढ्या दुस-याच्या ताब्यांत रहात होता. इराण पादाक्रांत केल्यामुळें मुसुलमान सस्सनांच्या स्थानावर आरूढ झाले. अर्मेनिया साहजीकच त्यांच्या ताब्यांत गेला (६५४). इकडे पश्चिमेस ६४७ मध्यें त्यांनीं आफ्रिका व्यापून टाकिली. याप्रमाणें पहिल्या हल्ल्यापासून २० वर्षाच्या आंतच काकेशसपासून पश्चिम भूमध्यसमुद्रापर्यंत या नवीन चढाई करून जाणा-या सत्तेनें साम्राज्याला वेढा दिला.