प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
सर्व्हिया आणि साम्राज्य यांचा नाश.- इ. स. १३८७ मध्यें ओटोमननी सर्व्हियाची सत्ता चिरडून टाकिलीं. सुलतान पहिला बेझिद यानें साम्राज्याचा आशियाखंडांतील शेवटचा मुलूख जो फिलाडेल्फिया, जो जिंकून घेतला आणि १३९३ मध्यें बल्गेरियन राजधानी ट्रोव्हो काबीज केली. यावेळीं कॉन्स्टंटिनोपल वेढलें गेलें; क्षणैक ओटोमन सत्तेला ग्रहण लागलें पण तैमूरच्या हल्ल्यानें ही विजयाची लाट थांबली. पहिल्या महंमदाला बादशहा मॅन्युंएलशी सख्य करणें भाग पडलें, पण ही ढिलाई थोड्याच वेळची होती. दुस-या मुरादनें अँड्रिआनोपल घेतले व कॉन्स्टंटिनोपल घेण्याचा प्रयत्न केला (१४४२). यावेळीं ग्रीसमध्यें पॅलिओलॉजी लोकांनां फ्रँकवर जय मिळत गेला ही गोष्ट फारशी जमेंत धरतां येत नाहीं. हा प्रसंग फार आणीबाणीचा होता. बाल्कनद्वीपकल्प तुर्कांच्या हातीं असून हंगेरीवर त्यांची दृष्टि होती. साम्राज्यास पश्चिम यूरोपांतूनच कायती मदत मिळण्यासारखी होती सहावा जॉन आणि मॅन्युएल या दोघांनीं पश्चिमेकडे जाऊन मदतीची खटपट केली. साम्राज्यावरील संकट म्हणजे रोमचा फायदा, असें असल्याकारणानें एकीचा प्रश्न पुन्हां जोरानें पुढें आला. पोप चौथा यूजेनियस यानें आस्थेनें हा प्रश्न हाती घेतला. त्याचा परिणाम म्हणजे १४३९ त फ्लॉरेन्स येथील बैठकीत ठरलेला 'ऐक्यशासन' (डिक्री ऑफ यूनिअन) होय. बादशहा व वरिष्ठ धर्माचार्य याला खरोखरीच अनुकूल होते पण लोकांनां व भिक्षुकांनां ते पटलें नाहीं. व त्यामुळें आचार्यभिक्षुकांत भांडणें सुरू झालीं. साम्राज्याला बचावण्याकरितां चौथ्या यूजेनियसनें संप्रदाययुद्ध (क्रूसेड) पुकारलें. व १३४३ मध्यें हंगोरियन आणि पोल लोकांनीं मुरादवर जय मिळविला. पण पुढील वर्षीं व्हारनाच्या रणभूमीवर याचा भयंकर सूड उगवला गेला. पुढें ९ वर्षांनीं दुस-या महंमदाच्या कारकीर्दींत शेवट होण्याची वेळ आली. १,५०,००० लोकांनीं समुद्राच्या व जमिनीच्या बाजूनें शहराला वेढा दिला. बादशहा ९ वा कॉन्स्टटाइन याच्या जवळ सारे ८००० लोक होते. पश्चिमेकडून त्याला कांहीं मदत नव्हती, पण जॉन जस्टिनियनी नांवाचा एक अनुभवशीर व धाडसी जिनोई शिपाई दोन जहाजे आणि ४०० उरस्त्राणधारी शिपाई (क्युरेसिअर) घेऊन बादशहाच्या मदतीला आला. व्हेनशियन आणि जिनोई या दोन्ही परकी लोकांनां संरक्षणाच्या कामात फार तत्परता दाखविली. पण कांहीएक उपयोग झाला नाही. जस्टिनियनी जखमी होऊन पडला. तुर्क लोक निकट करून पुढें घुसले. कॉन्स्टंटाईन मोठ्या शौर्यानें लढतां लढतां मारला गेला. तेव्हां लवकरच मुसुलमानाच्या मतें जी ख्रिस्ती संप्रदायाची राजधानी, तें कॉन्स्टंटिनोपल शहर त्यांच्या हातांत पडले; व अशा रीतीनें पूर्व साम्राज्याचा कायमचा निकाल लागला.
कान्स्टंटिनोपलच्या पाडावाच्या प्रसंगीं ख्रिस्ती राष्ट्रें स्वस्थ बसलीं या गोष्टीचें ऐतिहासिक स्वरूप लक्षांत येण्यासाठीं पश्चिमयूरोपाची स्थिति अवगमिली पाहिजे. ती लक्षांत येण्यासाठीं पूर्वपश्चिम साम्राज्यांची एकमेकांशीं तुलना व एकमेकांशीं संबंध लक्षांत आणला पाहिजे.
रोमचें पश्चिम साम्राज्य आणि पूर्व साम्राज्य यांची तुलना स्थूलपणें अशी मांडतां येईल कीं, पूर्वेकडे साम्राज्याच्या सातत्यामुळें राष्ट्रीयत्वाचा विकास झाला नाहीं. पश्चिमेकडे साम्राज्याच्या कल्पनेचें अस्तित्व पण साम्राज्याच्या सत्तेचा अभाव या प्रकारची परिस्थिति असल्यामुळें लहान संस्थानें आणि राष्ट्रें हीं कायम राहिलीं एवढेंच नव्हे तर राष्ट्रस्वरूपांत विकास पावलीं आणि साम्राज्यकल्पना अनेक लहान संस्थानांच्या रक्षणापुरती राहून रोमनसाम्राज्याच्या ऐवजीं जर्मन साम्राज्य आणि आस्ट्रोहंगेरियन साम्राज्य हीं दोन साम्राज्यें उत्पन्न झालीं; आणि कालच्या महायुद्धाचा परिणाम म्हणून हीं साम्राज्यें अजीबात नष्ट होऊन जर्मनी हें लोकसत्ताक राष्ट्र आणि आस्ट्रियन साम्राज्याचे तुकडे पडून चेकोस्लोव्हाकिया वगैरे लहान राष्ट्रें तयार झालीं. पूर्वेकडील रोमन साम्राज्याचा बराचसा भाग तुर्कांनीं घेतला, तर पश्चिमेकडील रोमन साम्राज्याचा मुलुख, स्पेन वरील थोड्या काळापर्यंत सत्ता, व्हिएन्नाला वेढा या गोष्टी वगळतां तुर्काच्या उपसर्गापासून बराच मुक्त राहिला. ख्रिस्ती संप्रदायाची सत्ता व स्वरूप दोन ठिकाणीं भिन्न आहे. ख्रिस्ती संप्रदायाचें अधिकारी पूर्वेकडे साम्राज्याच्या सातत्यामुळें लौकिक अधिकाराला नमून असत. पश्चिमेकडे सर्वलोकसंयोजक लौकिक सत्ता दुर्बल झाल्यामुळें, आणि प्रसंगीं सर्वक्षेत्रव्यापी वीरावर साम्राज्याभिषेक करण्याचाच अधिकार पोपांनी घेतल्यामुळें रोमी ख्रिस्तीसांप्रदायिक सत्ता अधिकाधिक बलवान होत गेली. ग्रीक चर्च आणि साम्राज्य यांचा परिणाम रशियावर झाल्यामुळें रशीयाला बराच काल पौरस्त्य वळण लागूं लागलें.
इतिहास सांगावयाचा म्हणजे पश्चिमेकडील साम्राज्याचा पूर्वींपासून कथासूत्र सांगून सद्यःस्थिति स्पष्ट करावयाची. जगाच्या इतिहासाच्या प्राचीन कालाकडे अवलोकन केले असतां यूरोप व आशिया यांच्या स्वरूपांत फारसा भेद दिसत नाही. साम्राज्याची अस्थिरता, साम्राज्यें व राज्ये यांच्या सरहद्दींत अदलाबदल इत्यादि गोष्टी आपणांस यूरोप व आशियांत सारख्याच परिचित आहेत. रोमन साम्राज्य चंद्रगुप्ताचें साम्राज्य, इराणचे साम्राज्य यांत वस्तुतः फारसा फरक नाहीं. कांहीं अंशी पूर्वींच्या राजापासून खंडणी घेऊन व्यवस्था त्यांच्या कडेसच ठेवणें, कांही अंशी स्वस्तःच व्यवस्थ पहाणें इत्यादि क्रिया दोहोंकडे दिसतात. ही सादृश्यें जरी लक्षांत घेतली तरी यूरोपच्या इतिहासास कांहीं तरी वैशिष्ट्य आहे ही गोष्ट नाकबूल करतां यावयाची नाहीं. याकरितां सर्व यूरोपचा या कालचा इतिहास स्थूलरूपानें आपणास ज्ञात करून घेतला पाहिजे.