प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
रोमवर स्वा-या.- रोमनसाम्राज्यावर स्वा-या करणारे लोक एकाच प्रकारचे नव्हते. कित्येकांत राजसत्ता वाढली होती आणि कित्येकांत गोत्रश्रेष्ठ सत्तात्मक राज्यपद्धति प्रचलित होती. कित्येक केवळ लुटीकरितां स्वा-या करीत व कित्येक स्वा-या कायमची वसंती करण्याकरितां जमिनीच्या शोधार्थ भटकणा-या लोकांनीं केलेल्या होत्या. सरदारांच्या किंवा संस्थानिकांच्या सैनापत्याखालीं केलेल्या स्वा-या बहुधा प्रदेश काबीज करून वसती करण्यासाठीं केलेल्या असत. गोत्रश्रेष्ठसत्तात्मक वर्गांत गॉथ, व्हॉन्डॉल, बरगन्डियन व लाँबर्ड यांचाच समावेश होतो व दुस-यांत सॅकस्नीमधील फ्रँक व ब्रिटनवर हल्ला करणारे सॅक्सन लोक मोडतात. या दोन वर्गांत मोठा महत्त्वाचा फरक आहे. पहिल्या वर्गांतील लोकांनीं आपले. पणा कायम ठेविला नाहीं. त्यांच्यांतील सर्व संस्था कायमच्या लयास जाऊन ते रोमन साम्राज्यांत अंतर्धान पावले. दुस-या वर्गांतील लोक हे व्यक्तिशः स्वतंत्र होते. त्यांनीं आपलेपणा कायम ठेवून आपल्या राजांच्या बळावर रोमन साम्राज्याचा नाश करून एक नवीनच राज्यपद्धति निर्माण केली. साम्राज्याच्या ऐवजी निरनिराळे प्रांत स्वतंत्र असावे हें या राज्यपद्धतीचें धोरण असून तिची पुढें वाढ सरंजामी राज्यपद्धतींत (फ्यूडल सिस्टिममध्यें) झाली.