प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
रोमनसाम्राज्याविषयीं स्थूल विचार.- इ. स. ४७६ मध्यें पश्चिमेकडील रोमन साम्राज्य नष्ट झालें. तें साम्राज्य नष्ट करणा-यांनीं आपला अधिकार स्वतःच्या नांवानें न पुकारतां शास्त्रार्थाकरतां कां होईना आपल्या अधिकारास पूर्वेकडील रोमन सम्राटाची संमति घेतली. ३३७ च्या सुमारास जुनें साम्राज्य नाहींसें होऊन त्याचे पूर्वसाम्राज्य आणि पश्चिमसाम्राज्य असे दोन तुकडे पडले. आणि त्यांच्या विभक्तस्थितीस इ. स. ३९५ मध्यें पूर्णता आली ही गोष्ट मागें (पृ. १०८-९ पहा) सांगितलीच आहे, आणि पूर्वभागाच्या इतिहासाचें कथासूत्र शकावलीच्या स्वरूपांत ४७६ पर्यंत दिलेंच आहे. होनोरिअसपासून रोम्यूलस आगस्टयुलसपर्यंत पश्चिमेकडील चक्रवर्ती राज्य करीत असतां त्यांचे प्रांत एकामागून एक कसे चालले, गॉल्, ब्रिटन्, गॉथ्, आस्ट्रागाथ या लोकांनीं आणि उत्तर आफ्रिकेनें साम्राज्यापासून आपली विभक्तता कशी स्थापन केली हेंहि सांगितलेंच आहे. यांत पूर्वेकडील घडामोडींचें निवेदन शिल्लक राहिलें. रोमन साम्राज्याचा पुढील इतिहास द्यावयाचा म्हणजे कान्स्टंटाईनच्या कादकीर्दींपासून तूर्कांनीं कान्स्टन्टिनोपलचा पाडाव करीपर्यंतचा इतिहास सांगितला पाहिजे. पूर्वेकडील रोमन पातशाहीचे जेते जे तुर्क तेच खरोखर रोमन साम्राज्याची परंपरा आज चालवीत आहेत असें म्हटल्यास एका दृष्टीने तें म्हणणें बरोबर होईल. तुर्कांनीं अशा त-हेचा हक्क सांगितलाहि होता. तथापि तुर्कानीं आपला परंपरेचा संबंध रोमन पातशाहाशीं न लावतां ते मुसुलमान असल्यामुळें त्यांनीं खलीफातीशीं लावला त्यामुळें तुर्की साम्राज्याला रोमन साम्राज्य म्हणतां येणार नाहीं. तुर्क ख्रिस्ती असते तर पूर्व रोमनसाम्राज्य अजूनपर्यंत चालू आहे असें म्हणतां आले असते. पश्चिमेकडील रोमन साम्राज्य धुळीस मिळविणा-या लोकांनीं आपली परंपरा रोमन साम्राज्याशीं भिडविण्याचा प्रयत्न केल्यामुळें आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचें क्रीडास्थान रोम शहरच असल्यामुळें आणि रोमनसत्तेचें केंद्र जरी स्थानच्युत झालें तरी पोप व चर्चची शासनसंस्था यांचें केंद्र रोम राहिल्यामुळें रोमन पातशाही खरोखर मृत झाली असतां चालूच आहे अशी आभासात्मक कल्पना पाश्चात्य राजकारणाच्या भाषेंत आणि कायद्यांत राहिली. रोमनसाम्राज्याचा पश्चिमेकडील इतिहास ४७६ नंतर द्यावयाचा म्हणजे निरनिराळ्या महत्त्वाकांक्षी संस्थानांचा, विशेषेंकरून ज्या संस्थानांनीं रोमन परंपरेवर आपला हक्क ठेवला त्या संस्थानांचा इतिहास द्यावयाचा. पूर्वेकडील गोष्ट मात्र निराळी आहे. कान्स्टंटाईननें कान्स्टंटिनोपलला गादी नेली तेव्हांपासून तुर्कांनीं या नगराचा पाडाव करीपर्यंत अकरा शतकांहून अधिक कालपर्यंतचा इतिहास सुसंगत देतां येतो. हें साम्राज्य ११ शतकें टिकलें म्हणजे एकच वंश अधिकारारूड होता असें नव्हें. त्यांत रोमन रक्ताचा संबंध थोडकाच होता. काही ग्रीक तर काहीं एशियांतील रक्ताचे अशी तेथील राजावली होती. पण ही ख्रिस्ती होती किंवा निदान मुसुलमान तरी नव्हती. कित्येक राजांनी ख्रिस्ती व मुसुलमान या दोघांविषयीं त्रयस्थवृत्ति ठेवण्यासाठीं यहुदीपंथ पत्करला होता.
पहिल्या ते शेवटल्या कॉन्स्टंटाइन पर्यंतचें ख्रिस्ती रोमन साम्राज्य ११३० वर्षें टिकलें आणि ह्या लांबलचक काळांत आचारविचारविषयक आणि सत्ताविषयक अनेक घडामोडी त्यानें पाहिल्या. ५ व्या शतकांत ट्यूटॉन्स यांची वाढ होऊन पश्चिमेकडील प्रांत ताब्यांतून गेले. पण ६ व्या शतकांत त्या साम्राज्यानें आपली प्राचीन सत्ता पुन्हां कांहींशीं प्रस्थापित करून आपले गमावलेले प्रांत पुन्हां हस्तगत केले व रोमशीं संबंध जिवंत केला. ७ व्या शतकांत सारासेन आणि स्लाव्ह यांच्या राज्यविस्तारामुळें ही साम्राज्यसत्ता अगदीं कमी झाली पण ८ व्या शतकांतील अंतर्गत सुधारणेमुळें व धोरणी राज्यकारभारामुळें ९ वें शतक संपण्यापूर्वींच साम्राज्यानें सत्ता आणि विजय यांच्या नवीन कारकीर्दींस सुरूवात केली. ११ व्या शतकाच्या मध्यापासून -हास सुरू झाला. पूर्व आणि उत्तर सरहद्दीपासून असलेल्या कायमच्या भीतीखेरीज नॉर्मन लोकांच्या राजकीय बाबतींतील चढाईची व व्हेनिसच्या व्यापारांतील चढाईची साम्राज्याला मोठी धास्ती होती. नंतर १२०४ मध्यें फ्रँक आणि व्हेनेशियन लोकांनीं साम्राज्याची राजधानीच बळकाविली आणि त्याचे मुलूख वियुक्त करून टाकिले. यापुढें २५० वर्षें पूर्वींच्या शरीराची केवळ छाया म्हणून तें अस्तित्वांत होतें.
पूर्वसाम्राज्याच्या दीर्घ आयुष्यांत त्याचें महत्त्वाचें राजकीय कार्य म्हणजे त्यानें पश्चिम आशियांतील बलाढ्य राष्ट्रांपासून यूरोपखंडाचें संरक्षण केलें हें होतें. यूरोपांत उत्तर सरहद्दीवर जर्मन, स्लॅव्होनिक, फिनिक आणि तार्तर या लोकांशीं एकसारखें तें झगडत होतें तरी आपला खरा सामना पूर्वेकडच्या बाजूला आहे ही गोष्ट त्याच्या मनांत सदैव वागत होती. अशा दृष्टीनें पाहतां आपल्यास साम्राज्याच्या बाह्य इतिहासाचे चार मोठे कालखंड करावे लागतील. प्रत्येक खंडांत निराळ्या आशियांतील राजसत्तेशीं त्याला झगडा करावा लागला आहे. (१) इराणशीं जें युद्ध चालू होतें त्यांत अनेक शतकें हें साम्राज्य पराभव पावलें त्या युद्धाचा अंत सुमारें ६३० मध्यें रोमी साम्राज्याचा जय होऊन झाला. (२) सारासेन लोकांशीं ११ व्या शतकांत युद्ध चालू होतें त्यांत सारासेन दुर्बल ठरले (३) सेल्जुक तुर्काशीं ११ व्या आणि १२ व्या शतकांत युद्ध चालू होतें त्यानें साम्राज्य नष्ट झालें नाहीं पण (४) ओटोमन तुर्कांशीं, जे युद्ध झालें त्यांत मात्र रोमन सत्ता रसातळास गेली.
मध्ययुगावर लिहिणारें इतिहासकार पश्चिम यूरोपांत उदय पावणा-या राष्ट्रावरच कायती आपली दृष्टी ठेवून पूर्व साम्राज्याचा यूरोपांतील दर्जा अजीबात विसरतात. ११ व्या शतकाच्या मध्यापर्यंत तें सामर्थ्यामध्यें सबंध यूरोपांत पहिल्या प्रतीचें राष्ट्र होतें. पण त्याच्या राजकीय बलावरच त्याचें ऐतिहासिक महत्त्व अवलंबून नाहीं. प्राचीनत्वाचे वारस म्हणून संस्कृतीच्या इतिहासांत व त्याचप्रमाणें व्यापारी इतिहासांतहि निःसंशय त्याचा दर्जा श्रेष्ठ आहे. त्याच्या सबंध कारकीर्दींत काँन्स्टंटिनोपाल हें जगांतील पहिलें शहर होऊन राहिलें होतें. आपल्या शेजा-यावर विशेषत; स्लॅव्हॉनिक लोकांवर जो त्यानें पगडा बसविला ते त्याचें यूरोपमधील दुसरें कार्य म्हणतां येईल. या कार्याचें महत्त्व लहान सहान नाही, रशीयासारख्या मोठ्या परंतु असंस्कृत प्रदेशांतील अनेक पौर्वाचारसंपन्न राष्ट्रांवर ख्रिस्तीसंप्रदायाची छाप पडण्यास हेंच साम्राज्य कारण झालें. नाहीं तर या साम्राज्यावर मुसुलमानी छाप पडून एशियाची सांस्कृतिक सरहद्द पोलंडला भिडली असती असो.