प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

रोमनसत्ता व इजिप्त.- प्राचीन इजिप्तचा ग्रीकांशीं कायमचा संबंध ख्रि. पू. ३२३ सालीं उत्पन्न झाला आणि तेथें टालेमी घराण्याची स्थापना झाली. ग्रीकांनीं काहीं ग्रीक वसाहती तेथें सुरू करून ग्रीक व इजिप्शिअन लोकांस परस्परांशीं लग्नव्यवहार करण्यास संधि देऊन आपली सत्ता कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीं दोघांस मान्य होतील अशा देवतांचे उत्सवहि सुरू केले. ख्रिस्तपूर्व ३२३ पासून ख्रिस्तपूर्व ३० हा टालेमीच्या सत्तेचा काल होय. त्या कालापासून ६३९ पर्यंत म्हणजे महमदाच्या मरणानंतर थोडक्याच वर्षांनीं मुसुलमानांनीं इजिप्त घेतला त्या कालापर्यंत रोमन सत्ता चालू होती. ग्रीकांच्या कारकीर्दींत इजिप्तमधील लोकसंख्या ७० लाखांवर होती, यावरून या काळीं हा देश मोठ्या भरभराटीच्या स्थितींत असावा असे दिसतें. रोमन राज्यांत मात्र फारशी भरभराट असलेली दिसत नाहीं. रोमन राज्यामध्यें ज्या कांहीं गोष्टी संस्मरणीय म्हणतां येतील त्यांत ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार ही एक गोष्ट होय. तेथें कॉप्टिक नांवाच्या निराळ्या ख्रिस्तीचर्चची स्थापना झाली. या चर्चनें आपल्या पुरोहितांवर विवाह निषेध लादला नाहीं ही लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट आहे. कॉप्टिक चर्चच्या मतांमध्यें प्राचीन मिसरी विचाराचा बराच अंश आला असेल. पण तो किती आला याचें संशोधन चांगलें झालें नाहीं. इजिप्त मधील लोकांचा रोमला मुख्य उपयोग हा होता कीं, रोमला लागणारें धान्य इजिप्त मधून येई आणि त्यामुळें इजिप्त वरील अधिकार बादशहांनीं आपल्या ताब्यांत ठेवले होते आणि सेनेटला त्या अधिकारांत फारशी ढवळाढवळ करूं दिली नाहीं. रोमन पातशाही कालामध्यें व्यापारविषयक एक प्रयत्न झाला तो हां कीं, हिंदुस्थान आणि यूरोप यांमध्यें व्यापारी दळणवळण जें पूर्वीं अरबस्थानामार्फत होतें तें इजिप्तमार्फत चालू केलें. रोमननागरिकत्वाचे हक्क इतर लोकांबरोबर इजिप्तला देखील काराकल्लाच्या कारकीर्दींत मिळाले. इजिप्तमध्यें ख्रिस्तीसंप्रदाय सुरू झाल्यानंतर ज्यूंनां त्रास देण्यामध्यें इजिप्तहि इतर राष्ट्रांच्या मागें नव्हता. इजिप्तच्या रोमन सत्तेखालच्या इतिहासाविषयीं वरील गोष्टीपेक्षां सांगतां येण्याजोगें विशेष नाहीं. रोमन साम्राज्याची इजिप्तवरील सत्ता पुढें महमदाच्या मृत्यूनंतर थोडक्याच दिवसांनीं मुसुलमानांनीं नष्ट केली आणि त्याच सुमारास एशियामायनर व सीरिया हे प्रांत हस्तगत केले. आणि रोमन साम्राज्याशीं संग्राम करण्याची संधि इराणपासून इस्लामानें इराणच काबीज करून स्वतःकडे घेतली.

पश्चिमएशिया व इजिप्त यांच्यासंबंधानें कथासूत्र थांबवून आपण आतां यूरोपकडे वळूं, आणि सिंहावलोकनार्थ आणि ऐतिहासिक वृत्तांची प्रमाणबद्धता लक्षांत येण्यासाठीं आजचा यूरोप आणि त्यांत ग्रीक व रोमन संस्कृतीचे अवशेष यांचा संबंध लक्षांत घेऊं.