प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
रोमन सत्तेचा –हास.- ट्यूटन वगैरे रानटी लोकांच्या स्वा-या होण्यापूर्वींच रोमन साम्राज्य नामशेष झालें होतें. रोमन साम्राज्य म्हणजे रोमनलोकनियंत्रित साम्राज्य अथवा ज्या राज्याकरितां रोमन लोक आपला देह रणांगणीं ठेवीत असत अगर ज्या साम्राज्यांत प्रजासत्ताक रोमनें घालून दिलेल्या धर्मशास्त्रांची वाढ झाली होती असे रोमचें राज्य असा अर्थ केल्यास रोमन साम्राज्य नाहीसें केव्हांच होऊन गेलें होतें. रोमन फौजेंत, रोमन राज्यव्यवस्थेंत, रोमन शहरांत परकी लोक दिसूं लागले होते आणि केवळ पूर्वींच्या इतिहासाशीं आणि अधिकाराशीं कोणीं तरी कसा तरी संबंध उत्पन्न करून तो अधिकार आपल्या ताब्यांत घ्यावा आणि त्या सत्तेखालीं असलेल्या लोकांनां आपल्या हुकमतींत चालवावें अशी स्थिति झाली होती. लुटालूट करणारे बंडखेर आणि सत्ताधीश असलेले रोमन सम्राट यांतील फरक युद्धांतील यशाच्या पूर्णतेवर अवलंबून राहिला होता.
जरी ट्यूटन वगैरे रानटी लोकांच्या स्वा-या इ. स. च्या १ ल्या शतकापासून सुरू झाल्या तरी इ. स. च्या ४ थ्या शतकापासून त्यांचा जोर विशेषच वाढला. याचा परिणाम असा झाली कीं, कॉन्स्टन्टाईन बादशहानें आपली राजधानीं रोमहून कॉन्स्टंन्टिनोपल येथें नेली. तेव्हांपासून फोर्थनदी पासून टैग्रिसपर्यंत असलेल्या सर्व साम्राज्याचा कारभार कॉनस्टंन्टिनोपल येथेंच चालत असे. परंतु हें फार दिवस टिकणें शक्य नव्हतें; कारण दिवसेंदिवस स्वा-यांची संख्या वाढत चालली. व साम्राज्याच्या प्रत्येक भागाची विशेष काळजी घेणें जरूर झालें आणि तें कॉन्स्टंटिनोपलसारख्या दूर असलेल्या राजधानीपासून करणें शक्य नव्हतें म्हणून १ ल्या थिओडोशियस बादशहाच्या मरणानंतर सम्राज्याचे दोन विभाग झाले. येथूनच रोमनसाम्राज्याचा नाश होण्यास प्रारंभ झाला. याशिवाय यावेळेस पूर्व यूरोप व पश्चिम यूरोप यांचा आचार व मते यांमध्यें अंतर पडण्यास प्रारंभ झाला.