प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
रशियाशीं संबंध.- दुस-या बेसिलच्यां कारकीर्दींतच रशियन प्रश्नाचा निकाल लागला. ९ व्या शतकाच्या मध्यापूर्वीं स्वीडनच्या नॉर्स लोकांनीं रशियन राष्ट्र स्थापिलें. मोसियांच्या स्लाव्हांसाठीं बल्गेरियनांनी जें केलें तेंच यांनीं पूर्वेकडील स्लाव्हांचें केलें. नीसर आणि नीपर यांतून युक्झाइनला जाण्यास रस्ता असल्यानें त्यांच्या दर्यावरील स्वा-यांची साम्राज्याला भीति होती. ९४५ मध्यें एक व्यापारी तह झाला आणि राजकन्या ओलगा हिची बिझाशिअमला भेट आणि हिचा ख्रिस्तीसंप्रदायस्वीकार ही या तहाची जामीनकी म्हणून त्यावेळीं वाटली. पण ओलगाच्या खैस्त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. स्विअँटोस्लाव्ह यानें बल्गेरिया घेऊन साम्राज्यावर स्वारी करण्याचा घाट घातला पण त्याचा झिमिसेसनें पूर्ण पराभव केला (९७१). ९८८ मध्यें वाडिमिर राजानें चेर्सन काबीज केलें पण बेसिल बादशहाला तें परत देऊन टाकिलें. बादशानें त्याला आपली बहीण व ख्रिस्ती धर्म दिला. या फेरबदलानंतर बिझँशियमला कीव्हपासून फारच थोडी धास्ती होती. याचवेळीं रशियन लोकांनीं आपलें राष्ट्र तयार केलें. मग्यार लोक पश्चिमेकडे गेले व नीपर आणि डॅन्यूबमधील प्रदेश त्यांनीं आक्रमिला. त्यापलीकडे पेचिनेगलोक होते. बिझँशियमचा डाव बल्गेरियनांवर दाब म्हणून मग्यारांचा उपयोग करण्याचा होता व त्याप्रमाणें झार सिनिऑन विरूद्ध रोमन आणि मग्यार एक झाले होते. पण सिमिऑननें हाच डाव मोठ्या कुशलतेनें उलटून टाकिला. मग्यारा विरूद्ध पेचिनेग लोकांनां त्यानें उठविले व त्याचा परिणाम असा झाला कीं, ९ वें शतक संपण्यापूर्वींच मग्यारांनां पश्चिमेकडे हल्लीं आहेत त्या प्रदेशांत पळ काढावा लागला व त्यांची जागा पेचिनेगनीं आक्रमिली. आपल्या नव्या जागेवरून मग्यार लोकांनां साम्राज्यावर स्वारी करतां येणें अगदीं शक्य होतें व त्याप्रमाणें त्यानीं दालमटिया किना-यावरील शहरें घेण्याचा प्रयत्न चालविला. बल्गेरिया घेतल्यामुळें पेचिनेग साम्राज्याचे अगदीं निकटचे शेजारी बनले. ११ व्या शतकांत या रानटी लोकांच्या हल्ल्यामुळें साम्राज्यसरकारला उसंत मिळेना. १०६४ मध्यें त्यांच्याच वंशांतील कुमार लोकांनीं निसर प्रदेशांतून त्यांनां हाकून लाविलें. १०९१ मध्यें अलेक्झियस काम्नेनस यानें त्यांचा जंगी पराभव केला व ११२३ मध्यें जॉन कॉम्नेनसनें त्याची पाळेमुळें खणून काढिलीं.