प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
महंमदी संप्रदायाचा उदय- याच वेळेस मुसुलमानी संप्रदाय उदयास आला व याचाहि यूरोपच्या इतिहासावर फार महत्वाचा परिणाम झाला. महंमदानें स्थापन केलेल्या या संप्रदायाचा परिणाम इ. स. ६३२ पर्यंत फारसा भासला नाहीं. परंतु पुढें मुसुलमान लोक प्रबल झाले. त्यांनीं हेरक्लिअस बादशास न जुमानतां इजिप्त व उत्तर आफ्रिका जिंकिली. पुढें त्यांनीं गॉथिक राज्य धुळीस मिळविलें. नंतर स्पेन जिंकून ते पिरिनीजच्या पलीकडे नारबोन पर्यंत गेले. मुसुलमानी सत्ता वाढल्यामुळें ख्रिस्ती संस्कृति ही यूरोपच्या पलीकडे जाऊं शकली नाहीं. याशिवाय पूर्वेकडील व्यापाराचे मार्ग बंद झाले. नारबोनच्या पुढें मुसुलमान लोक जाऊं शकले नाहींत; कारण लवकरच टूर्सच्या लढाईत त्यांचा चार्लस मार्टेल यानें पराभव केला. पुढें मुसुलमान लोक गॉल सोडून निघून गेले. स्पेनमध्यें मात्र बराच काळ ते टिकाव धरून राहिले व तेथें त्यांनीं एक श्रेष्ठ संस्कृति निर्माण केली. या संस्कृतीचा परिणाम मध्ययुगांत यूरोपच्या बौद्धिक जीवनावर फार होऊन तिनें त्या वेळच्या विचारास एक नवें वळण दिलें.