प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
मॅसिडोनियन घराण्याखालीं साम्राज्यविस्तार.- साम्राज्याच्या सुधारक बादशहांनीं मवाळ परराष्ट्रीय धोरण ठेवलें होतें पण मॅसिडोनियन घराण्याच्या अमदानींत साम्राज्याचा पुन्हां विस्तार होऊन तें यूरोपमधील बलिष्ट राष्ट्र बनलें होतें. दोनशें वर्षेपर्यंत ज्यांना ग्रहण लागलें होतें ती संस्कृति व विद्वत्ता ९ व्या शतकांत पुनरुज्जीवित झाली. पहिल्या बॅसिलच्या कारकीर्दींत दक्षिण इटलीमध्यें मोठ्या उत्साहाची चढाई चालली असून पश्चिमेकडील बादशहा दुसरा लुई याच्या सैन्याचें त्याला सहाय्य होतें. सॅरॅसेन लोकांना त्यांच्या किल्ल्याबाहेर काढून लावण्यांत आलें. बारी परत घेतली, कॅलोब्रियाचा बचाव केला आणि लाँगीबर्डीयाचा नवीन प्रांत स्थापन करण्यांत आला. यामुळें अँड्रियाटिकमध्यें शिरण्यात मार्ग मिळाला व सिसिली गेल्यानें झालेलें नुकसान या बाजूस मुलूख वाढल्यानें भरून निघालें. सहाव्या लिओनें आरमाराची पुनर्घटना केली पण त्याची कारकीर्द दुदैवी ठरला. सॅरॅसेन चांच्यांनी एजियन मध्यें लुटालूट केली. थेसॅलोनिका हस्तगत केले आणि असंख्य कैदी धरून नेले (१०४). पण ५० वर्षांनीं पुढें विजयाची लाट आली. निसेफोरस फोकास यानें दुसरा रोमॅनस याचा सेनापति असतांना क्रीट परत घेतलें. व पुढें स्वतः बादशहा झाल्यावर सिलिसिया व उत्तर सिरिया परत मिळविले (९६८). सायप्रसहि परत जिंकून घेतलें. जॉन झिमिसेस आणि दुसरा बॅसिल यांच्या कारकीर्दींत साम्राज्यानें सॅरॅसेन लोकांवर मोठमोठे विजय मिळविले. दुस-या बॅसिलच्या अर्मेनियांतील कर्तृत्ववान धोरणामुळें पूर्वेकडील सरहद्द बळकट करण्यांत आली व नवव्या कॉन्स्टंटाइनच्या अमदानींत अर्मेनिया साम्राज्याशीं चांगलें निगडीत करण्यांत आलें.