प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.'
बल्गेरियावर साज्याचा जय.- चौदा वर्षांच्या मोठ्या घनघोर युद्धानंतर बेसिलनें सर्व पूर्व व पश्चिम बल्गेरिया जिंकला (१०१८). जित लोकांनां त्यानें चांगल्यारीतीनें वागविलें. त्यांच्या राजकीय संस्था, त्यांचीं देवस्थानें, त्यांच्या जहागिरी कायम ठेविल्या. कांहीं बल्गेरियन राजघराण्यांतील व खानदानीचे लोक ग्रीक सरदारांच्या जोडीस बसविण्यांत आले व त्यांच्यांत बेटीव्यवहारहि होऊं लागले. १५० वर्षांवर यापुढें या द्वीपकल्पावर ग्रीकांचा ताबा राहिला. ९ व्या शतकाच्या मध्यकाळांत ग्रीसमधील स्लाव्ह लोकांनां तेथील सरकारच्या अधिकारांत आणण्यांत आलें होतें.