प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
पूर्वपश्चिमेची ताटातूट :- इ. स. ७९७ या वर्षीं यूरोपच्या इतिहासांत एक मोठी महत्त्वाची गोष्ट घडली. ती अशी कीं, कॉनस्टन्टाईन बादशहाची आई इरेन हिनें आपल्या मुलाला राज्यापासून दूर करून राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं, तेव्हां पश्चिमेकडील लोक ही स्त्री असून हिला रोमन साम्राज्यावर बसतां येत नाहीं असें म्हणून तिची सत्ता कबूल करीनात. त्यामुळें आतांपर्यंत पश्चिमेकडील राज्यें नांवाला तरी रोमची सार्वभौम सत्ता कबूल करीत, परंतु यापुढें तीं अगदींच स्वतंत्र होऊन त्यांचा रोमन साम्राज्याशीं कांहीं एक संबंध उरला नाहीं. इ. स. ८०० मध्यें पोप लिओनें फ्रँक लोकांचा राजा शार्लमान यास रोम येथें राज्याभिषेक करून नवीन साम्राज्याची स्थापना करविली. या साम्राज्यांत जर्मनी, हल्लींचा फ्रान्स इतलीचा बराचसा भाग व एब्रोपर्यंत स्पेन इतका प्रदेश मोडत असे. असो.
या साम्राज्याचा इतिहास देण्यापूर्वीं मध्यंतरीं वर उल्लेखिलेल्या थोड्याच कालांत अनेक घडामोडी घडवून आणणा-या महंमदी संप्रदायाकडे आपणांस लक्ष दिलें पाहिजे.