प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

जस्टिनिअन नंतरची उतरती कळा.- जस्टिनिअनानंतर अर्ध्या शतकांत साम्राज्याचें दौबर्ल्य उघडकीस आलें. पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि पूर्वेकडून त्यावर हल्ले होऊं लागले व कोठेंहि शत्रूशीं बरोबरी त्याला करतां आली नाहीं. (१) इटलींत लाँबर्ड लोकांनां बळी पडून थोड्याच वर्षांत अर्ध्याहून अधिक द्वीपकल्प त्याच्या ताब्यांत गेलें. (२) अँव्हर नांवाच्या हूण लोकांनीं कॅस्पियनकडून येऊन पॅनोनिया आणि डॅशिया प्रांत हस्तगत केले व स्लॅव्हॉनिक आणि बल्गेरियन प्रजा ज्यांत आहे असें एक साम्राज्य स्थापिलें, तें सुमारें ६० वर्षें टिकलें. यांचा मुख्य धंदा इलीरियन द्वीपकल्पावर स्वारी करून बादशहापासून खंडणी उपटण्याचा असे. केवळ अँव्हर लोकांकडे पाहिल्यास त्यांच्या स्वा-यांनां कायमचें असें महत्त्व नव्हतें; पण स्लाव्ह लोकांनीं प्रांत उध्वस्त करण्याखेरीज जासत परिणाम करून ठेवला आहे. या काळांत स्लॅव्हॉनिक वसाहतीस सुरूवात होऊन त्यांनीं या द्वीपकल्पाचें जातिविषयक स्वरूप पार बदलून टाकिलें, तेव्हांपासून एका नवयुगास आरंभ झाला. स्लाव्ह लोकांनीं मोसिया व मॅसेडोनियाचा बहुतेक भाग आक्रमिला. दक्षिणेकडे ग्रीसमध्यें जाऊन पिओपॉनेसस येथें मोठमोठ्या वसाहती केल्या. क्रुएशिया व सर्व्हिया हे वायव्येकडील प्रांत त्यांनीं काबीज केले. द्वीपकल्पाच्या उत्तर भागांत स्लाव्ह लोकांचें वर्चस्व कायम राहिलें पण ग्रीसमध्यें ग्रीकांशीं ते एकरूप होऊन स्थलनामाखेरीज त्यांचा फारसा मागमूस राहिला नाहीं. (३) एक समयावच्छेंकरून साम्राज्याचें इराणशीं कायमचें युद्ध सुरू झालें. मॉरिस बादशहानें दुस-या खुस्त्रूला एका राज्यापहारी मनुष्याला पदच्युत करण्याच्या कामीं जेव्हां मदत केली तेव्हां कांहीं काळ शांततेचा गेला.