प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

क्रूसेडचे परिणाम.- ही मदत अँलेक्झियसला पाहिजे होती त्यापेक्षां अगदीं निराळ्या स्वरूपाची ठरली. आपल्या मुत्सद्दीगिरीनें व हुषारीनें त्यानें साम्राज्यावर आलेलें संकट दूर सारिलें. आशियामायनरचा मोठा भाग साम्राज्याला परत मिळून इकडे पूर्वेस तुर्क दुर्बल होत चालले असतां साम्राज्य बरेंच जोरावलें. ही मदत नसती तर बिझाँशियमनें मॅनुएलच्या अमदानींत जें सामर्थ्य व ओज दाखविलें, तें त्याच्या आंगीं आलें नसतें. आशियामायनरमध्यें क्रूसेडरनीं पूर्वीं साम्राज्याच्या ताब्यांत जें कांहीं होतें तें त्याला परत मिळवून देण्याच्या अटी पाळल्या. पण अँटिऑक जिंकल्यानंतर (१०९८) त्यांनीं त्याप्रमाणें न वागतां नॉर्मन बोहेमाँड यांनां तें आपल्याकडे ठेवण्याची परवानगी दिली. अँटिऑकवर उघडपणें बादशहाचा हक्क होता, कारण थोड्याच वर्षांपूर्वी तें त्यांच्याकडे होतें. हें कारण बिझशियम व यरुशलेम येथील लॅटिन सरकार (स्थापना १०९९) यांमध्यें वितुष्ट आणण्यास पुरेसें होतें. एरवी क्रूसेडनें उत्पन्न केलेली नवीन राजकीय परिस्थिति साम्राज्याला अखेर धोक्याची होती याविषयीं शंका नाहीं. कारण त्याची जमीन व समुद्र पश्चिम यूरोपपासून सीरियामधील लॅटिन वसाहतीकडे जाणारे हमरस्तेच बनले होते. तेव्हां बायझन्टाइन सरकारला पवित्र भूमीकडे जाणा-या क्रूसेड मोहिमांपासून आपलें संरक्षण करण्याच्या योजना करणें भाग पडलें व या योजना पाश्चात्त्य राष्ट्रांनां क्रूसेडच्या पवित्र हेतूमधील अडथळे वाटावे हें त्यांच्या दृष्टीनें योग्यच होतें. तेव्हां ग्रीक आणि लॅटिन ख्रिश्चन यांच्यामधील धार्मिक वैर वाढत जाऊन परस्परांविषयीं अविश्वास व संकट वाढूं लागलें.