प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

पूर्वसाम्राज्य सहावें शतक जस्टिनिअन.- सहाव्या शतकांत बादशाहा जस्टिनियननें आपल्या हुशारीस व महत्वाकांक्षेस अनुसरून पूर्वजांनीं राखून ठेविलेल्या पैशाच्या बळावर पश्चिमेकडील कांहीं प्रांत पुन्हां काबील करण्याविषयीं कंबर बांधली. या वेळीं व्हांडालची सत्ता खालावली होती व ५६३ मध्यें बेलिसॅरियसनें एका मोहिमेंत आफ्रिका सर केली. इटली जिंकणें फार कठिण काम होतें. ५३५ मध्यें बेलिसॅरियसनें त्याला सुरूवात केली पण ५५४ पर्यंत नारसेसला तें काम पुरें करतां आलें नाहीं. दक्षिण स्पेनला एक भाग विसिगॉथ पासून रोमनांनीं जिंकून घेतला तेव्हां पश्चिम सामुद्रधुनीवर पुन्हां रोमचा ताबा चालू झाला. जस्टिनियननें मोठा जेता, मोठा कायदे करणारा, मोठा धर्मगुरू, मोठा मुत्सदी मोठा बांधकाम करणारा होण्याची इच्छा बाळगली व वरील प्रत्येक बाबतींत सर्व साम्राज्याचा इतिहास पाहतां त्याची कारकीर्द मोठी ठळक म्हणतां येईल. नुसतें त्याचे कायदेकानूचें काम किंवा संतासोफियाची इमारत त्याची कीर्ति अजरामर करण्याला पुरेशी आहे. पण त्याच्या कारकीर्दींची उज्वलता काळीमायुक्त आहे असें म्हणणें भाग पडतें. आफ्रिका पुन्हां जिंकून घेणें हें न्यायाचें व फायदेशीर होतें तरी इटलींला त्यामुळें फार खर्च सोसावा लागला. पहिली गोष्ट अशी कीं, या काळीं इराणचा सम्राट पहिला खुश्रू असून तो मुळींच शांततावादी नव्हता. जस्टिनिअन हा एकाच वेळीं एका मोठ्या इराणी युद्धांत व एका मोठ्या गॉथी युद्धांत गुंतला होता व त्याचें राज्य इतक्या ओढीला टिकण्यासारखें नव्हतें. दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिमेकडील मुलूख जिंकण्याच्या कामांत इटालीयन सुभेदारांची व रोमन बिशपची सहानुभूति मिळविणें त्याला जरूर होतें. तेव्हां या कारणाकरितां त्यानें स्वतःला धार्मिक कामांत गुंतवून घेतलें व त्याचा परिणाम म्हणजे सिरियन आणि इजिप्शियन प्रांतांवरील सत्तानाश हा होय. याप्रमाणें पश्चिम जिंकण्याला पूर्वेचा संबंध तोडावा लागला. तिसरी गोष्ट म्हणजे इटालियन आणि इराणी युद्धांत व वास्तुशिल्पाच्या कामांत अतोनात पैसा खर्च होऊन लोकांकडून पुन्हां तो मिळविण्याकरितां त्याला दडपशाहीचें धोरण स्वीकारावें लागलें. व यामुळें त्याच्या कारकीर्दींच्या उज्वलतेला काळोखी लागली, व त्याच्या मरणानंतर राज्याला उतरती कळा आली. जस्टिनिअनला जर्मन, स्लाव्ह आणि बल्गेरियन यांच्या हल्ल्यांपासून डॅन्यूबचें रक्षण करण्याचें काम असे हें विसरून चालवयाचें नाहीं. किल्ले आणि तट बांधण्याच्या कामीं त्यानें पैशाकडे पाहिलें नाहीं. जसिटनियनाच्या नांवाबरोबर त्याच्या थिओडोरा राणीचें नांव लोकांच्या तोंडीं राहिलें. पूर्ववयांत थिओडोरा एक साधारण नटी असून राज्ञीपद पावल्यावर तिच्या आंगचे गुण प्रगट झाले. तिचा कल तत्कालीन मोनोफिसाइट पाखंडाकडे असल्यानें त्या लोकांनां गुप्तपणें मदत होत असे.