प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
बल्गेरियाची स्वतंत्र साम्राज्यविषयक स्पर्धा.- दुस-या बॅसिलच्या कारकीर्दींत पूर्वसाम्राज्यसत्तेचा कळस झाला. कारण त्याचवेळीं फार दिवस चाललेल्या दुस-या एका भांडणाचा चांगला निकाल झाला होता. चौथ्या कॉन्स्टंटाइनच्या अमदानींत बल्गेरियन लोकांनीं लोअर मोसियामध्यें तेथील स्लाव्ह जातीचें उच्चाटण करून एक राज्य स्थापिलें. पण दोन शतकाच्या आंतच जित व जेते हे एकरूप झाले व बल्गेरियाला एखाद्या स्लॅव्हॉनिक संस्थानाचें स्वरूप प्राप्त झालें. पांचव्या कॉन्स्टंटाइनच्या वेळीं या शत्रूशीं एकसारखी लढाई चालली होती व पहिल्या निसेफोरसचा तर बल्गेरियन मोहिमेंत अंत झाला. यानंतर ८१५ मध्यें क्रुम राजानें कॉन्स्टंटिनोपलला वेढा दिला. पुढें तो मरण पावल्यावर शांततेचा काळ सुरू झाला. बोरिस राजानें ख्रिस्ती धर्मांत प्रवेश केला. बल्गेरियनांची निराळी धर्मगुरूची गादी स्थापण्यांत आली पण बल्गेरियनांची सुधारणा व त्यांच्या वाङ्मयाला सुरूवात या गोष्टी केवळ बिझांशिअमवर अवलंबून होत्या. सिरील आणि मेथॅडियस या दोन धर्मप्रसारकांच्या वेळीं वरील गोष्टी घडून आल्या. या दोन व्यक्तींनीं व्हॅगोलिटिक वर्णमाला शोधून काढून व स्लॅव्होनिक भाषेंत धर्मग्रंथांचें काहीं भाषांतर करून आग्नेयीकडील स्लाव्ह लोकांनां उपकृत करून ठेविलें. प्राचीन बल्गेरियन राज्याचा उज्वल काल म्हणजे सिमेऑनची कारकीर्द (८९३-९२७). या सिमेऑन राजानें आपलें राज्य पश्चिमेकडे अँड्रियाटिक किना-यापर्यंत वाढविलें व बल्गेरीयाचा 'झार' व रोमन लोकांचा मुखत्यार अशी पदवी घेतली. साम्राज्यावर धाड घालण्याचें त्याच्या कारकीर्दींतील जें महत्वाचें धोरण तें त्याच्या मागून आलेल्या पिटरच्या अमदानींत अजीबात सुटलें. त्यानें पहिला रोमॅनस याच्या मुलीशीं लग्न केलें व सिमेऑननें स्थापिलेल्या बल्गेरियन पॅट्रिआर्चेटला बायझांशिअम येथें मान्यता मिळाली. पण हें बलिष्ठ स्लॅव्होनिक संस्थान खच्ची करण्याला बयझंटाइन राज्यकर्ते चांगली संधी पहात होते. शेवटीं झेमिसेसनें पूर्व बल्गेरिया पादाक्रांत करून डॅन्यूबची सरहद्द परत आपणाकडे घेतली. पण इकडे दुसरा बेसिल आपल्या शत्रूबरोबर लढण्यांत गुंतला असतां तिकडे शिष्मनिड घराण्यांतील शूर शामियलनें बल्गेरियन सत्ता पुन्हां मिळवून सर्व्हियन लोकांना खालीं ओढलें.