प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
यूरोपचें एकत्व.- भूपृष्ठ स्वरूपाच्या दृष्टीनें यूरोप हें आशिया खंडापासून पृथक् मानतां येत नाहीं यूरोपच्या इतिहासांत कोणत्या गोष्टीचें पर्यालोचन केले पाहिजे हे सांगणें कठिण आहे. यूरोपियन संस्कृति तिच्या दृश्य प्रारंभापासून आतांपर्यंत यूरोपलाच चिकटून राहिली नाहीं; तरी यूरोपचा इतिहास म्हणजे यूरोपियन संस्कृतीचा व ज्या कारणांच्या योगानें तिला आजचें स्वरूप प्राप्त झाले आहे त्यांचा इतिहास होय. यूरोपियन संस्कृतीचा इतिहास यूरोपच्या इतिहासांतून वगळला तर सर्व यूरोपला स्वतंत्र इतिहास आहे किंवा नाहीं याविषयीं इतिहासशास्त्रपंडितास शंका उत्पन्न होईल. चिरकाल व अनेक व्यापारमय अशा ज्या संस्थांनीं यूरोपच्या ब-याचशा भागांत परस्पर सदृशता व तन्मूलक एकजनभाव उत्पन्न झाला त्या संस्था म्हटल्या म्हणजे रोमन साम्राज्य व रोमन कॅथॉजिक पंथ ह्या होत. सर्व साम्राज्य, राजधर्मशास्त्र अथवा राष्ट्रव्यवहारशास्त्रानें बद्ध असलेल्या राष्ट्रांचा संघ याअर्थीं ''यूरोप'' शब्दाचा उपयोग १९ व्या शतकांतच होऊं लागला. मध्ययुगाच्या पूर्वीं ''यूरोप'' शब्द उच्चारला असतां केवळ ''पृथ्वीवरील एक भाग'' एवढाच बोध होई. संस्कृतीनें, अचारानें, व इतिहासानें एकत्व पावलेल्या समाजाचा बोध होत नव्हता. ज्याप्रमाणें हल्लीं सदृश संस्कृतीच्या राष्ट्रसंघानें यूरोपला एकत्व आलें आहे त्याप्रमाणेंच मध्ययुगांत यूरोपचें ऐक्य साम्राज्यमूलक व ख्रिस्तीसंप्रदायमूलक होतें. रोमन साम्राज्य आणि ख्रिस्ती संप्रदाय या संस्था मुख्यतः यूरोपच्या जमिनीवर वाढल्या होत्या. ज्या लोकांस पृथक लोक अशी संज्ञा देतां येईल अशा लोकांचे पृथक व स्वतंत्र राज्य पाहिजे हें तत्व व त्यावर बनलेली राज्यपद्धत हीं मूळची यूरोपीय आहेत असा यूरोपीयन ग्रंथकारांचा आग्रह आहे तथापि तो आग्रहच आहे. ह्यांच सत्य थोड्या अंशानें आहे. जरी यूरोपच्या बाहेरील घडामोडीचा यूरोपवर परिणाम झाला हें यूरोपियन ग्रंथकार कबूल करतात, तथापि राष्ट्रपद्धति मूळची आमचीच असें ते म्हणण्यास सोडीत नाहींत. यूरोपियन इतिहासकार म्हणतात तें खरें आहे कीं काय याचे दिग्दर्शन करणें जरूर आहे. यूरोपियन इतिहासकार म्हणतात कीं हल्लीं यूरोपांत ''राष्ट्रपद्धति'' प्रचलित आहे. राष्ट्रपद्धति म्हणजे ज्यांस पृथक लोक अशी संज्ञा देतां येईल अशा लोकांचें पृथक राज्य पाहिजे ही पद्धत. परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. यूरोपांत आज असें एकहि राष्ट्र नाहीं कीं ज्यांत एकाच महावंशाचे, संप्रदायाचे किंवा एकच भाषा बोलणारे लोक आहेत. प्रत्येक राष्ट्रांत एक वंश अगर संप्रदाय प्रमुख असून त्याच्या भोंवतीं लहान लहान राष्ट्रजाती जमलेल्या आहेत. उदाहरणार्थ इंग्लिशांचे राष्ट्र (नेशन) या नांवाने इंग्रज लोकांचे राष्ट्र असा बोध होतो. परंतु वस्तुस्थिति तशी नसून इंग्लंडमध्यें निरनिराळ्या राष्ट्रजाती, भाषा, धर्म व पंथ हे प्रचलित असून पुष्कळ वेळां त्यांचे हितसंबंधहि भिन्न असतात. खरें पाहिलें असतां इंग्लंडांत इंग्लिश राष्ट्रजाति ही प्रबल असून तिला स्कॉटिश, वेल्स वगैरे राष्ट्रजाती चिकटल्या आहेत. ''इंग्लिश नेशन'' याचें इंग्लिश राष्ट्रजातीचें दुस-या राष्ट्रजातीवरील राज्य असें लक्षण करितां येईल. संस्कृतीनें, आचारानें व इतिहासानें, एकत्व पावलेल्या यूरोपियन साम्राज्यानें व्यापलेला प्रदेश व यूरोप म्हणून समजला जाणारा पृथ्वीचा भाग हे केव्हांहि एक नव्हते. उदाहरणार्थ रशिया जरी यूरोपखंडांत मोडतो तरी पीटर धी ग्रेट पर्यंत त्याचा यूरोपच्या इतिहासांशीं कांहीएक संबंध नव्हता. पुन्हां तुर्की साम्राज्याचा जरी पहिल्यापासून यूरोपच्या इतिहासावर पुष्कळ परिणाम झाला आहे तरी तें मुख्यतः आशियाटिक राष्ट्र असून इ. स. १८५६ पर्यंत, सामान्य धर्मशास्त्रानें बद्ध अशा राष्ट्रसंघांत त्याचा समावेश झाला नव्हाता.