प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

रोमन साम्राज्याखालीं [इ. स. पू. २७ - इ. स. ३२३]. - ऑगस्टस बादशहाच्या कारकीर्दींत थेसली प्रांत मॅसेडोनियाला जोडण्यांत आला व बाकीचा ग्रीस अँकिया प्रांतांत सामील करून टाकिला व त्यावर एक प्रोकॉन्सल नेमिला. अँथेन्स, स्पार्टा इत्यादि अनेक संस्थानांनां स्वतंत्र हक्क दिले. देशाचें हित पाहण्यासाठीं आरगॉस येथें एक प्रतिनिधिमंडळ भरत असे. पूर्वींचें डेल्फिक मंत्रींमंडळ पुन्हा अस्तित्वांत आणून उत्तर व मध्य ग्रीसचे प्रतिनिधि त्यांत घेण्यांत आले.