प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
व्हेनिसची व लॅटिन राष्ट्रांची भयोत्पादक दोस्ती.- याप्रमाणें अकराव्या शतकाच्या ७ व्या दशकांत साम्राज्याच्या हलकेपणामुळें व नालायकीमुळें तें लय पावत आहे असें दिसलें. अँलेक्झिस कॉम्रेनस हा असाधारण लायकीचा मुत्सद्दी जेव्हां आला (१०८१) तेव्हां ही अव्यवस्था मोडून मोठें बलिष्ठ सरकार स्थापण्यांत आलें. त्याला सेल्जुक, पेचेनेग आणि पश्चिमेकडे नॉर्मन या तीन लोकांशीं झगडावयाचें होतें नार्मन लोकांनीं पूर्व रोमपासून त्याचे दक्षिण इटलींतील प्रांत हिसकावून घेतले होते. व सबंध कॉम्नेनियन अमदानींत अँड्रिआटिक पलीकडील मुलूख जिंकण्याच्या त्यांच्या बेतामुळें साम्राज्य फार धास्तींत होतें. अँलेक्झियसच्या कारकीर्दींतील दोन अति महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शत्रूविरुद्ध मदत मिळविण्याकरितां त्यानें केलेल्या भरपाई होत. (१) नॉर्मन लोकांविरूद्ध व्हेनिसनें आरमारी मदत दिल्याबद्दल त्याला व्यापारी हक्क देणें भाग पडलें (१०८४). त्यामुळें व्यापारी दृष्ट्या साम्राज्य व्हेनिस प्रजासत्ताक राज्याच्या अंकित होऊन बसलें. (२) सेल्जुकशीं लढण्याकरितां पश्चिम यूरोपांत मदत सैन्य मिळविण्याची त्यानें खटपट केली. त्याच्या मागणीला पोपनें व लॅटिन ख्रिस्ती राष्ट्रानें दिलेलें उत्तर म्हणजे पहिली क्रूसेड मोहीम होय.