प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

साम्राज्याचे तुकडे. - १२०४ या घातकी सालांत पूर्वेकडे पश्चिम ख्रिस्ती संप्रदायाचा क्रूसेड मोहिमा, व्यापारी वर्चस्व आणि व्हेनिसची महत्त्वाकांक्षा यायोगं होणारा प्रसार, हें जें संकट बरेच दिवस साम्राज्याला जाचत होतें त्याचा कळस होऊन साम्राज्य जित व वियुक्त झालें. याच वेळीं ही जी कु-हाड पडली ती अनेक आगंतुक कारणांनीं पडली असली तरी अशा आपत्तीच्या कारणावस्था पुष्कळ दिवसांपासून हयात होत्या. ऐझॅकएंजेलसला त्याचा भाऊ तिसरा अँलेक्झियस यानें पदच्युत केलें. त्याचा मुलगा पश्चिमेकडे पळाला (१२०१); तेथें नवीन क्रूसेडची तयारी चालू होती. व्हेनिसनें ती (मोहीम) पवित्र भूमीला नेऊन सोडण्याचें काम आंगावर घेतलें होतें. या राजपुत्रानें स्वाबियाचा फिलिफ (याला त्याची बहीण दिली होती) आणि माँटेफेरटचा बॉनिफेस यांनीं आपल्याला व आपल्या बापाला बिझँशियमची गादी परत मिळवून देण्याकरितां तिकडे मोहीम घेऊन जाण्यासाठीं विनविलें व क्रूसेडला मदत करण्याविषयीं आणि ग्रीक धर्मसंस्थेचा रोमशीं समेट करून देण्याविषयीं त्यांनां अभिवचन दिलें. व्हेनिसला हा बेत पसंत पडला. पण फिलिफचा शत्रू जो पोप तिसरा इनोसंट यानें त्याला हरकत घेतली. १२०३ मध्यें मोठ्या कष्टानें ऐझॅक आणि त्याचा मुलगा चौथा अँलेक्झियस यांनां राज्य परत मिळालें. व अँलेक्झियसनें आपले वचन पाळलें असतें तर क्रूसेड सैन्य पॅलेस्टाइनला जाण्याला निघत होतें. लॅटिन मदतीमुळें ही झालेली राज्यपदप्राप्ति अतिशय लोकविरुद्ध ठरली व अँलेक्झियसला इच्छा असूनहि आपलें वचन पुरें करतां येईना. पुढें थोड्याच महिन्यांनीं त्याला पदच्युत करण्यांत येऊन एक बाहेरचाच मनुष्य गादीवर स्थापण्यांत आला. पांचवा अँलेक्झियस उपटसुंभ होता तरी मोठा स्वदेशभक्त होता. शहराबाहेर तळ देऊन बसलेल्या क्रूसेडर लोकांनीं, पूर्वीं नॉर्मनांनीं जो बेत घडून आणण्यासाठीं एकसारखा प्रयत्न केला होता, तो बेत पार पाडण्याचें ठरविलें व ग्रीक साम्राज्याचा शेवट केला. चौथ्या क्रूसेडमधील पुढा-यांनीं निघण्यापूर्वीं हा बेत ठरवून ठेवला होता असें म्हणतां यावयाचें नाहीं. १२०४ पूर्वीं हा कोणाच्या मनांत सुद्धां आला नव्हता. साम्राज्य आपआपसांत कसें वाटून घ्यावयाचें हे प्रथम ठरवून नंतर त्यांनीं शहर घेतलें. साम्रज्याची वांटणी करतांना त्यांनां मार्गदर्शक अंधव्हेनेशियन पुढारी हेन्री डँडोलो हा होता. त्यानें अति अंकुचित चित्तवृत्तीनें फक्त व्हेनिसचेंच हित पाहिलें व ग्रीक साम्राज्याच्या जागी नवीन लॅटिन साम्राज्य स्थापतांनां आपल्याला तें जाचक न होईल इतकें दुर्बल असावें असा त्याचा उद्देश होता. रोमॅनियाचें लॅटिन साम्राज्य यरुशलेमप्रमाणें सरंजामी पद्धतीचें संस्थान होतें. ग्रीक मुलुखांत राज्य करणा-या सर्व राजांचा तो बादशहा असे. त्याच्या प्रत्यक्ष अधिकारांत कॉन्स्टंटिनोपल, दक्षिण थ्रेस, बिथिनियन किनारा आणि अवलंबून असल्यामुळें, पैशाच्या टंचाईमुळें व आरमार नसल्यामुळें त्याचा कोंडमारा झाला होता. त्याच्या हाताखालील सरंजामी सरदारांपासून त्यांच्या स्वार्थामुळें ग्रीक आणि बल्गेरियन यांच्या बरोबर भांडण्यांत त्याला फारच थोडी मदत मिळाली. दहा वर्षांनंतर हा क्षुद्र डोलारा ढासळूं लागला व पोपांच्या प्रयत्नांनींहि त्याचा नाश होण्याचें थांबलें नाहीं.

रोमन साम्राज्याच्या अवशेषापासून तीन ग्रीक संस्थानें निर्माण झालीं. कॉम्नेनियन घराण्यांतील एकानें ट्रेबिझाँड येथें एक स्वतंत्र राज्य स्थापिलें, तें १४३१ पर्यंत टिकलें. पुढें ऑटोमन लोकांनीं तें जिंकून घेतलें. एंजेलीच्या एका नातेवाइकानें यूरोपमध्यें एक स्वतंत्र ग्रीक राज्य स्थापिले. त्याला एपायरसचें डेसपॉटेट असें नांव होतें. पण सम्राटवंशाचा खरा प्रतिनिधि थिओडोर लॅस्कॅरिस असून त्यानें निकाया येथें बिझँटाइन उमराव जमा केले व १२०६ मध्यें तो बादशहा म्हणून निवडला गेला.