प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

साम्राज्याचें एकीकरण.- इ .स. ४७६ यावर्षीं ओडोसर यानें रोमशहर जिंकलें व तेव्हांपासून साम्राज्याच्या पश्चिम भागावर एक स्वतंत्र बादशहा नेमण्याची जी चाल १ ला थिओडोसिअस बादशहाच्या मरणानंतर सुरू झाली होती ती बंद पडली. सेनेटच्या अनुमतीनें साम्राज्याच्या पूर्वभागावरचा बादशहा झेनो हाच सर्व साम्राज्याचा कारभार पाहूं लागला. इकडे पूर्व गोंथचा राजा थिओडोरिक यानें इताली, गॉल व स्पेन जिंकून एक साम्राज्य स्थापिलें परंतु त्याच्या मरणानंतर तें साम्राज्य नष्ट होऊन त्यापासून नवीं लहान राज्यें निर्माण झालीं. पुढें जस्टिनियन बादशहाच्या कारकीर्दींत आफ्रिकेमधील व्हॅन्डांल साम्राज्य नष्ट झालें व स्वतंत्र झालेल्या लहान लहान राज्यांस जस्टिनिअन बादशहानें पुन्हां आपल्या ताब्यांत आणिलें. परंतु ही व्यवस्था फार दिवस टिकली नाहीं. जस्टिनिअनच्या मृत्यूनंतर साम्राज्यांत पुन्हां बंडाळी माजली. इ. स. ५६८ या वर्षीं अलबोइनच्या सैनापत्याखालीं लाँबर्ड लोकांनीं इतालीमध्यें शिरून चोहोंकडे नासधुस करून तेथें एक स्वतंत्र राज्य स्थापिलें व जरी हेरॅक्लिअस बादशहानें आशियांत कशी बशी आपली सत्ता कायम ठेविली तरी पाश्चमेंत आतां खरें पहिले असतां इताली साम्राज्यापासून विभक्त झाला. इताली साम्राज्यापासून विभक्त झाल्यानें पोपच्या राजकीय सत्तेस वाढण्यास वाव मिळाला. इ .स. ६ व्या शतकाच्या आरंभीं गॉथ लोकांचा राजा थिओडोरिक हा रोमवर राज्य करीत असतां रोम हें पादशाहीचें मुख्य ठिकाण असून त्याच्या प्राचीन आयुष्यक्रमाची परंपरा कायम होती. परंतु पोप ग्रेगरीच्या वेळेस रोम हें पोपांचें शहर बनलें व रोमन सम्राटांची पुष्कळ सत्ता पोपकडे गेली.