प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

सामाज्याखालीं नैतिक व आर्थिक स्थिति.- साम्राज्याच्या कारभाराच्या अमदानींत ग्रीसची आर्थिक स्थिति फारशी सुधारली नाहीं. सामान्यतः देशाचा व्यापार खालावला व शेतकीच्या जमीनी कुरणे बनलीं. थेसली, फोसेस, एलिस, आरगॉस आणि लॅकोनिया या कांहीं जिल्ह्यांखेरीज सर्व प्रदेश ओसाड पडला. तथापि ग्रीक लोकांचे सामाजिक आयुष्य आकर्षक होऊन राहिलें. परतंत्र राष्ट्रांत राष्ट्रास स्वत्वाची जाणीव कमी करणारीं मतें, विश्वबंधुत्वात्मक किंवा खा, प्या, मजा करा, सांगणारे पुष्टिमार्ग, आणि जगन्मिथ्या सांगणारे वेदांत, एपिक्युरीयन किंवा स्टोईक इत्यादि विचारसंप्रदायाच्या रूपानें प्रसृत होत होतीं. मागील युद्धाचा व संकटाचा काळ जाऊन आतां यूरोपियन हेलेन लोकांनां शांततेचा व निष्कर्माचा काळ प्राप्त झाला. त्यांच्या पुढें भावी उत्कर्षाची आशा नसल्यानें गत वैभवाच्या विचारांत ते गढून गेले आणि राष्ट्रीय अभिमान त्यांच्यांत अमर्यादीत जागृत झाला. त्यामुळें समाजांत फारसे दुर्गुण शिरले नाहींत. आपल्या प्राचीन संस्कृतीचें सातत्य राखण्यासाठीं अभिजात शिक्षणाचा अथेन्स सारख्या शहरांतून त्यांनीं सांठा करून ठेविला. हीच क्रिया त्यांच्या संस्कृतिविकासास कारण झाली असावी. व रोमवरहि ग्रीसचें वजन यामुळेंच पडलें. यूरोपियन ग्रीस आणि रोम यांच्यामधील नातें केवळ ज्ञानक्षेत्रापुरतेंच होतें. दुस-या आणि तिस-या शतकांत ग्रीसमधून बाहेर इटलींत प्रोफेसर व भाषाकोविद यांची संख्या जितकी जाई तेवढीच किंवा त्याहूनहि जास्त प्रवाशांची संख्या ग्रीस देशाचें सौंदर्य पाहण्यास आंत येत असे.

पहिल्या कांहीं सुभेदारांची कारकीर्द ग्रीकांनां जड जाऊन त्यांनीं अशी मागणी केली कीं, तो देश सेनेटच्या सत्तेखालून निघून प्रत्यक्ष बादशाही सत्तेखालीं यावा. ही मागणी मान्य झाली पण फार थोडा वेळ (इ. स. ४४) टिकली. इ. स. ४४ मध्यें क्लॉडियसनें सिनेटच्या ताब्यांत तो प्रांत दिला. बादशहा नेरो स्वतः बराच काळा ग्रीसमध्यें हिंडला व त्यानें ग्रीसला स्वातंत्र्य देऊन खंडणींतून मुक्त केलें. या स्वराज्यामुळें अयोग्य महत्वाकांक्षा व पक्षभेद उत्पन्न झाल्यामुळें व्हेस्पॅशियननें ही देणगी परत घेऊन पुन्हा अँकिया प्रांत बादशाही हुकमती खालील प्रदेश बनविला. पुढें दुस-या शतकांतले बादशहा ग्रीसचे पक्षपाती असल्यानें त्यांनीं त्याच्या उत्कर्षास बरीच मदत केली. हॅड्रियननें ग्रीसमध्यें ब-याच सुधारणा घडवून आणिल्या. तिस-या शतकांत ब-याचशा ग्रीक लोकांनां रोमन नागरिकत्वाचे हक्क मिळाले. ग्रीसवर पुन्हां परकीयांचे हल्ले सुरू झाले पण त्यांपासून फारसा अपाय घडला नाहीं.