प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
साम्राज्याचें लष्करी धोरण व तुर्क : - मॅसेडोनियन काळांत सरकारपुढें एक मोठा अंतर्गत व्यवस्थेचा प्रश्न येऊन उभा राहिला हा प्रश्न म्हणजे आशियामायनरमधील श्रीमंत सरदारांच्या मोठमोठ्या मालमत्तेची होत असलेली वाढ ही होय. ही वाढ होऊं देणें राजकीय व अर्थिक दृष्ट्या मोठें हानीकारक होतें. याचा बिमोड करण्यासंबंधीं प्रयत्न पहिल्या रोमॅनसपासून सुरू झाला त्याची कार्यदिशा श्रीमंतांपासून गरिबांचें रक्षण करणें व सैन्याची सुव्यवस्था राखणें हीं होती. याचप्रमाणें मोठ्या श्रीमंत व सामर्थ्यवान घराण्यांच्या अतिशय मोठ्या असलेल्या वजनापासून सरकारला भीति होती. सैन्यांतील अधिकारी याच घराण्यांतले होते व त्यांचें आपआपसांत चांगलें नातें व स्नेह असे. स्ल्केरस आणि फोकास घराण्यांशीं वाकडें आलें तेव्हां दुस-या बेसिलला या संकटाची जाणीव झाली. पुढें अनेक प्रकारचे कायदे करून पाहिले. पहिल्या रोमॅनसच्या कारकीर्दींत मोठमोठ्या जमीनदारांनां जमीन विकणें बेकायदेशीर ठरविण्यांत आलें. निसेफोरस याचा ओढा अमीरउमरावांकडे असल्यानें आतांपर्यंत गरिब लोकांच्या संरक्षणाकरितां जे कायदे झाले तेवढे पुरे आहेत असें धरून या पुढें देवस्थानानें नवीन मिळकत करूं नये असें ठरवून लष्करी जमीनींच्या पुरवठ्याच्या कामांत जी अडचण होती ती नाहींशी करण्याचा प्रयत्न केला. दुस-या बेसीलनें रोमॅनसचेंच धोरण स्वीकारलें: त्यानें फार कडक रीतीनें त्याचा अंमल चालविला. व आशियामायनरमधील उमरावांवर जबर कर बसवून त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न चालविला. बाल्कन प्रांत पुन्हां मिळाल्या कारणानें यूरोपमध्यें आशियामायनरच्या तोडीचें राजकीय वजन त्याला प्राप्त झालें. आशियामायनरमध्यें लष्करी सत्ता जोरांत होती व या सत्तेविरूद्ध ११ व्या शतकांत विरोध उत्पन्न झाला पण त्यामुळेंच सेल्जुक तुर्कांनां फावलें. कॉन्स्टंटिनोपल लष्करी सत्तेच्या हातीं जातें कीं काय अशी भिति पडली होती. ९ व्या कॉन्स्टंटाइनची गादी जॉर्ज मॅनिअँसेस नांवाच्या एका लष्करीवीरानें काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. व जेव्हां आशियामायनर मधील लष्करी उमरावांचा प्रतिनिधि ऐझॅक कॉम्नेनस गादीवर बसला तेव्हां मोठ्या विरोधामुळें त्याला गादी सोडावी लागली. दहाव्या कॉन्स्टंटाइनच्या कारकीर्दींत हा विरोध कळसास पोंचला. सिनेटमध्यें खालच्या दर्जाचे लोक येऊन त्यांनीं लष्करी खर्चाची अतिशय छाटाछाट केली. या धोरणामुळें सैन्य कमी होऊन अधिका-यांचाहि तुटवडा पडूं लागला. मुत्सद्दीगिरीनें बाहेरच्या शत्रूंनां तोंड द्यावें असें बादशहाला वाटलें. शेवटीं सेल्जुक लोकांनां जसजसा जय मिळत गेला तसतसे सरकारचे डोळे उघडले. सेनापति रोमॅनस डायोजेनेसला बादशहा करण्यांत आलें; त्याला सैन्य ठेवून तयार करणें भाग होतें; त्यानेंहि मोठ्या परिश्रमानें हें काम हातीं घेतले, पण त्याचा कांहींच उपयोग झाला नाहीं. त्याचा पराभव होऊन तो पकडला गेला (१०७१). सुलतानानें त्याला बंधमुक्त करून त्याचा गौरव केला पण लोकांनीं त्याला पदच्युत केलें व तो शत्रूच्या हातीं सांपडून आंधळा झाला अशा रीतीनें पूर्व आणि मध्य आशियामायनर हातावेगळें झालें; रूम येथें सेल्जुक राज्य स्थापिलें गेलें; १०८० मध्यें तुर्कांनीं निकाया काबीज केलें. जे प्रांत सेल्जुकांनीं व्यापिले नाहींत त्यांची दशा होऊन ते परकीय व स्थानिक धाडशी लोकांच्या भक्ष्यस्थानीं पडले.