प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

अकरावें घराणें - नंतर थीबीजच्या राजांनीं आपलें स्वातंत्र्य प्राप्त करून घेऊन अकराव्या राजघराण्याचीं स्थापना केली. त्या घराण्यांतील राजांनीं उत्तरेकडे आपल्या राज्याची मर्यादा वाढवून शेवटी सर्व देश व्यापून टाकला. मॉन्ट हें थीबीज येथील एका देवाचें नांव असल्यामुळें या राजांस “मेन्थॉप” म्हणत असत. कमी दर्जाच्या राजांस “एन्योती” हें नांव होतें. या राजांस थीबीज येथें नेऊन पुरण्याची चाल असावी; कारण, ज्या पेट्यांत त्यांची शवें पुरण्यांत आलीं असावी अशा पेट्या एकोणिसाव्या शतकांतील पुराणवस्तु संग्राहकांस सांपडल्या आहेत. पहिल्या निभोप मेन्थापनें सर्व मिसर देशावर आपला अंमल बसविला होता. डेर एल् बाऱ्ही येथील मिसर-संशोधन- फंड या मंडळानें जमीन खोदून तिसरा नेभेप्रे मेन्थॉप या राजाचें कबरस्थान उकरून काढलें त्यावरून तें फार भव्य स्मारक असावें असें दिसतें. त्याच्या मागून गादीवर येणारा चवथा सान्खेरे मेन्थॉप यानें तांबड्या समुद्राच्या मार्गानें प्युओनीवर स्वारी केली होती.