प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
शिकंदर बादशहाच्या स्वारीपूर्वी मिसर देशांत ३१ राजघराणीं एकामागून एक अशी होऊन गेली. हें एकतिसावें राजघराणें इराणी होतें. ख्रि. पू. १५०० च्या सुमारास १८ वें राजघराणें चालू होतें व मिसरचें साम्राज्य फार वाढते होतें. मिसर देशांतील लोकांच्या प्राचीन युगांत संस्कृतीची मजल कोठवर गेलेली होती हें भूखननादि मार्गांनी गोळा केलेल्या पुराव्यांनीं ठरविणें हा एक अलीकडील पुराणवस्तु शास्त्रवेत्यांचा विशिष्ट मार्ग आहे. इजिप्तमधील चौथ्या राजघराण्याच्या काळापूर्वी अनेक शतकें नील-थडीमध्यें राहणाऱ्या लोकांची संस्कृति बऱ्याच प्रगल्भ दशेस पोहचली होती हे पन्नास वर्षांपूर्वीच्या विद्वानासहि अगदी स्पष्ट होते तरी त्या काळची सविस्तर माहिती देणारी साधनें उपलब्ध होतील किंवा नाहीं याविषयी आशा करण्यास इ.स. १८९५ पर्यंत फारशी जागा नव्हती. परंतु त्या सालापासून ऐतिहासिक साहित्याच्या अभावामुळें श्मशानवत् भासणाऱ्या त्या प्रागैतिहासिक म्हणून समजल्या जाणाऱ्या युगासंबंधी नवीन नवीन शोध लागत आहेत व इजिप्तचा ख्रिस्तपूर्व पांच सहा हजार वर्षांइतका जुना काल ऐतिहासिककालामध्ये मोडेल इतकी माहिती उपलब्ध झाली आहे. मिसर देशांतील प्राचीन कला व इतिहास यांचा निकट संबंध असल्यामुळे त्यांच्या कलाविषयीं अगोदर थोडेसे विवेचन केले पाहिजें.