प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

बाराव्या राजघराण्याचा काळ - या काळांत जी शिल्पकामाची तऱ्हा प्रामुख्यानें दिसून येते तीस मागीस काळांतच सुरुवात झाली होती.

या काळांतील शिल्पकामाची नवीन तऱ्हा राजे लोकांच्य मूर्तीच्या कामांत प्रथम उपयोगांत आली. ज्या परकीय राजांपासून बाराव्या राजघराण्याचा उगम झाला त्यांच्याच या मूर्ती असल्या पाहिजेत परंतु हिक्सॉस राजांनीं त्या आपल्या पूर्वजांच्या आहेत असा समज उत्पन्न कल्यामुळें तशी भ्रामक कल्पना प्रचलित झाली. परंतु त्यांत कांही तथ्य नाहीं. या मूर्तीच्या मुखवटयावर ठसठसीतपणा, जोर कसपणा व मुखावरील स्नायूंचे जाळें इत्यादि गोष्टी प्रामुख्यनें दिसून येतात. या काळांत एका ठरावीक तऱ्हेनें काम करण्याची पद्धत चालू नसून चित्रकलेंत बरेंच स्वातंत्र्य दिसून येतें. कामाचा रेखीवपणा, उठावदारपणा व मुखावरील बारीकसारीक रेषांचेहि योग्य दिग्दर्शन इत्यादि गुणांमध्ये बाराव्या राजघराण्याच्या शिल्पकामाचें वैशिष्टय आहे परंतु त्यांत चवथ्या राजघराणयाच्या वेळेचा भव्यपणा व अठराव्या राजघराण्याच्या वेळचा जीवंतपणा दिसून येत नाहीं.

उठावाच्या खोदिव कामांतहि नवीन पद्धत विशेष स्पष्टपणें दिसून येते. मुखावरील रेषा वगैरे दाखविण्याच्या कामी बाराव्या  राजघराण्याच्या वेळेस ही नवीन पद्धत पूर्णत्वास गेली होती. स्वाभाविकपणापेक्षां शास्त्रशुद्धपणावर ज्यांची अधिक भिस्त होती अशा पंथाच्या लोकांकडून ही नवीन पद्धत प्रचलित करण्यांत आली होती.