प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
पांचवे घराणें - पांचव्या घराण्यास ‘एलिफन्टाइनचें घराणें’ असें म्हणतात परंतु ही चूक असावी. कारण हे ‘होरस’ यास मूळ पुरूष न समजतां सूर्य हाच मूळ पुरुष असें म्हणून ते सूर्याची उपासना करीत असत. शिवाय ते आपल्या नांवापुढें ‘सूर्यपुत्र’ असें उपपद लावून घेत असत. या घराण्यांतील साहुरे आणि इतर राजे यांनीं मोठमोठी मंदिरें व त्यांतील मनोरे बांधून ते सर्व सूर्यास अर्पण केले आहेत.त्यापैकी अबुसीर येथील नॉसेरीच्या देवालयासंबंधीं पूर्ण तपास लागला आहे. ‘वेस्टकार पापायरस’ या लेखांतील अद्भुत गोष्टीमध्यें एका सूर्योपासिकेपासून तीन राजांची उत्पत्ति कशी झाली हें सांगितलें आहे. पुष्कळ राजांच्या मनोऱ्यांसंबंधी माहिती उपलब्ध झालेली आहे. अबुसर येथील मनोरे अत्यंत प्राचीन आहेत. मनोरे असलेलीं शाहुरेचीं देवालयें इतक्या चांगल्या स्थितींत आहेत कीं त्यांच्यावर दिसून येणार्या शिल्पकामावरून व नकशीकामावरून मिसरदेशांत इतक्या प्राचीनकाळींहि त्या कलांची अभिवृद्धी किती झालीहोती व जलमार्गानें व खुष्कीच्या मार्गानें युद्धविषयक पराक्रम करण्यास लागणाऱ्या धाडसादि गुणांचा किती विकास झाला होता हें कळून येण्यासारखें आहे. पांचव्या घराण्यांतील अगदीं अखेरचा मनोरा म्हणजे सक्कारा येथील उनस याचा होय. त्यावर आचारविधींचे व जादूगिरीचे ग्रंथ कोरलेले आहेत. ज्यांचें शिल्पकाम अतिशय उत्तम आहे अशीं या काळचीं पुष्कळ कबरस्थानें मेम्फिस येथें व मिसरदेशांतील वरच्या प्रदेशांत चहूंकडे सांपडतात. मिसरदेशांतील अत्यंत प्राचीन देवालयांतील खोदकामाचा पत्ता लागत नाहीं. कदाचित् तें चुनखडीसारख्या दगडावर असल्यामुळें सर्व नष्ट झालें असावें. पालेर्मो शिलेवरील सनावळी ह्याच राजघराण्याच्या काळांत खोदलेल्या होत्या. या काळच्या मुख्य गोष्टी म्हटल्या म्हणजे देवालयास देणग्या व नेमणुका करून देणें ह्या होत. यावरून राजदरबारी धर्मगुरूंचे वजन फार होतें हें उघड होतें. सिनाइ व प्युओनी येथील स्वाऱ्यांच्या स्मरणार्थहि शिलालेख खोदलेले आहेत.