प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
बाराव्या राजघराण्याची कारकीर्द - ही मध्यकालीन राज्याच्या केन्द्रस्थानीं होती. मेम्फाईट राजघराण्याचा ऱ्हास व हिराक्लिओपोलाईट राजघराण्याचा उदय हे त्याची संक्रमणावस्था दाखवितात व अकराव्या राजघराण्यांतील थीबीजच्या राजांनीं जो राज्याचा विस्तार केला त्यानें मध्ययुगाचा खरोखरीचा प्रारंभ त्या वेळीं झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. सहाव्या राजघराण्याच्या वेळची स्मारकें अगदीं ओबडधोबड व रानटी तऱ्हेची होती परंतु बाराव्या राजघराण्याच्या काळची स्मारकें भव्य, नमुनेदार, उत्कृष्ट कारागिरीची व विपुल आहेत. बाराव्या राजघराण्यांसंबंधानें जरी पुष्कळशी माहिती उपलब्ध नाहीं तर टयूरिन पापायरसच्या व इतर अनेक सनवार असलेल्या खोदीव लेखांवरून त्या घराण्यांतील आठ राजांच्या कारकीर्दीचा काळ व त्यांचा क्रम बरोबर रीतीनें निश्चित करितां येतो. राज्यावर अनेक वेळां संकटें आल्यामुळें हे राजे आपल्या मागून येणारे गादीचे वारस कर्तृत्ववान व खंबीर असावेत अशी खबरदारी घेत असत. तत्कालीन राजांचा व त्यांच्या मांडलिकांचा उद्देश आपलें वर्चस्व सभोवारच्या मुलुखावर प्रस्थापित करण्याचा असल्यामुळें प्रतिपक्षांस आपल्या हुकुमतींत ठेवण्याकरितां व इमानी अनुयायांस पारितोषिकें वगैरे देऊन उत्तेजन देण्याकरितां मुख्य गादीवरचा राजा खंबीर मनाचा असणें अत्यंत आवश्यक होतें. राजांच्या मेहेरबानीतल्या लोकांची, धनाढ्य सरदारांची व विशेषेकरून मध्यमिसरदेशांतील बेनी हसन, एल् बरशा, अस्यूत व हेर रिफा येथील कांही विशिष्ट कुटुंबांतील माणसांचीं कबरस्थानें फार भपकेदार आहेत आणि राजदरबाराप्रमाणें लहान प्रमाणावर दरबार भरविण्याची चाल त्यांच्यामध्यें असावी असें उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसून येतें. शेवटीं अनेक दृढनिश्चयी राजांच्या प्रयत्नांमुळें तिसऱ्या सेनवोस्त्री व तिसऱ्या अमेनेम्हेच्या कारकीर्दीत सर्व सत्ता त्यांचे ठिकाणीं केंद्रीभूत झालेली दिसून येते. या घराण्यांतील राजांची दोन नांवें आहेत; एक अमेनेम्हे व दुसरें सेन्वोस्त्री. पहिला अमेनेम्हे हा पहिला राजा होता. याचा व मागल्या घराण्यांतील राजांचा काय संबंध होता एतद्विषयक माहिती उपलब्ध नाहीं. त्यानें तीस वर्षापर्यंत राज्य केलें.त्यांतील दहावर्षे तो व त्याचा पुत्र पहिला सेन्वोस्त्री हे दोघे भागीदार या नात्यानें राज्य चालवीत होते. त्याला राज्य मिळविण्याला व त्यास व्यवस्थित स्वरूप देण्यास लढावें लागलें व तें कार्य पार पाडल्यानंतर त्यानें आपली राजधानी थीबीजहून हलवून ती मेम्फिसच्या दक्षिणेस पंचवीस मैलांवर मध्यभागीं असलेल्या लिष्ट शहरीं नेली व तेंच आपलें निवासस्थान केलें.त्याचीं स्मारकें सर्व मिसरदेशभर पसरलेली असून सिनाईपर्यंतच्या दूरदूरच्या दगडाच्या व इतर खाणी त्याच्या कर्तृत्वाची साक्ष पटवितात. न्यूबियाच्या लोकांवर त्यानें एकदा स्वारी केली होती हीहि एक गोष्ट त्याच्या संबंधानें माहीत आहे. त्यानें आपला मुलगा सेन्वोस्त्री यास केलेला उपदेश म्हणून जो प्रसिद्ध आहे त्यांत वरील गोष्टीचा उल्लेख असून त्यावरून त्याचें आपल्या प्रजेच्या ठिकाणीं असलेले वात्सल्य व त्याच्या खुद्द राजवाडयांत त्याच्या भरवंशाच्या नोकरांकडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता यावरून ते किती कृतघ्न होते हें व्यक्त होतें.
पहिला सेन्वोस्त्री दहा वर्षे आपल्या बापाबरोबर राज्याचा भागीदार होता हें वर सांगितलेंच आहे. त्या काळांत तोच मुख्य कार्यकर्ता असून त्यानें सुदनमध्यें व लिबिअन लोकांवर पुष्कळ स्वाऱ्या केल्या. अमेनेम्हेच्या मृत्यूनंतर त्यानें आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकीर्दीत आपल्या राजघराण्याचा लौकिक चांगलाच वाढविला. हेलिओपोलिस येथील चौकोनी मनोरा हा त्याच्या सुप्रसिद्ध स्मारकांपैकी एक असून मोरिसच्या सरोवरास बांध घालण्याचें पुष्कळसें काम त्याच्या कारकीर्दीत झाले असावें. त्यानें नील नदीच्या उगमाजवळ वाडी हाल्फा येथें एक देवालय बांधलें व न्युबियांतील निरनिराळ्या जातींवर मिळविलेल्या ज्यांचें स्मारक म्हणून तेथे एक विजयस्तंभ उभारला. बेनी हसन येथील अभेनीचे आणि अस्यूत येथील हेफ्झेफाचें अशी दोन उत्कृष्ट कबरस्थानेंहि त्याच्याच कारकीर्दीत बांधली गेली. पहिला अमेनेम्हे व पहिला सेन्वोस्त्री या दोघा पितापुत्रांचे मनोरे लिष्ट येथें आहेत.
दुसरा अमेनेम्हे यास दाशूर येथें मूठमाती देण्यांत आली. त्याच्या मागून दुसरा सेन्वोस्त्री गादीवर बसला. त्याचा मनोरा फायूमनदीच्या मुखाशीं इलाहून येथे आहे. बनीहसन येथील नेमहॉपच्या कबरस्थानावरील रंगकाम याच्याच कारकीर्दीत केले होतें. सदर रंगकामांत सेमिटिक बेदुइन लोक पूर्वेकडील अरण्यांतून मिसर देशांत एक प्रकरचें नेत्रविलेपन आणीत आहेत असा अत्यंत मनोहर देखावा दाखविला आहे. तिसरा सेन्वोस्त्री यानें पॅलेस्टाईन व न्यूबिआ प्रांतावर स्वाऱ्या केल्या व आपल्या राज्याच्या दक्षिणमर्यादेवर सेम्ना येथें एक पुतळा व अनेक जयस्तंभ उभारले. त्याच्या मनोऱ्याजवळ त्याच्या कुटुंबातील एका राजकन्येचे जवाहिराचे अलंकार सापडले. ज्याच्यावरील चित्रकामांत एक राक्षसी पुतळा एका जागेवरून दुसऱ्या जागी नेल्याचें दाखविलें आहे. अशा एल बरशा येथील थेथॉपच्या कबरस्थानाचें बांधकाम या राजाच्या कारकीर्दीत संपूर्ण झालें.
तिसरा अमेनेम्हे यानें मोरिस सरोवराचें काम पुरें केलें आणि सेम्ना येथें नीलनदीच्या पुराचे पाणी किती उंचीपर्यंत चढतें हे नमूद करण्याचा प्रघात सुरू केला. तो क्रम त्याच्या मागून गादीवर बसलेल्या राजानीं पुढें चालू ठेवला. त्याच्या शेचाळीस वर्षाच्या कारकीर्दीत त्यानें दाशूर येथें एक व मोरिस सरोवराच्या जवळ हावरा येथें एक असे दोन मनोरे बांधलें हावऱ्याच्या मनोऱ्याजवळ चक्रव्यूह (लॅबिरीथ) नांवाचें एक भले मोठें कारस्थान आहे. चवथ्या अमेनेम्हेची कारकीर्द अल्पकालिक होती आणि हें राजघराणें सेबेक्नेफ्रू नांवाच्या राणीबरोबर नष्ट झालें. लॅबिरिथच्या उपलब्ध असलेल्या अवशिष्ट भागांत त्या राणींचे नांव सांपडतें. या म्हणजे बाराव्या राजघराण्यांत आठ राजे झाले आणि ते एकंदर दोनशेंतरी वर्षे टिकलें.या घराणयाचा नांवलौकिक जरी मोठा आहे तरी त्यानें आपल्या राज्याचा विस्तार नील थडीच्या बाहेर केला नाही. शिवाय मनोऱ्यापेक्षांहि अधिक वाखाणलेल्या त्यांच्या मोठ्यांतल्या मोठ्या स्मारकाचें एका कपऱ्यांच्या मोठ्या राशीशिवाय सांप्रत कांहीएक उपलब्ध नाहीं.